सर्च-रिसर्च : मोहीम अवकाश कचऱ्याच्या स्वच्छतेची

सुरेंद्र पाटसकर
Wednesday, 16 December 2020

एखाद्या उपग्रहाला किंवा अवकाशयानाचे मोठे नुकसान करण्यास हे तुकडे पुरेसे आहेत. अवकाश कचरा जसजसा वाढत जाईल, तस तसा उपग्रहांसाठी धोका वाढत जाईल. 

मानवाने अवकाशात उपग्रह सोडायला सुरुवात केल्यापासून आतापर्यंत अनेक प्रकारचा कचरा अवकाशात तयार झाला आहे. हा कचरा आता इतका वाढला आहे की येत्या काही वर्षांत त्याचा फटका उपग्रहांना बसू शकेल. त्यामुळे हा कचरा कमी करण्यासाठीही मोहीम हाती घेतली जाणार आहे. 

अवकाश कचऱ्याच्या स्वच्छतेसाठी पहिली मोहीम २०२५मध्ये आखण्यात येणार आहे. युरोपीय अवकाश संशोधन संस्थेने (इएसए) ही मोहीम आखली आहे.  त्यासाठीच्या करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. स्वित्झर्लंडमधील स्टार्टअप असलेल्या `क्लिअरवन` या कंपनीबरोबर यासाठी १० कोटी डॉलरचा करार करण्यात आला आहे. क्लिअरस्पेस -१ या नावाने ही मोहीम राबविली जाईल. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पृथ्वीच्या कक्षेमध्ये मानवनिर्मित यानांचे, अवकाश स्थानकांचे हजारो तुकडे फिरत आहेत. त्यात लघुग्रहांपासून नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या कचऱ्याचीही भर पडत असते. सॉफ्टबॉलहून मोठ्या आकाराचे २० हजारांहून अधिक अशा कचऱ्याचे तुकडे सध्या पृथ्वीभोवती फिरत असल्याचा अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था `नासा`चा अंदाज आहे. अवकाश संशोधनाचे क्षेत्र जसजसे विस्तारत जाईल, तसेच या क्षेत्रात खासगी कंपन्यांचा समावेश होत जाईल, तसतसा हा कचरा वाढत जाणार आहे. या कचऱ्यापैकी काही तुकडे सुमारे १७५०० मैल प्रतितास (२८,१६३ किलोमीटर प्रतितास) एवढ्या वेगाने फिरत आहेत. एखाद्या उपग्रहाला किंवा अवकाशयानाचे मोठे नुकसान करण्यास हे तुकडे पुरेसे आहेत. अवकाश कचरा जसजसा वाढत जाईल, तस तसा उपग्रहांसाठी धोका वाढत जाईल. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हा कचरा काढण्यासाठीचे क्लिअरस्पेस-१ ही पहिलीच मोहीम असणार आहे. कचरा गोळा करण्यासाठी चार भुजा असलेले विशेष यान तयार करण्यात येत आहे. त्या भुजांच्या साह्याने कचरा धरला जाईल व पृथ्वीच्या वातावरणात आणला जाईल, तेथे तो कचरा जळून जाईल, अशी माहिती युरोपीय अवकाश संशोधन संस्थेने दिली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये उपग्रह सोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अग्निबाणांचे तुकडे गोळा करण्यात येणार आहेत. अवकाशातील कचऱ्याचा उपग्रहांना आणि आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला धोका पोहोचू नये, यासाठी संशोधकांचे अनेक संघ त्यावर काम करत आहेत. अवकाश कचऱ्यामध्ये सॉफ्टबॉलच्या आकारापासून अगदी रेफ्रिजरेटच्या आकाराच्या तुकड्यांचाही समावेश आहे. `क्लिअरवन` मोहिमेत पहिल्यांदा `व्हेगा सेकंडरी पेलोड अॅडॉप्टर`चा (व्हेस्पा) कचरा गोळा केला जाणार आहे. उपग्रह सोडण्यासाठी २०१३मध्ये याचा वापर केला होता. त्याचे वजन ११२ किलो आहे. एखाद्या छोट्या उपग्रहाएवढे त्याचे वजन आहे. ८०१ किमी x ६६४ किमी या कक्षेत सध्या `व्हेस्पा` फिरत आहे. इतर कचरा नंतरच्या टप्प्यात गोळा केला जाणार आहे.

गेल्या साठ वर्षांमध्ये साडेपाच हजारांहून अधिक उपग्रह आणि अग्निबाणांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर कचरा तयार झाला आहे. यानांचे अब्जावधी असे तुकडे आहेत की ज्यांची मोजणी आणि स्थान निश्चितीही करणे शक्य नाही, असे `नासा`चे म्हणणे आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: search research article about ClearSpace-1

Tags
टॉपिकस
Topic Tags: