भाष्य :  अपेक्षांच्या पायघड्या!

भाष्य :  अपेक्षांच्या पायघड्या!

अमेरिकेचे अध्यक्ष भारताच्या दौऱ्यावर येतात, तेव्हा भारतीय परराष्ट्र धोरणाला लागलेले अपेक्षांचे डोहाळे तीव्र होतात. याहीवेळी तसेच होताना दिसते. वास्तविक, परराष्ट्र धोरणाचा अमेरिकाकेंद्रित दृष्टिकोन संपुष्टात आणणे, हेच भारतापुढचे खरे आव्हान आहे. तशा प्रयत्नांची सुरुवात ट्रम्प यांच्या आगामी दौऱ्याच्या निमित्ताने व्हायला हवी.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतभेटीसाठी आपल्या कारकिर्दीचे अखेरचे वर्ष निवडले. २०१७ मध्ये ट्रम्प यांनी बारा दिवसांचा विक्रमी असा आशिया दौरा करताना जपान, दक्षिण कोरिया, चीन, व्हिएतनाम आणि फिलिपिन्सला भेट दिली होती. पण, त्यात भारताचा समावेश नव्हता. २०१८मध्ये ट्रम्प यांनी भारतीय प्रजासत्ताकदिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यास नकार दिला होता. याचा अर्थ भारत-अमेरिका संबंधांत तणाव निर्माण झाला होता, असे नाही. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर उभय नेत्यांत विविध पातळ्यांवर अनेकदा भेटी झाल्या. ट्रम्प हे मोदींच्या अमेरिकेतील ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमात सहभागी झाले. थोडक्‍यात, भारताशी चांगले संबंध असले, तरी अमेरिकेच्या ‘टॉप प्रायॉरिटी’त भारत नव्हता. पण, आता ट्रम्प यांच्या आगामी भेटीमुळे चित्र बदलेल, असे अनेकांना वाटत असून अमेरिकेविषयीच्या अपेक्षा बऱ्याच प्रमाणात वाढल्या आहेत. 

जयशंकर यांच्यापुढील आव्हान
भारतीय परराष्ट्र धोरणाचे यश हे अमेरिकेबरोबरील सौहार्दपूर्ण संबंधांवरच अवलंबून आहे, असे एक संकुचित समीकरण भारतीयांच्या मनात घट्ट बसले असल्याने या अपेक्षांचे प्रमाण वाढले आहे. आपले अंगभूत कौशल्य गहाण टाकायचे आणि विशिष्ट व्यक्तीला किंवा देशाला ‘मसीहा’ बनवायचे आणि त्याच्याकडून प्रशस्तिपत्र मिळवायचे, हे आपल्या राजकीय शैलीचे एक अंगभूत वैशिट्य बनून गेले आहे. मग तो बिल क्‍लिंटन यांच्या दौऱ्यात भारताच्या अणुशक्तीवर केलेले शिक्कामोर्तब असो, बुश यांच्या काळात पाकिस्तानला ‘दहशवादी देश’ ठरवण्याची अपेक्षा असो अथवा ओबामा यांच्याकडून ‘भारत शक्तिशाली देश म्हणून उदयास येतो आहे,’ याची मान्यता मिळविण्याची खटपट असो. प्रत्येक वेळी अमेरिकेच्या प्रशस्तिपत्राची भारताला अपेक्षा असते. जेव्हा जेव्हा अमेरिकी अध्यक्षांचा दौरा होतो तेव्हा तेव्हा भारतीय परराष्ट्र धोरणाला लागलेल्या अपेक्षांचे हे डोहाळे तीव्र होतात. या अपेक्षांच्या सवयीमुळे भावनिकता ही वास्तववादी धोरणापेक्षा वरचढ ठरते.

आपले उभे आयुष्य परराष्ट्र धोरणात व्यतीत करणारे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासमोर ट्रम्प यांच्या आगामी दौऱ्यात ही संकुचित मानसिकता आणि अपेक्षांचे निरंतर चालू असलेले डोहाळे संपुष्टात आणणे, हेच खरे आव्हान असेल. हे आव्हान पेलणे जयशंकर यांच्यासाठी सोपे नाही. याचे कारण परराष्ट्र धोरणाविषयी भारतीय जनमानसातील कमालीची उदासीनता. भारतातील अनेकांच्या मते परराष्ट्र धोरण म्हणजे पाकिस्तानला धडा शिकवणे, चीनच्या साम्राज्याला रोखणे आणि अमेरिकेबरोबरचे संबंध सुधारणे. यामुळेच ट्रम्प येती घरा.. तोचि दिवाळी आणि दसरा अशीच मनोवस्था सध्या झालेली दिसते.  परंतु, अशा साचेबद्ध वृत्तीमुळे वर्तमानकाळातील राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष होण्याचा धोका उद्‌भवू शकतो. परराष्ट्र धोरणाचे कौतुक सोहळ्यात रूपांतर करण्याच्या मोदी सरकारच्या प्रवृत्तीमुळे तर या धोक्‍याची शक्‍यता अधिक वाटते.

उदाहरणार्थ ट्रम्प यांचा हा दौरा. दोन कारणांसाठी ट्रम्प यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात भारताचा दौरा करण्याचे ठरविले. एक तात्कालिक कारण आणि दुसरे दीर्घकालीन. ट्रम्प या वर्षी निवडणुकीला सामोरे जात आहेत. ट्रम्प यांच्यासमोर बहुधा आव्हान असेल ते डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर बर्नी सॅंडर्स यांचे. या महाशयांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आधुनिक समाजवादाची कास धरली असून, ते लेनिन आणि स्टॅलिनलाही लाजवतील अशा प्रकारचे धोरण मांडत आहेत. ट्रम्प यांच्या ‘अमेरिका प्रथम’ला ते ‘प्रथम अमेरिकन’ने उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत. जी ट्रम्प यांच्यासाठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे आगामी निवडणूक जिंकणे हे ट्रम्प यांच्यासाठी खूपच आव्हानात्मक आहे. ‘दी नॅशनल एशियन अमेरिकन’च्या सर्व्हेनुसार २०१६च्या निवडणुकीत ७७ टक्के भारतीयांची हिलरी क्‍लिंटन यांना पसंती होती, तर सोळा टक्के भारतीयांची ट्रम्प यांना पसंती होती. तसेच, ३१ टक्के भारतीयांचा कौल डेमोक्रॅटिक पक्षाला होता, तर चार टक्के लोकांचा पाठिंबा रिपब्लिकन पक्षाला होता. अमेरिकेतील भारतीय मतदार हा निर्णायक नसला, तरी प्रभावशाली आहे. अमेरिकेतील भारतीयांवर मोदींचा असलेला प्रभाव ट्रम्प यांना चांगला ठाऊक आहे. तेव्हा त्यांचा पाठिंबा आगामी निवडणुकीत आपल्याला मिळावा, यासाठीचा खटाटोप म्हणजे ट्रम्प यांचा हा दौरा.

विश्वासार्हतेविषयी प्रश्नचिन्ह
दुसरे म्हणजे, अमेरिकेचा इराणबरोबरील लष्करी संघर्ष, सीरिया प्रश्नात घेतलेली कचखाऊ भूमिका आणि चीनबरोबरील व्यापारयुद्ध, यामुळे ट्रम्प यांच्या काळात अमेरिकेच्या विश्वासार्हतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच चीन, भारत, जपान आणि रशिया यांच्या वाढत्या प्रभावामुळे जगाची वाटचाल बहुध्रुवीय व्यवस्थेकडे होत आहे. यामुळे अमेरिकेची एकाधिकारशाही जवळपास संपुष्टात आली आहे. अमेरिका-रशिया संबंधांचा इतिहास पाहता हे दोन्ही देश एकत्र येण्याची शक्‍यता कमी आहे. दुसरीकडे, चीनच्या दृष्टीने अमेरिका त्यांचा क्रमांक एकचा शत्रू आहे. जपान, ऑस्ट्रेलिया, फिलिपिन्स या परंपरागत असणाऱ्या मित्रदेशांनाही अमेरिकेच्या कार्यक्षमतेवर शंका आहे. असे असूनही भारताला अजूनही अमेरिकेच्या अपेक्षांचे डोहाळे लागले आहेत. ट्रम्प यांच्यासारख्या व्यापारी वृत्तीच्या नेत्याला भारतीयांची ही मानसिकता आणि जागतिक परिस्थिती, याची जाणीव नसणे हे अशक्‍यच.

आगामी निवडणूक जिंकणे आणि अमेरिकेचे जागतिक राजकारणातील स्थान टिकविणे, यासाठी ट्रम्प यांना भारताची गरज आहे. काश्‍मीर प्रश्नासंबंधी मध्यस्थीची तयारी दर्शवणे, अफगाणिस्तानातील भारताच्या विकासकामांची हेटाळणी करणे, इराण प्रश्नात भारताच्या हितांकडे दुर्लक्ष करणे, एच १-बी व्हिसाच्या निमित्ताने भारताच्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राला धक्का पोचविणे आदी धोरणांद्वारे ट्रम्प यांनी कायमच भारताच्या विरोधात भूमिका घेतली आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने अफगाणिस्तान आणि इराण प्रश्नात आपल्या दीर्घकालीन सामरिक हिताचे संरक्षण करणे, भारतीय समुदायाच्या विकासात अडथळा येईल असा कोणताही कायदा करण्यास अमेरिकेला परावृत्त करणे आणि द्विपक्षीय व्यापारात भारताच्या आर्थिक हिताचे संरक्षण करणे, यासंबंधी भारताच्या हिताची भूमिका घेण्यास ट्रम्प यांना उद्युक्त करणे, हे आपले प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे. याचे कारण अमेरिकेचा सर्वांत दुबळा अध्यक्ष स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी भारत दौऱ्यावर येत आहे. यादृष्टीने ट्रम्प यांचा दौरा ही भारतासाठी एक ऐतिहासिक संधी आहे. सध्याचे सरकार ती कशी साधणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
 

(लेखक मौलाना अबुल कलाम एशियन अध्ययन केंद्र, कोलकता येथे संशोधक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com