esakal | सर्च-रिसर्च : उष्माघाताच्या वाढत्या झळा

बोलून बातमी शोधा

Heat-stroke

दरवर्षी हजारो लोकांचे बळी घेणारा हा उष्माघात पुढील ८० वर्षांमध्ये रौद्र रूप धारण करेल, असे संशोधनातून समोर आले आहे. २१०० पर्यंत प्रत्येक वर्षी १.२ अब्ज लोक उष्माघाताचे शिकार होतील, असे यासंदर्भातील अहवालात म्हटले आहे.

सर्च-रिसर्च : उष्माघाताच्या वाढत्या झळा
sakal_logo
By
सम्राट कदम

तळपत्या भास्कराची ‘प्रभा’ भूमंडळातील जीवसृष्टीला वर्षागणिक अधिक तप्त करत आहे. त्याला कारणही तसेच आहे. माणसाला आधुनिक जीवन प्रदान करणाऱ्या औद्योगिक क्रांतीतून निर्माण झालेली संसाधने, यंत्रे, उद्योग यामुळे गेली कित्येक वर्षे पर्यावरणात धो-धो धुराचे लोट सोडले जात आहेत. त्यामुळे कार्बन संयुगाचे प्रमाण वातावरणात मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. उष्णता शोषून धरण्याच्या कार्बनच्या गुणधर्मामुळे जागतिक तापमानही वाढले आहे. त्यामुळे वाढत्या तापमानाने जीवसृष्टीसमोर अनेक नवीन आव्हाने उभी ठाकली आहेत. त्यातील माणसाच्या आरोग्याशी निगडित गंभीर प्रकार म्हणजे उष्माघात! दरवर्षी हजारो लोकांचे बळी घेणारा हा उष्माघात पुढील ८० वर्षांमध्ये रौद्र रूप धारण करेल, असे संशोधनातून समोर आले आहे. २१०० पर्यंत प्रत्येक वर्षी १.२ अब्ज लोक उष्माघाताचे शिकार होतील, असे यासंदर्भातील अहवालात म्हटले आहे. वर्तमानातील उष्माघाताच्या प्रकारांपेक्षा हे प्रमाण तब्बल चारपटीने जास्त आहे.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

‘एन्व्हॉरन्मेंटल रिसर्च लेटर’ या शोधपत्रिकेत नुकताच यासंबंधीचा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. उष्माघात जितका वाढत्या तापमानाशी निगडित आहे, तेवढाच तो वातावरणातील आर्द्रतेशीही निगडित आहे. उष्माघाताशी निगडित या महत्त्वपूर्ण घटकाकडे शास्त्रज्ञांचे थोडे दुर्लक्षच झाले आहे. उष्माघाताचा थेट परिणाम जसा माणसांच्या आरोग्यावर होतो; तसाच तो शेती, अर्थव्यवस्था आणि हवामान बदलावरही होतो. भारतासारख्या उष्णकटीबंधीय देशात उन्हाळ्यात उष्माघातामुळे जाणारे बळी ही एक गंभीर समस्या आहे. ‘दी नॅशनल मेडिकल जर्नल ऑफ इंडिया’च्या आकडेवारीनुसार २०१५ मध्ये उष्माघातामुळे भारतात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या २५०० होती. २००१ च्या तुलनेत हे प्रमाण तब्बल पाचपटीने जास्त होते. देशातील ओडिशा, तेलंगण, आंध्र प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश आदी राज्यांत उष्माघाताच्या बळींची संख्या जास्त असते. उन्हाळ्यात देशातील अनेक राज्यांतील कमाल तापमान ४० ते ४३ अंश सेल्सिअसदरम्यान असते. उष्माघातासाठी एवढे तापमान कारण ठरते.

उष्माघाताचे कारण
शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी त्वचेतील रंध्रांतून घामाचे उत्सर्जन होते; परंतु उष्ण लहरी, अचानक वाढलेले वातावरणातील तापमान शरीराच्या तापमानातही वाढ करते. पर्यायाने शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यात ही यंत्रणा कमी पडते. त्यामुळे वाढलेले शरीराचे तापमान मेंदूसह इतर प्राणभूत अवयवांवर थेट परिणाम करते. उष्माघाताची ही लाट तीव्र असेल, तर व्यक्तीचा मृत्यू होतो.

वातावरणीय बदलांचा अभ्यास
उष्माघातासंबंधीचे हे ‘भविष्य’ वर्तविण्यासाठी शास्त्रज्ञांनी ४० हवामान बदलांच्या प्रक्रियांचा अभ्यास केला. यामध्ये उष्माघातासाठी कारणीभूत तापमान, आर्द्रता, पर्यावरणीय घटक, सूर्यकिरणांचा जमिनीशी असलेला कोन, हवेचा वेग, अवरक्त किरणे यांचा अभ्यास करण्यात आला. या संशोधनानुसार १.५ अंश सेल्सिअसने जागतिक तापमान वाढल्यास वर्षभरात ५० कोटी लोकांवर उष्माघाताचा परिणाम होतो, तर दोन अंश सेल्सिअसने तापमानात वाढ झाल्यास ८० कोटी लोकांना उष्माघाताच्या झळा बसतील. १९व्या शतकाच्या तुलनेत सध्या पृथ्वीचे तापमान १.२ अंश सेल्सिअसने वाढले आहे. पुढील ८० वर्षांत जागतिक तापमानात तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्‍यता शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे. पर्यायाने जगभरातील १.२ अब्ज लोकांना उष्माघाताची थेट झळ पोचेल. उष्माघाताच्या या प्रकोपापासून वाचण्यासाठी जागतिक तापमानवाढीला प्रतिबंध होईल अशा प्रत्यक्ष उपाययोजनांची आवश्‍यकता आहे.