सर्च-रिसर्च : विमाने "जमीं पर' नक्की कोठे? 

महेश बर्दापूरकर 
Thursday, 23 April 2020

युरोपमध्ये बहुतांश प्रवासी विमाने जमिनीवर आहेत, तर मालवाहू विमाने औषधे व जीवनावश्‍यक मालाची वाहतूक करण्यासाठी वापरली जात आहेत. "इझीजेट'ने आपली सर्व 344 विमाने धावपट्टीवरच पार्क केली आहेत.

जगभरात रोज लाखो विमाने प्रवाशांची वाहतूक करीत असतात. पण कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरातील आंतरराष्ट्रीय विमानसेवा सध्या ठप्प आहे. काही देशांतील देशांतर्गत विमानसेवा सुरू असली, तरी त्याचे प्रमाण खूपच कमी आहे. अशा परिस्थितीत ही लाखो विमाने कोठे पार्क केलेली आहेत, त्यांची देखभाल कशी केली जात आहे व परिस्थिती सुधारल्यानंतर ही विमाने उडण्यास योग्य असतील काय, अशा शंका प्रत्येकाच्याच मनात असणार... 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

"फ्लाइटरडार 24' या वेबसाइटवरील माहितीनुसार, जगभरात एका दिवसात एक लाख 75 हजार ते एक लाख 80 हजार विमाने उड्डाण करतात. यातील एकाच वेळी आकाशात असणाऱ्या विमानांची संख्या दहा ते पंधरा हजार असते. मात्र, "कोरोना'मुळे लॉकडाउन झाल्यानंतर मार्च अखेरपर्यंत दिवसभरातील उड्डाणांची संख्या 64 हजारांपर्यंत खाली आली आहे. भारतातील सर्व 650 विमाने जमिनीवर आली आहेत. या परिस्थितीत विमान कंपन्यांना 880 अब्ज डॉलरचे नुकसान होईल, असा अंदाज आहे. त्याचबरोबर ही सर्व विमाने कोठे पार्क करायची, त्यांना चालू स्थितीत ठेवायचे कसे व स्थिती सुधारल्यानंतर उडवायचे कसे, या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोणत्याही विमान कंपनीच्या अर्थकारणाचा विचार करता, त्यांच्यासाठी विमान जवळपास सात दिवस आणि चोवीस तास आकाशात असणे सर्वाधिक फायद्याचे असते. अमेरिकेतील "डेल्टा', "युनायटेड' व "अमेरिकन एअरलाइन्स' या मोठ्या विमान कंपन्यांनी आपली विमाने विविध विमानतळांवर उभी केली आहेत. तुल्सा या ओक्‍लोहोमामधील तात्पुरत्या जागेवर अमेरिकेची बोईंग जातीची विमाने पार्क केलेली आहेत. मात्र, या ठिकाणी अनेक चक्रीवादळे धडकत असतात व मार्चच्या शेवटी एक चक्रीवादळ या परिसरात धडकले व त्यामुळे विमानांचे नुकसान झाले. मोठ्या शहरांच्या ठिकाणी विमाने पार्क करण्याची जागा कमी व भाडे जास्त, तर लांबच्या ठिकाणी जागा जास्त व भाडेही कमी आहे. मात्र, सेवा सुरू करताना विमानसेवा त्वरित कार्यान्वित होण्यासाठी कंपन्यांना शहराजवळची जागा सोईस्कर ठरेल. कंपन्यांना या दोन्ही बाजूंचा विचार करून पार्किंगच्या जागा निवडाव्या लागत आहेत. 

युरोपमध्ये बहुतांश प्रवासी विमाने जमिनीवर आहेत, तर मालवाहू विमाने औषधे व जीवनावश्‍यक मालाची वाहतूक करण्यासाठी वापरली जात आहेत. "इझीजेट'ने आपली सर्व 344 विमाने धावपट्टीवरच पार्क केली आहेत. फ्रॅंकफर्ट या जगातील सर्वांत व्यग्र विमानतळावरील एक धावपट्टी विमाने पार्क करण्यासाठी वापरली जात आहे. म्युनिच आणि बर्लिनमधील धावपट्ट्यांवर लुफ्तान्सा कंपनीची 763 पैकी 700 विमाने पार्क केलेली आहेत. ती पुन्हा जागेवरच सुरू करता येतील व तेथूनच उड्डाणासाठी सज्ज करता येतील, असे नियोजन असल्याचे कंपनीच्या प्रवक्‍त्या नेदा जाफरी सांगतात. 

देखभालीचा प्रश्‍न मोठा 
नेदा जाफरी यांच्या मते, ""पार्क केलेल्या विमानाची इंजिने व सर्व सेन्सर झाकणे, सर्व द्रवपदार्थ (ऑईल, पाणी) बाहेर काढणे व बॅटरी डिसकनेक्‍ट करणे गरजेचे असते. विमान एक महिन्यापेक्षा अधिक काळ जमिनीवर ठेवायचे असल्यास खिडक्‍या व दारेही झाकून ठेवावी लागतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात कव्हर उपलब्ध नसल्याने आम्ही आता फॉइलच्या मदतीनेच इंजिने झाकत आहोत.'' "एअरबस 320 या विमानाच्या एकवेळच्या देखभालीसाठी साठ तास लागतात व ते पुन्हा सेवेत आणताना पुन्हा तेवढाच वेळ खर्च करावा लागणार आहे. विमानांना पुन्हा पहिल्यासारखे प्रवासी लगेचच मिळणार नाहीत आणि त्यामुळे काही विमाने पुन्हा कधीच न उडण्याचीही भीतीही आहे...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: International airline stop due to Corona