सर्च-रिसर्च :  प्रयोग अवकाशाच्या रहस्यभेदाचा!

space
space

बाह्य ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी सोडण्यात आलेल्या ‘व्हॉएजर-२’ यानाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आपल्या सूर्यमालेची कक्षा ओलांडली. परंतु, त्याचे कार्य अजूनही सुरू आहे. आता सूर्यमालेबाहेरील माहिती त्याने पाठविण्यास सुरुवात केली आहे. ही बाब खगोलशास्त्रज्ञांच्या दृष्टीने अत्यंत आश्चर्यकारक आहे. ‘व्हॉएजर-२’ जसजसे पुढे जात आहे, तसतसे अवकाशातील घनता वाढल्याचे निरीक्षण यानाने नोंदविले आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अवकाशातील घनता वाढल्याचे निरीक्षण यापूर्वी ‘व्हॉएजर-१’ या यानानेही नोंदविले होते. व्हॉएजर -१ यान तर २०१२मध्ये सूर्यमाला ओलांडून पुढे गेले आहे. व्हॉएजर-१ची निरीक्षणे बरोबर असल्याचे ‘व्हॉएजर-२’ने पाठविलेल्या माहितीतून सिद्ध झाले आहे. वाढलेली घनता ही तेथील माध्यमाचा तात्पुरता परिणाम असू शकतो (व्हेरी लोकल इटरस्टेलर मीडियम) असे तज्ज्ञांचे मत आहे. 

पृथ्वीवरून १९७७मध्ये प्रक्षेपित झालेले ‘व्हॉएजर २’ यान सूर्यमाला ओलांडणारी दुसरी मानवनिर्मित वस्तू आहे. यापूर्वी ‘व्हॉएजर १’ने २५ ऑगस्ट २०१२मध्ये सूर्यमाला ओलांडली. त्यावेळी ‘व्हॉएजर -१’ हे पृथ्वीपासून १२१.६ अॅस्ट्रॉनॉमिकल युनिट, म्हणजे सूर्य आणि पृथ्वी यांच्या अंतराच्या १२१.६ पट, म्हणजेच साधआरणतः १८.१ अब्ज किलोमीटर, अंतरावर होते. ही दोन्ही याने कार्यरत आहेत. ‘व्हॉएजर २’ने ५ नोव्हेंबर २०१८ रोजी सौरमाला ओलांडली. या दिवशी ‘व्हॉएजर २’ने सूर्याकडून फेकल्या जाणाऱ्या स्थिर प्रवाही कणांच्या शोधात अचानक घसरण झाली. ‘व्हॉएजर २’ने हेलिओपोज ओलांडल्याचे ते निदर्शक आहे. हेलिओपोज ही सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राची सीमा आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते, हेलिओपोज ही सूर्यमालेची सीमा नाही. कारण त्यापलिकडे असलेल्या धूमकेतूंवर आपल्या सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. अवकाश ही निर्वात पोकळी असल्याचे म्हटले जाते, मात्र प्रत्यक्षात तसे पूर्णपणे नाहीये. अवकाशात पदार्थाची घनता कमी आहे, परंतु, घनता आहेच. सौरवाऱ्यामध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांची सरासरी घनता ३ ते १० कण (पार्टिकल) प्रति घनसेंटीमीटर एवढी आहे. सूर्यापासून जसजसे दूर जाऊ तशी ही घनता कमी होत जाते. ‘मिल्की वे’ या आपल्या आकाशगंगेतील या दोन्ही कणांची दोन ताऱ्यांच्या दरम्यानची सरासरी घनता ०.०३७ कण प्रति घनसेंटीमीटर असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. तर हेलिओस्फिअरमधील प्लाझ्माची घनता ०.००२ इलेक्ट्रॉन प्रतिघनसेंटीमीटर असल्याचे मानले जाते. ‘व्हॉएजर’ यान हेलिओपॉज भागातून पुढे जात असताना प्लाझ्माची जी कंपने निर्माण झाली, त्याच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ‘व्हॉएजर १’ जेव्हा हेलिओपॉजमधून २३ ऑक्टोबर २०१३ रोजी पुढे गेले तेव्हा प्लाझ्माची घनता ०.०५५ इलेक्ट्रॉन प्रति घनसेंटीमीटर एवढी मोजली गेली होती. ‘व्हॉएजर २’ यान गुरू, शनि, युरेनस आणि नेप्चून यांचा प्रवास करून ५ नोव्हेंबर २०१८ रोजी हेलिओपॉज भागात पोचले. त्यानंतर ३० जानेवारी २०१९ रोजी मोजलेल्या प्लाझ्माची घनता ०.०३९ इलेक्ट्रॉन प्रति घनसेंटीमीटर असल्याचे दिसून आले. आणखी २० अॅस्ट्रॉनॉमिकल युनिट प्रवास केल्यानंतर दोन्ही यानांनी प्लाझ्माची घनता वाढल्याचे निरीक्षण नोंदविले. ‘व्हॉएजर-१’ने ०.१३ इलेक्ट्रॉन प्रति घनसेंटीमीटरने तर ‘व्हॉएजर-२’ने ०.१२ इलेक्ट्रॉन प्रति घनसेंटीमीटरने घनता वाढल्याचे नोंदविले. पृथ्वीच्या वातावरणातील प्लाझ्माची घनता १०चा १३ घात घनसेंटीमीटर एवढी आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अथांग अवकाश मानवासाठी नेहमीच कुतुहलाचा विषय आहे. त्यातील एक रहस्य उलगडण्याचा प्रयत्न या संशोधनातून करण्यात आला आहे. आयोवा विद्यापीठातील डब्लू. एस. कुर्थ आणि डी. ए. गुर्नेट यांनी केलेले हे संशोधन अॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्समध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com