सर्च रिसर्च : तुम्ही सुपस्मेलर आहात? 

महेश बर्दापूरकर 
Wednesday, 16 September 2020

सुपरस्मेलर्समध्ये मेंदूतील वासाची माहिती घेणे, तो ओळखणे व लक्षात ठेवणे या गोष्टी करणाऱ्या भागात मोठ्या हालचाली होत असल्याचेही आढळले. मात्र, यामागचे कारण सापडले नाही

कोरोनाच्या अनेक लक्षणांपैकी एक वास न येणे, हे आहे. मात्र, एका नव्या संशोधनात काही लोकांना वास घेण्याची "सुपरपॉवर' मिळालेली असते, असे आढळले. या स्थितीला "हायपरोस्मिया' असे म्हटले जाते. संशोधकांना याचे नक्की कारण समजले नसले, तरी त्या व्यक्तीचे आरोग्य, महिलांमधील गरोदरपण, मेंदूतील विशिष्ट बदल व व्यक्तीने स्वतःला वास घेण्यासाठी प्रशिक्षित करणे ही कारणे असल्याचे समोर आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सामान्यपणे हायपरोस्मिया असलेल्या व्यक्तीला सुखद वास अधिक चांगल्याप्रकारे येतात, तर इतरांना घाणेरडे वास पटकन येतात. काही संसर्गजन्य आजार, अर्धशिशी, शरीरातील द्रवपदार्थांचे असंतुलन, हार्मोन्सची कमतरता व काही विशिष्ट औषधोपचारांमुळे हायपरोस्मिया होतो. या आजारांमुळे शरीरातील इलेक्‍ट्रोलाइट्‌सवर परिणाम होऊन वासाचे संदेश ग्रहण करणारे भाग प्रभावित होत असल्याचे संशोधकांना आढळले. हार्मोन्समधील काही बदलांमुळे वासाचे पृथःकरण करणाऱ्या "ऍनोस्मिन' या प्रोटिनवर परिणाम होऊन वास घेण्याची क्षमता खूप वाढते, असेही आढळले. काही जणांमध्ये वासाला वाहून नेणाऱ्या विशिष्ट प्रोटिन्सचे जेनेटिक कोडिंग अधिक विकसित झालेले असल्याने त्यांना वास घेण्याची सुपरपॉवर मिळते. अनेक महिलांना गरोदरपणामध्ये सिगारेटच्या धुरासारखे एरवी न येणारे वासही तीव्रपणे यायला सुरवात होते. संशोधकांनी पन्नास विविध पाहण्यांद्वारे गरोदरपणात वास घेण्याच्या क्षमतेत बदल होत असल्याचा निष्कर्ष काढला, मात्र या महिला काही विशिष्ट वासांबद्दलच संवेदनशील असल्याचेही समोर आले. सुपरस्मेलर्समध्ये मेंदूतील वासाची माहिती घेणे, तो ओळखणे व लक्षात ठेवणे या गोष्टी करणाऱ्या भागात मोठ्या हालचाली होत असल्याचेही आढळले. मात्र, यामागचे कारण सापडले नाही, तसेच हा प्रक्रिया तात्पुरती असल्याचेही समोर आले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संशोधकांची 2019मध्ये केलेल्या एका संशोधनात सुपरस्मेलर्सचे मेंदू सर्वसामान्य लोकांपेक्षा वेगळ्या प्रकारे काम करतात का, हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सुपरस्मेलर्स व 20 सर्वसामान्य लोकांची तुलना केली गेली. ब्रेन स्कॅनरच्या मदतीने मेंदूतील वासाशी संबंधित भागतील ग्रे मॅटरचे प्रमाण तपासले गेले. त्यामध्येही सुपरस्मेलर्समध्ये वासाची माहिती घेणे व तो लक्षात ठेवण्याच्या भागात मोठ्या हालचाली आढळल्या. मात्र, ही प्रक्रिया गुणसूत्रांच्या मदतीने होते अथवा त्यांचा मेंदू ही क्रिया शिकला, याबद्दल संशोधक ठोस निष्कर्षापर्यंत पोचू शकले नाहीत. वास आणि स्मरणशक्ती एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत, हे सिद्ध झालेच आहे. याबाबत 2014मध्ये झालेल्या एका अभ्यासात हेच हायपरोस्मियाचे मूळ असावे, असे समोर आले. त्यासाठी इतरांपेक्षा वास घेण्याची क्षमता अधिक असलेल्या 55 जणांचा अभ्यास केला गेला. त्यांची तुलना वास घेण्याची सामान्य क्षमता असलेल्या त्याच वयोगटाच्या लोकांशी केली गेली. सुपरस्मेलर्सना मानवी शरीरातील घामासारखे वास घेतल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया नकारात्मक होती व त्याबद्दलच्या आठवणी दुःखदायक असल्याचे दिसले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सुपरस्मेलर ही शक्ती कायमची आहे की तात्पुरती या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी संशोधकांनी 230 स्वयंसेवकांवर चाचण्या केल्या. यामध्ये विशिष्ट उपकरणाच्या माधम्यातून एकाच वासाचे अगदी कमी ते खूप तीव्र असे आठ भाग करून ते स्वयंसेवकांना हुंगण्यास दिले गेले. या लोकांनी त्यांच्या नाकाला हे विशिष्ट वास घेण्यासाठी प्रशिक्षित केल्याचे संशोधकांना आढळले. त्यातील 2 टक्के लोक पहिल्याच चाचणीत "सुपरस्मेलर' असल्याचे आढळले. आणखी दहा टक्के लोकांवर एक आठवड्याच्या अंतराने चाचण्या घेतल्यानंतर तेही "सुपरस्मेलर्स' असल्याचे दिसले. पुढील दहा आठवडे चाचण्या घेतल्यानंतर त्यांनी सुरवातीला ओळखलेल्या वासाच्या तीन पातळ्या खालचे वासही ओळखण्यास सुरवात केली. सुपरोस्मिया दिसून आलेल्या जवळपास सर्वच प्रकरणांत अगदी सौम्य वास घेता येणे अचानकच बंद झाले. यावरून सुपरस्मेलर ही प्रक्रिया काही वासांत छोट्या कालावधीसाठी असते, हेही सिद्ध झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: search research article about Supsmeller