सर्च-रिसर्च : स्मृतिकोशांचा निर्माता 

सम्राट कदम
Monday, 19 October 2020

रोजचे अनुभव किंवा अल्पकाळाच्या आठवणींना, दीर्घकाळ टिकणाऱ्या स्मृतिकोशामध्ये साठवणाऱ्या एका महत्त्वपूर्ण घटकाचा शोध मॅकगिल विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी लावला आहे.

आयुष्यात पहिल्यांदा शाळेच्या प्रांगणात ठेवलेले पहिले पाऊल तुम्हाला आठवते काय? पहिलीच्या वर्गात सोडायला आलेले बाबा, आई, भाऊ किंवा बहीण! नवे दप्तर, नवा गणवेश असेल आणि ‘वर्गात नीट बसायचं बरं का,’ अशी घरच्यांनी दिलेली लडिवाळ ताकीद... असे बरेच काही तुमच्या स्मृतींमध्ये दडलेले असेल. काळाच्या ओघात संदर्भ निघाल्यास स्मृतींच्या या पोतडीतून अलगद या आठवणी बाहेर येत असतील. पण, त्याच पहिलीच्या वर्गातला १०वा किंवा ११वा दिवस तुम्हाला आठवतो काय? नाही ना! आपल्यापैकी बहुतेकांना तो आठवणार नाही. असे का झाले असेल? काही गोष्टी स्मृतींच्या गाठोड्यात का सापडत नाहीत? विशेष प्रसंगच का दीर्घकाळ लक्षात राहतात? मेंदूत असे काय होते की काही आठवणींचा ‘डेटा’ दीर्घकाळ आपल्या स्मृतीत राहतो, तोही न ‘करप्ट’ होता. तात्पुरत्या आणि दीर्घकाळाच्या आठवणी नक्की स्मृतिकोशात साठवतात तरी कशा? त्यासाठी मेंदूत नक्की कोणती रासायनिक अभिक्रिया होते. त्यामध्ये महत्त्वाचा घटक कोणता असेल, असे प्रश्‍न उपस्थित होतात. शास्त्रज्ञही प्रयोगांच्या माध्यमातून या प्रश्‍नांची उत्तरे शोधत आहेत.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्मृतींच्या निर्मितीमध्ये दोन प्रक्रिया 
रोजचे अनुभव किंवा अल्पकाळाच्या आठवणींना, दीर्घकाळ टिकणाऱ्या स्मृतिकोशामध्ये साठवणाऱ्या एका महत्त्वपूर्ण घटकाचा शोध मॅकगिल विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी लावला आहे. स्मृतिकोश विकसित करण्यामध्ये याची भूमिका कळीची आहे. आपल्या मेंदूमध्ये आठवणी किंवा माहिती साठवण्यासाठी उत्तेजक चेतापेशींचा (न्यूरॉन्स) उपयोग होतो, तर अनावश्‍यक आठवणी किंवा भोवतालची इतर दृश्‍ये आणि आवाज वगळण्यासाठी किंवा पुसण्यासाठी प्रतिबंधात्मक चेतापेशी काम करतात. यामुळे अनावश्‍यक आठवणींची जळमटे काढून विशिष्ट काळातील ‘दर्जेदार’ आठवणी आपल्या स्मृतिकोशात बंदिस्त होतात. म्हणजे स्मृतींची निर्मिती होताना दोन वेगवेगळ्या प्रक्रिया एकाच वेळी घडत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. असे जरी असले, तरी चेतापेशींचा कोणता उपप्रकार दीर्घकाल स्मृती टिकविण्यामध्ये भूमिका बजावतो, याबद्दल आजवर माहीत नव्हते. आंतरराष्ट्रीय पातळीवरील सहकार्याने पार पडलेल्या या संशोधनाने याचे उत्तर मिळाले आहे. चेतापेशींचा हा उपप्रकार शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी जनुकीय बदल केलेल्या उंदरांचा वापर केला. अभ्यासासाठी विशिष्ट प्रकारचे जनुकीय बदल केलेले होते. अल्झायमर या स्मृतीशी निगडित रोगावरील संशोधनासाठी शास्त्रज्ञ अशा प्रकारच्या उंदरांचा वापर करत होते. चेतापेशींमध्ये स्मृती साठवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या प्रथिनांची निर्मिती केली जाते. या प्रथिनांच्या निर्मितीसाठी ‘इएलएफ२अल्फा’ नावाची चेतापेशी कारणीभूत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. ‘इएलएफ२अल्फा’ हे प्रथिन प्रतिबंधात्मक चेतापेशींचाच एक प्रकार असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. संशोधनात सहभागी झालेले शास्त्रज्ञ डॉ. विजेंद्र शर्मा म्हणतात,‘‘दीर्घकाळ स्मृतींचे संकलन करण्यासाठी प्रतिबंधात्मक चेतापेशींची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. तसेच ‘इएलएफ२अल्फा’ नावाचे प्रथिन उत्तेजक चेतापेशींच्या साह्याने स्मृतींना नियंत्रित करत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.’’ याच संशोधनातून अल्झायमरसारख्या स्मृतिभ्रंशाच्या आजारावर उपाय शोधण्यासाठी प्रतिबंधात्मक चेतापेशींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांची अनियंत्रित कार्यपद्धती नियंत्रित करण्यासाठी उपचाराची नवीन पद्धत विकसित करावी लागेल. एकंदरीत स्मृतींशी निगडित सर्व आजारांच्या उपचारांसाठी प्रतिबंधात्मक पेशी, उत्तेजक चेतापेशी आणि ‘इएलएफ२अल्फा’ प्रथिनांच्या कार्यपद्धतीवर लक्ष देणे गरजेचे असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: samrat kadam article about Search-Research article Memoirs

Tags
टॉपिकस
Topic Tags: