सर्च-रिसर्च :नेमका कसा झाला माणूस?

सम्राट कदम
Monday, 21 December 2020

माणसाचे माणूस बनणे हे त्याच्या जनुकांमधील क्रमावर अवलंबून नसून,त्याच्या वागण्यावर किंवा नियमनावर अवलंबून असल्याचे सिद्ध झाले आहे.यासंबंधीचे संशोधन ‘सायन्स ॲडव्हान्स’ या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे.  

माणसाचे पूर्वज म्हणून माकडांना ओळखले जाते. चिंपाझी, गोरिला या प्राण्यांना तर आपण आपले निकटतम ‘सहकारी’ मानतो. पण, माणसामध्ये असे काय वेगळे आहे, ज्यामुळे तो ‘माणूस’ झाला! माणसाचे हे वेगळेपण शोधण्यासाठी आजवर अनेक ‘थिअरी’ मांडण्यात आल्या. पण, जैविक पातळीवर आपण केव्हा माकडांना मागे टाकले आणि माणूस झालो, हे कळायला मार्ग नव्हता! शास्त्रज्ञांनी अगदी मानवी पेशी, त्यातील प्रथिने, जनुके उलटीपालटी केली, तरी काही माणसाला आधुनिक माणूस करणारा बदल हाती लागत नव्हता. जनुकांच्या क्रमावर शास्त्रज्ञांनी लक्ष दिले, ते उलटेपालटे केले, त्यांचा क्रम आपले जैविक निकटवर्तीय असलेल्या चिंपाझी आणि गोरिलाशी जोडून पाहिला. पण काहीच कळेना! शेवटी शास्त्रज्ञांनी ‘दिमाग की बत्ती जलाई’ आणि जनुकांच्या क्रमाऐवजी त्यांच्या वागण्यावर किंवा त्यांच्या नियमनावर लक्ष केंद्रित केले आणि चिंपाझी, गोरिला यांपेक्षा एक टक्का वेगळ्या असलेल्या जनुक साखळीचे गमक हाती लागले. लॉसने विद्यापीठाच्या स्विस इन्स्टिट्यूट ऑफ बायोइन्फॉर्मेटिक्‍समधील शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले. माणसाचे माणूस बनणे हे त्याच्या जनुकांमधील क्रमावर अवलंबून नसून, त्याच्या वागण्यावर किंवा नियमनावर (एक्‍सप्रेशन) अवलंबून असल्याचे सिद्ध झाले आहे. यासंबंधीचे संशोधन ‘सायन्स ॲडव्हान्स’ या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे.    

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मेंदूतील प्रथिनांमध्ये वेगळेपण
मानवी ‘डीएनए’चा अभ्यास करताना स्विस शास्त्रज्ञांनी जनुकांच्या क्रमाचा विचार न करता, त्यातील प्रथिने, त्यांची संख्या आणि नियमन याकडे लक्ष दिले. माणसाच्या पोटातील आणि हृदयातील जनुकांच्या नियमनाची तुलना मेंदूतील जनुकांच्या नियमनाशी केली, तर मेंदूतील ‘डीएनए’ विकसित होताना निवडण्यात आलेल्या जनुकांमधील प्रथिनांची निवड अधिक सकारात्मक पद्धतीने (पॉझिटिव्ह सिलेक्‍शन) करण्यात आली. जनुकांचे हेच वेगळेपण माणसाच्या आकलनक्षमतेचा विकास करीत आहे. याचाच परिणाम माणसाच्या उत्क्रांतीवर झाल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. या सुरुवातीच्या निरीक्षणांना अधिक पडताळण्यासाठी याचे ‘कॉम्प्युटर सिम्युलेशन’ करण्यात आले. कशा प्रकारे प्रथिने जनुकांच्या नियमनावर परिणाम करतात हे अभ्यास करण्यात आले. यासाठी चिंपाझी, गोरिला आणि माणूस या तिघांच्या जनुकांच्या उत्क्रांतीचे ‘कॉम्प्युटर सिम्युलेशन’ करण्यात आले. त्यामध्ये प्रथिनांमधील हा बदल माणसाला कसा ‘प्रतिभावान’ बनवत जातो, याचा शोध घेण्यात आला. मानवी मेंदूत जनुकांतील प्रथिनांची निवड म्हणजेच त्याचे नियमन चिंपाझी आणि गोरिलाच्या जनुकांपेक्षा वेगळे आहे. माणसाचे हे वेगळेपण निश्‍चित करणाऱ्या या बदलाच्या अधिक अभ्यासासाठी संशोधनाचा मोठा ‘स्कोप’ असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात.  

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एकच पूर्वज असलेल्या दोन प्राण्यांच्या जातीमध्ये आनुवंशिक पद्धतीने होणाऱ्या बदलांचा (म्युटेशन) त्या प्राण्यांना ना फायदा होतो, ना तोटा. या उलट जनुकांच्या एका विशिष्ट भागामध्ये होणारा सकारात्मक बदल, त्या प्राण्यांतील परिवर्तन कायम ठेवण्यास आणि पुनरुत्पादन करण्यास मदत करतो. अशा छोट्याशा बदलातून उत्क्रांतीची दिशाच बदलते. भावी पिढ्यांमध्ये बदल करणारे हे घटक, केवळ काही न्यूक्‍लिओटाईड्‌स असतात. ज्यांच्या बदलाच्या दराचा अंदाज बांधणे कठीण असते. जनुकांमधील सकारात्मक प्रथिनांच्या निवडीच्या या एका टक्‍क्‍याने आपला प्रवास माकडापासून माणसापर्यंत केला आहे. अर्थात हे संशोधन अगदी प्राथमिक स्तरावर आहे. जनुकांमधील महत्त्वपूर्ण बदल सुचविणारे आणि त्याचे मानवी उत्क्रांतीशी नाते जोडणारे हे संशोधन माणसाच्या उत्क्रांतीच्या कोड्याला एक दिशा देईल हे निश्‍चित.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: search research article aboout Man Ancestor

Tags
टॉपिकस
Topic Tags: