सर्च-रिसर्च  : समुद्रतळाचा नकाशा 

सुरेंद्र पाटसकर 
Tuesday, 23 June 2020

जगभरातील अनेक देशांनी समुद्राशी संबंधित अनेक प्रकल्प राबविले आहेत.या माहितीची देवाण-घेवाण झाली,तर समुद्रतळाच्या अभ्यासाला हातभार लागेल, असेही मत फिलिप्स यांनी व्यक्त केले आहे.

समुद्राच्या तळाची आपल्याला अत्यंत कमी माहिती आहे. ही माहिती मिळविण्यासाठी पृथ्वीवरील सर्व समुद्रतळाचा नकाशा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. एकूण समुद्रतळापैकी एकपंचमांश समुद्रतळाचा नकाशा तयार करण्यात आल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. 

समुद्रतळाची माहिती मिळविण्याच्या उद्देशाने ‘निप्पॉन फाउंडेशन-जनरल बॅथीमेट्रिक चार्ट ऑफ द ओशन’ हा प्रकल्प २०१७ मध्ये सुरू करण्यात आला. त्या वेळी केवळ ६ टक्के समुद्रतळाची माहिती होती. आता त्यात १५ टक्क्यांची भर पडली आहे. त्यामुळे आता १४.५ दशलक्ष चौरस किलोमीटरचा नकाशा तयार करण्यात यश मिळाल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. म्हणजे, ऑस्ट्रेलियाच्या सुमारे दुप्पट आकाराचा हा नकाशा आहे. पुढील दहा वर्षांत उर्वरित ८०-८१ टक्के भागाचा नकाशा तयार करण्याचे आव्हान आहे, असे या प्रकल्पाचे संचालक जेमी मॅकमायकेल-फिलिप्स यांनी म्हटले आहे. उपग्रहांपासून पाण्याखाली जाऊ शकणाऱ्या रोबोंपर्यंत विविध उपकरणांची मदत यासाठी घेण्यात आली आहे. या प्रकल्पात जगभरातील अनेक देशांचा सहभाग आहे. 

जगभरातील अनेक देशांनी समुद्राशी संबंधित अनेक प्रकल्प राबविले आहेत. तसेच, विविध प्रकारचे संशोधनही केले आहे. त्यांची माहिती त्या त्या देशांच्या सरकारांकडे आहे. या माहितीची देवाण-घेवाण झाली, तर समुद्रतळाच्या अभ्यासाला हातभार लागेल, असेही मत फिलिप्स यांनी व्यक्त केले आहे. 

जागतिक तापमानवाढ हा अत्यंत काळजीचा विषय आहे. हवामानातील बदल तापमानवाढीला कारणीभूत असलेला एक घटक आहे. उष्णता वाढण्यात समुद्राच्या पाण्याचा हातभार मोठ्या प्रमाणात असतो. समुद्राच्या पाण्याची पातळी कोणत्या भागात वाढू शकते, याचा अंदाज समुद्रतळाच्या अभ्यासातून येऊ शकेल, असेही शास्त्रज्ञांना वाटते. मात्र, या अभ्यासासाठी जहाजांपासून सोनार, दिशादर्शक उपकरणे अशा अत्याधुनिक गोष्टींची गरज आहे. 

ब्रिटनमधील ओशन इन्फिनिटी या कंपनीने समुद्राच्या अभ्यासासाठी अनेक संपूर्ण यांत्रिक बोटींची निर्मिती केली आहे. मानवी हस्तक्षेपाशिवाय या बोटी विविध उपकरणांद्वारे माहिती गोळा करू शकतात. त्यांचीही मदत या प्रकल्पासाठी घेतली जात आहे. 

पृथ्वीचा ७० टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. पण, त्याबद्दल आपल्याला फारशी माहिती इतके दिवस नव्हती. गेल्या ४०-५० वर्षांपासून महासागरांचा सखोल अभ्यास सुरू झाला. याचे प्रमुख कारण समुद्राच्या तळातून खनिजे मिळविण्याचा प्रयत्न, हे होते. पेट्रोलियमच्या साठ्यासोबतच मँगेनिजचा साठा शोधण्याचे प्रकल्प अनेक वर्षांपासून विविध देशांनी राबविले आहेत. पाण्याखालील जमिनीचा अभ्यास करता आला, तर समुद्राच्या तळाशी होणाऱ्या भूकंपांचीही माहिती अधिक अचूकपणे मिळवता येईल व त्यांची कारणेही समजण्यास मदत होईल. तसेच, पाण्याखाली पृथ्वीचे कवच किती कठीण आहे, याचीही माहिती मिळवता येऊ शकेल. यातून एक नवे जग समोर येईल. केवळ खडकांची नव्हे, तर पाण्याखालील जीवसृष्टीची माहिती मिळविण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. 

कशासाठी हवी माहिती 
- सागरी वाहतुकीच्या दिशादर्शनासाठी 
- पाण्याखालून केबल्स आणि पाइपलाइन टाकण्यासाठी 
- पाण्याखालील जीवसृष्टीची माहिती मिळविण्यासाठी 
- पाण्याच्या प्रवाहांची माहिती आणि कारणे जाणून घेण्यासाठी 
- भविष्यातील हवामानबदलांचा अंदाज घेण्यासाठी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: search research article about Map of the seabed

Tags
टॉपिकस
Topic Tags: