सर्च रिसर्च  : समुद्रांतील सिमेंटीकरणाचा धोका 

महेश बर्दापूरकर 
Wednesday, 19 August 2020

आम्ही जगभरातील पंधरा किनाऱ्यांवर अभ्यास केल्यानंतर खडबडीत विटांचा उपयोग केवळ मलेशियामधील पेनांगमध्ये फायदेशीर ठरला, मात्र सिंगापूर व ब्रिटनमध्ये या विटांचा कमी "पीएच' तोट्याचा ठरला.

पायाभूत सुविधांचा विकास आणि सिमेंटीकरण यांचा थेट संबंध आहे. रस्त्यांच्या जोडीला समुद्रामध्ये मोठमोठे पूल बांधण्यासाठी कॉंक्रिट ओतले जात आहे. जगभरात सिमेंट कॉंक्रिटचा वापर दरवर्षी दरमाणशी तीन टनांपर्यंत पोचला असून, मानवाकडून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनामध्ये आठ टक्के वाटा एकट्या सिमेंटचा आहे. सिमेंट इंडस्ट्री दरवर्षी सुमारे 2.8 अब्ज टन कार्बन डायऑक्‍साइडची निर्मिती करते. विकासाच्या या नव्या मॉडेलमुळे भविष्यात पर्यावरणाचा प्रश्न गंभीर होणार असल्याचा इशारा संशोधक देत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

भारतात समुद्रामध्ये पूल बांधण्याचे अनेक प्रयोग झाले असून, मुंबईतील बांद्रा-वरळी सी-लिंक याचेच उदाहरण. हॉंगकॉंग-मकाऊ हा समुद्रात बांधलेला जगातील सर्वांत मोठा पूल तब्बल 55 किलोमीटर लांबीचा असून, त्यासाठी वीस अब्ज डॉलर खर्च झाले. त्यासाठी समुद्रात दहा लाख टन कॉंक्रिट ओतले गेले! त्याचा पिंक डॉल्फिन या प्रजातीला मोठा फटका बसला व अनेक डॉल्फिन मृत्युमुखी पडले. समुद्रात बंदरे, संरक्षक भिंती उभारण्यासाठी सिमेंटला पर्यायही नसतो. चीनमधील 60 टक्के समुद्रकिनारे कॉंक्रिटने भरले आहेत, तर अमेरिकेत 14 हजार मैल लांबीच्या किनाऱ्यावर केवळ सिमेंट दिसते. सिमेंटचा पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणारे संशोधक ऍलेक्‍स रॉजर्स यांच्या मते, ""सिमेंट समुद्रातील परिसंस्थेचा नाश करीत आहे. ते सहज उपलब्ध होते व स्वस्तही आहे. मानवाला समुद्रातील बांधकामांसाठी कमी नाशकारक पर्यायांचा लवकरात लवकर विचार करावा लागेल.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सिमेंट पर्याय म्हणून इको-कॉंक्रिट नावाचे पर्यावरणपूरक कॉंक्रिट विकसित झाले आहे. मरीन इकोलॉजिस्ट शिम्रित फिनकेल यांनी पुनर्प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये 70 टक्के सिमेंटची मळी (पोलाद उद्योगातून तयार होणारे उपउत्पादन) वापरून हे सिमेंट तयार केले असून, त्यात कार्बनचे प्रमाण अत्यल्प आहे. ""सिमेंटचा पृष्ठभाग निसरडा असल्याने त्यावर समुद्री जिवांना वाढणे अशक्‍य बनते. त्याला पर्याय म्हणून ओबडधोबड पृष्ठभाग व खळगे, खड्डे व भेगा असलेल्या इको टाइल्सचा वापर केल्यास समुद्री जिवांना वस्ती करायला, शिकाऱ्यांपासून लपायला जागा मिळते व अशा प्रकारच्या भिंती समुद्रातील जैवविविधतेतही भर घालतात. हॉंगकॉंगसारख्या देशात समुद्रात भर घालून जमीन तयार केली जाते आहे. आता तेथे इको टाइल्स, इको पॅनेलचा उपयोग करून संरक्षक भिंती उभारल्या जात आहेत. अशा पर्यावरणपूरक भिंती उभारल्याने समुद्री जिवांची संख्या  दुप्पट झाल्याचेही दिसून आल्याचे हॉंगकॉंग विद्यापीठातील शास्त्रज्ञांची निरीक्षणे सांगतात. त्यापासून प्रेरणा घेत हॉंगकॉंगमधील टुंग चुंग या शहरात 130 हेक्‍टर परिसरात 3.8 किलोमीटर लांबीचा पर्यावरणपूरक समुद्रकिनारा विकसित करण्याचे काम सुरू आहे. हे काम 2023मध्ये पूर्ण होईल. या समुद्रकिनाऱ्यामुळे समुद्री जैवविविधता वाढण्यास मदत होईल व लोकांना किनाऱ्यावर बसून समुद्री जिवांना पाहण्याचा आनंदही लुटता येईल. या इको-विटांचा "पीएच' समुद्राच्या पाण्याएवढाच असल्याचे तेथे खेकडे, शिंपले वाढल्याचे आढळले आहेत,'' असे फिनकेल सांगतात. 

या पर्यायांशी सर्वंच संशोधक सहमत नाहीत. ऑस्ट्रेलियातील मरीन बायोलॉजिस्ट बेथ स्ट्रेन यांच्या मते, ""या पर्यावरणपूरक सिमेंटचे परिणाम संमिश्र आहेत. काही ठिकाणी ते प्रवाळांसाठी फायदेशीर ठरले आहेत, तर काही ठिकाणी समुद्रातील जिवांसाठी. आम्ही जगभरातील पंधरा किनाऱ्यांवर अभ्यास केल्यानंतर खडबडीत विटांचा उपयोग केवळ मलेशियामधील पेनांगमध्ये फायदेशीर ठरला, मात्र सिंगापूर व ब्रिटनमध्ये या विटांचा कमी "पीएच' तोट्याचा ठरला. प्रत्येक ठिकाणची पर्यावरणविषयक आव्हाने वेगळी असल्याने आपल्याला वेगळा विचार करावा लागेल. यामध्ये समुद्री गवताची बेटे, खारफुटीची जंगले, प्रवाळाच्या भिंती, मिठाची दलदल यांचीही मदत घ्यावी लागेल. समुद्राची पातळी येत्या 80 वर्षांत एका मीटरने वाढण्याची भीती असल्याने या गोष्टींचा आत्तापासून विचार करावा लागेल.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: search research article about Eco-concrete