
कमी तीव्रतेचे ताणतणाव आयुष्यात लहानपणी आले तर पुढे जाऊन ताणतणावांना हाताळणे अधिक सोपे जाते; पण त्याच चिंता तीव्र स्वरूपाच्या असतील तर ते शक्य नसते, असा या अभ्यासाचा निष्कर्ष.
काही वेळा मनाला इतके औदासीन्य येते, की माणसाची सहनशक्ती संपते आणि तो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. मात्र, काही जण अत्यंत खडतर परिस्थितीलाही निर्धाराने तोंड देत असतात. अपयशाने न खचता पुन्हा उमेदीने उभे राहतात. माणसाच्या वर्तनातल्या या दोन्ही तऱ्हा सर्वपरिचित आहेत. तरीही एकूणच तणावविरहित जीवन असणे सगळ्यात चांगले, अशीच कोणाचीही भावना असेल. आयुष्य चढ-उतारांनी भरलेलेच असते. त्याला तोंड देण्यासाठी मानसिक कणखरपणा आवश्यक असतो. संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून असे दिसले आहे, की काहीसा मानसिक ताण असणे मुलांना भावी आयुष्यात कणखर बनवायला मदतच करते. ताणतणाव हाताळूनच त्यांच्यात सामना करण्याची जिद्द निर्माण होते, असा या प्रयोगाचा निष्कर्ष आहे.
एखाद्या वाईट अनुभवानंतर पुन्हा जिद्दीने उभे राहण्याच्या क्षमतेवर ताण आणि वेदना यांचा किती प्रभाव असतो, याचा अभ्यास अमेरिकेत काही वर्षांपूर्वी संशोधकांनी केला होता. सुमारे २४०० व्यक्तींचे सर्वेक्षण त्या अभ्यासात करण्यात आले आणि त्या व्यक्तींना त्यांनी आयुष्यात कोणता वेदनादायी अनुभव घेतला आहे का आणि आता त्यांची मानसिक स्थिती कशी आहे इत्यादी प्रश्न विचारले होते. ज्यांनी तीव्र स्वरूपाच्या ताणतणावांचा सामना केला नव्हता; पण मध्यम स्वरूपांच्या ताणतणावांना ते सामोरे गेले होते अशा लोकांत समस्यांतून पुन्हा उभे राहण्याची जिद्द अधिक प्रमाणात निदर्शनाला आली. अर्थात ते सर्वेक्षण होते. मात्र, तेच निष्कर्ष प्रयोगांतून सिद्ध होतात का हेदेखील पाहणे गरजेचे होते. कॅलिफोर्नियामधील स्टॅनफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी पौगंडावस्थेत न आलेल्या माकडांवर काही प्रयोग केले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
या प्रयोगांत माकडांना विविध गटांत विभागण्यात आले. पहिल्या गटातील माकडांना कोणत्याही तणावापासून दूर ठेवले. त्यांना त्यांच्या आई आणि भावंडांबरोबर ठेवण्यात आले. त्यांना पाणी, अन्न मुबलक देण्यात आले; काही खेळणीही त्यांना देण्यात आली. दुसऱ्या गटातील माकडांना काहीसा तणाव येईल अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली. म्हणजे सलग दहा दिवस रोज एक तास या माकडांना आपल्या भावंडांपासून दूर ठेवण्यात आले. तिसऱ्या गटातील माकडांच्या बाबतीत आणखी तीव्र स्वरूपाचा तणाव निर्माण करण्यात आला. त्यांना रोज एक तास केवळ भावंडांपासूनच नव्हे तर त्यांच्या आईपासूनदेखील दूर ठेवण्यात आले. आणखी गटांतदेखील माकडांवर प्रयोग करण्यात आले. त्यात त्या माकडांना या सगळ्या तणावपूर्ण परिस्थितीबरोबरच इंजेक्शन देऊन त्यांच्या वेदना वाढवण्यात आल्या. एकूण प्रत्येक गटातील माकडांना देण्यात येणारा ताणतणाव वेगवेगळ्या स्वरूपाचाच नव्हे; तर वेगवेगळ्या तीव्रतेचादेखील होता. दहा आठवड्यांनंतर प्रयोगांतील माकडांना आपापल्या आईबरोबर अपरिचित पिंजऱ्यात हलवण्यात आले आणि कोणत्या गटातील माकडे आईपासून स्वतंत्र होतात आणि हे नवे वसतिस्थान स्वीकारतात याचे निरीक्षण अभ्यासकांनी केले. त्याबरोबर कॉर्टिसॉल या संप्रेरकाची मात्रा रक्तात किती प्रमाणात आहे, याचादेखील लेखाजोखा ठेवला. कॉर्टिसॉलचा संबंध चिंता, काळजी यांच्याशी आहे. तेव्हा अभ्यासकांना असे आढळले, की पहिल्या आणि दुसऱ्या गटातील माकडांनी आपापल्या आईपासून स्वतंत्र होऊन नव्या वसतिस्थानाशी जुळवून घेतले. याचाच अर्थ त्यांच्यात काळजी, चिंता, दडपण यांचे प्रमाण कमी होते. रक्तातील कॉर्टिसॉलच्या प्रमाणाने हेच निष्कर्ष अधोरेखित केले. अन्य गटातील माकडांच्या तुलनेत पहिल्या आणि दुसऱ्या गटातल्या माकडांच्या बाबतीत वाढलेले कॉर्टिसॉलचे प्रमाण लवकर खाली आले.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
थोडक्यात, कमी तीव्रतेचे ताणतणाव आयुष्यात लहानपणी आले तर पुढे जाऊन ताणतणावांना हाताळणे अधिक सोपे जाते; पण त्याच चिंता तीव्र स्वरूपाच्या असतील तर ते शक्य नसते, असा या अभ्यासाचा निष्कर्ष. माणसांना तो जसाच्या तसा लागू होईल का, हे सांगता येत नसले, तरीही तोच कल माणसांतदेखील असू शकतो.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा