esakal | रक्तातील साखरेचा ‘रिमोट’
sakal

बोलून बातमी शोधा

sugar-test

शास्त्रज्ञांना यात काही अंशी यश आले असून, त्यांनी उंदरांमधील साखर विद्युतचुंबकीय लहरींच्या साह्याने नियंत्रित करण्यात यश मिळवले आहे. संशोधनानंतर माणसांमध्ये या जैवतंत्रज्ञानाचा वापर करता येईल, असे शास्त्रज्ञांना वाटते.

रक्तातील साखरेचा ‘रिमोट’

sakal_logo
By
सम्राट कदम

स्वस्थ आणि आरोग्यवर्धक जीवन जगण्यासाठी आहारापासून विहारापर्यंतच्या सर्वच गोष्टी काही शास्त्रीय पद्धतीने करण्याचा प्रयत्न आपण करतो. जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या आजारांशी जवळचा संबंध असतो तो रक्तातील साखरेचा! ही साखर अनियंत्रित झाल्यास आजार तर उद्भवतातच, पण त्याचबरोबर इतर आजार होण्याची शक्‍यताही वाढते आणि त्या आजाराची क्‍लिष्टताही वाढते. हे बघता रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी साखरयुक्त पदार्थ टाळण्याबरोबरच रोजच्या व्यायामाकडे विशेष लक्ष द्यावे लागते. पण हीच रक्तातील साखर टीव्ही संचाच्या आवाजाप्रमाणे रिमोट कंट्रोलने कमी- जास्त झाली, तर सगळे गणितच बदलून जाईल. शास्त्रज्ञांना यात काही अंशी यश आले असून, त्यांनी उंदरांमधील साखर विद्युतचुंबकीय लहरींच्या साह्याने नियंत्रित करण्यात यश मिळवले आहे. संशोधनानंतर माणसांमध्ये या जैवतंत्रज्ञानाचा वापर करता येईल, असे शास्त्रज्ञांना वाटते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विद्युतचुंबकीय लहरींचा वापर
अमेरिकेतील लोवा विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे हे संशोधन ‘सेल मॅटॉबॉलिझम’ या शोधपत्रिकत नुकतेच प्रकाशित झाले असून, ‘मधुमेह प्रकार-२’मधील साखर नियंत्रित करण्यात त्यांना यश मिळाले आहे. स्टॅटिक इलेक्‍ट्रिसिटी आणि चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली उंदराला काही तासांसाठी आणि काही दिवस ठेवल्यास त्याच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात आल्याचे आढळले. शास्त्रज्ञ डॉ. केल्विन कार्टर म्हणतात, ‘‘विद्युतचुंबकीय लहरींच्या माध्यमातून दूरवरूनच (रिमोट) रक्तातील साखर नियंत्रित करता येते. इन्शुलिनला मिळणारी शरीराची प्रतिक्रियाही सामान्य करता येते. झोपेत असताना हा उपचार केल्यास संबंधिताच्या दिवसभरातील रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे शक्‍य होईल.’’ विद्युतचुंबकीय बदलामुळे शरीरातील ऑक्‍सिडंट आणि अँटीऑक्‍सिडंट रासायनिक अभिक्रियांमध्ये समन्वय साधला जातो. विद्युतचुंबकीय बलाचा रक्तातील साखरेवर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी शास्त्रज्ञांनी ‘मधुमेह प्रकार -२’ असलेल्या उंदरांची निवड केली. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने आणि तासांच्या विभागणीनुसार विद्युतचुंबकीय बलाच्या सानिध्यात ठेवले. त्यांच्या रक्ताच्या नियमित चाचण्या करण्यात आल्या. विद्युतचुंबकीय बलाच्या सानिध्यात ठेवलेल्या उंदरांमधील मधुमेह नियंत्रणात आल्याचे स्पष्ट झाले. शास्त्रज्ञांनी त्याचे वैद्यकीय विश्‍लेषण केले. टीव्ही, उपग्रह, संदेशवहन आदी रिमोट कंट्रोल डिव्हायसेससाठी विद्युतचुंबकीय लहरींचा वापर करण्यात येतो. त्याचा थोड्याफार प्रमाणात जैविक प्रक्रियांवर परिणाम होत असल्याचे आजवर माहीत होते, पण त्याचा इतक्‍या महत्त्वपूर्ण आजारावर उपयोग होईल हे प्रथमच समोर आले. पक्षी आणि काही प्राणीही दिशानिर्देशनासाठी पृथ्वीच्या विद्युतचुंबकीय लहरींचा वापर करतात, या आजवरच्या माहितीच्या आधारे शास्त्रज्ञांनी आणखी संशोधन केले. विद्युतचुंबकीय लहरी आणि त्यांच्या बलाचा शरीरातील जैविक रसायनांवर विशेषतः सुपरऑक्‍सिडंट अभिक्रियांवरील परिणाम अभ्यासण्यास आला. ‘मधुमेह प्रकार- २’ आणि इन्शुलिनचा प्रभाव नियंत्रित करण्यात सुपरऑक्‍सिडंट अभिक्रियाही भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे स्पष्ट झाले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हे निष्कर्ष वैद्यकीय क्षेत्रासाठी आशादायक आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शास्त्रज्ञ माणसांमधील ‘मधुमेह प्रकार-२’ आणि इन्शुलिनच्या नियंत्रणासाठी या पद्धतीचा अवलंब करतील. विद्युतचुंबकीय बलाचा यकृत, फुफ्फुसे आदी अवयवांवर होणारा परिणामही अभ्यासावा लागेल. उपग्रहांपासून घरातील ‘एसी’पर्यंत ते उंच आकाशात उडणाऱ्या घारीपासून परदेशात प्रवास करणारे पक्षी या सर्वांनाच दिशानिर्देशन देणाऱ्या विद्युतचुंबकीय लहरी माणसाच्या शरीरातील साखरेला दिशानिर्देश देतील. आवश्‍यकता आहे ती शास्त्रज्ञांचे प्रयोगशाळेतील संशोधन प्रत्यक्ष माणसांवर परिणामकारक ठरण्याची. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image