सर्च-रिसर्च : डेंगीशी लढ्याची यशोगाथा

जयंत गाडगीळ
Friday, 18 December 2020

डेंगी ताप हा गेली काही वर्षे दरवर्षी सुमारे ४० कोटी लोकांना भेडसावणारा आजार आहे.विशिष्ट विषाणूचा डासांमार्फत प्रादुर्भाव झाल्याने तो होत असतो.हिवताप आणि इतर अनेक आजार डासाने रोगप्रसार केल्याने होतात.

जगभर ‘कोरोना’चा धुमाकूळ चालू होत असतानाच डासांचा वापर करून दुसऱ्या एका साथीवर मात करण्याचा यशस्वी प्रयत्न काहीसा झाकोळला होता. ‘नेचर’ या विज्ञानविषयक नियतकालिकाने या वर्षीचे विज्ञानातील सर्वोत्तम दहा प्रयत्न आणि व्यक्तींमध्ये डॉ. आदि उतरिनी यांच्या या प्रयत्नाची योग्य दखल घेतली आहे. 

डेंगी ताप हा गेली काही वर्षे दरवर्षी सुमारे ४० कोटी लोकांना भेडसावणारा आजार आहे. विशिष्ट विषाणूचा डासांमार्फत प्रादुर्भाव झाल्याने तो होत असतो. हिवताप आणि इतर अनेक आजार डासाने रोगप्रसार केल्याने होतात. त्यामुळे जागतिक डास प्रकल्पामध्ये या विकारांशी सामना करण्याबद्दल संशोधन होत होते. सुमारे दशकभर चाललेल्या या प्रकल्पाची सुरुवात ऑस्ट्रेलियामध्ये झाली आणि डेंगीचा प्रादुर्भाव असणाऱ्या अकरा देशांमध्ये हे काम चालू झाले. डेंगीतापाचा प्रसार एडिस इजिप्ती या जातीच्या डासामार्फत होतो. काही संशोधनामध्ये असे लक्षात आले होते, की वोल्बाकिया नावाचा ग्राम निगेटिव्ह बॅक्‍टेरिया हा किटकांच्या शरीरात सहजीवन करणारा जीव आहे. तो एकूण किटकांच्या प्रजातींपैकी ६५ टक्के प्रजातींमध्ये राहातो. तसेच तपासलेल्या डासांपैकी २८ टक्के डासांमध्ये याचा प्रादुर्भाव झालेला होता. याचे असे वैशिष्ट्य लक्षात आले, की वोल्बाकियाची लागण झालेल्या ॲनोफेलिस डासात, हिवतापाचा प्लास्मोडियम वायवॅक्‍स हा जंतू येऊ शकत नाही. तसेच एडिस इजिप्ती जातीच्या डासात वोल्बाकियाची लागण झाली असेल तर अशा डासांमध्ये डेंगीच्या जंतूची लागण होत नाही.  मग मोनाश विद्यापीठ आणि इतरत्र मुद्दाम डासांमध्ये वोल्बाकियाची लागण करण्याची प्रक्रिया चालू झाली.

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

डासांचे संवर्धन करायचे, त्यांच्या विशिष्ट ग्रंथीमध्ये हव्या त्या जंतूंची लागण करायची, लागण झालेले डास वेगळे करून त्यांची मोठ्या प्रमाणावर पैदास करायची, असे मुद्दाम वाढवलेले डास एकूण डासांमध्ये सोडून द्यायचे, असे सुमारे दोन- तीन वर्षे करायचे होते. हळुहळू या डासांची संख्या एकूण डासांच्या संख्येमध्ये वाढू द्यायची. जसजसे डास स्थानिक वातावरणाला रुळतील व नैसर्गिक प्रजनन करतील, तसतशी लागण झालेल्या किंवा होऊ शकणाऱ्या डासांची संख्या घटेल. व माणसांना डेंगी होण्याचे प्रमाण घटेल. अशी ही योजना होती.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

इंडोनेशिया हा डेंगीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव असणारा देश होता. तेथे दोन- तीन वर्षे चालणाऱ्या चाचणीला सुरुवात झाली. योग्यकर्ता नावाच्या शहरात, साधारण सारख्याच लोकसंख्येचे २४ प्रभाग निवडण्यात आले. त्यातील बारा प्रभागांमध्ये वोल्बाकियाची लागण झालेले डास मोठ्या प्रमाणावर सोडले. उरलेल्या बारा विभागांमध्ये नेहमीचे डेंगी प्रतिबंधाचे उपाय करण्यात आले. हा प्रयोग सुमारे तीन लाखांहून अधिक लोकवस्तीवर झाला. डॉ. आदि उतारिनी यांच्या देखरेखीखाली चालू असलेला प्रयोग ‘कोविड’च्या वातावरणातही चालू राहिला. ३ ते ४५ वर्षे वयोगटातील आठ हजारांहून अधिक रुग्णांना विविध प्रकारच्या तापांची लागण झाली. त्यात डेंगीचे प्रमाण किती आहे हे मोजण्यात आले. इतर विभागांशी तुलना करता वोल्बाकियाचे डास सोडलेल्या विभागांमध्ये डेंगीचा प्रादुर्भाव ७७ टक्‍क्‍यांनी कमी झाला. या उपचार प्रकाराचे प्रमुख वैशिष्ट्य असे, की हेच डास झिका व्हायरस आणि चिकुनगुनियाचाही प्रसार करतात. मात्र वोल्बाकियाचे डास या रोगांच्या जंतूनाही प्रतिबंध करतात. एका दृष्टीने हे जंतू आणि त्याचे डास उपयोगी किटकांमध्ये गणता येतात. इतर डासांप्रमाणे फवारणी, विषारी धूर न करता डेंगीचा प्रतिबंध होतो. त्यामुळे पारंपरिक फवारणीमध्ये होणारे वायूप्रदूषण टळते. त्यादृष्टीने हा मार्ग बराचसा पर्यावरणस्नेही आहे. सुमारे चार लाख लोकवस्तीच्या शहरात मिळालेले यश लक्षणीयच आहे. एरवी २०१९ या वर्षातील सर्वात आव्हानात्मक आजार म्हणून डेंगी असेल असे भाकित जागतिक आरोग्य संघटनेने केले होते. डेंगी, झिका व्हायरस चिकुनगुनियावर हुकमी उपाययोजना नव्हती. तसेच औषधे मिळाली तर ती परवडणारी हवीत. प्लाझ्मा द्यायची वेळ आली तर तो हव्या तितक्‍या प्रमाणात उपलब्ध हवा. या अडचणी बाजूला करणारी, वेगळ्याच दिशेची यशोगाथा आता तशाच चाचण्या करण्यासाठी विविध देशांना उद्युक्त करणारी आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: search research article about Mosquitoes