esakal | सर्च-रिसर्च : ‘ई-प्लेन’मधून प्रवासी वाहतूक!

बोलून बातमी शोधा

सर्च-रिसर्च : ‘ई-प्लेन’मधून प्रवासी वाहतूक!

जगभरात वाहनांप्रमाणे विमानांद्वारे होणारे हवेचे प्रदूषणही प्रचंड आहे. त्यामुळे इलेक्‍ट्रिक इंजिनावर धावणारे विमान, हे स्वप्न जगभरात पाहिले जात आहे आणि त्यावर कामही सुरू आहे.

सर्च-रिसर्च : ‘ई-प्लेन’मधून प्रवासी वाहतूक!
sakal_logo
By
महेश बर्दापूरकर

प्रदूषण हा जगभरात चर्चेचा आणि चिंतेचा विषय बनला असून, त्यावर उपायांसाठी अनेक प्रयोग सुरू आहेत. भारतात पेट्रोल व डिझेलऐवजी विजेवर चालणाऱ्या मोटारींची मोठी चर्चा आहे. मोटारी व सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या बस इलेक्‍ट्रिक झाल्यास प्रदूषणावर मोठ्या प्रमाणावर मात करता येऊ शकेल. जगभरात वाहनांप्रमाणे विमानांद्वारे होणारे हवेचे प्रदूषणही प्रचंड आहे. त्यामुळे इलेक्‍ट्रिक इंजिनावर धावणारे विमान, हे स्वप्न जगभरात पाहिले जात आहे आणि त्यावर कामही सुरू आहे. ब्रिटिश कोलंबियामध्ये नुकतेच इलेक्‍ट्रिक ऊर्जेच्या मदतीने सहा प्रवासीसंख्या असलेले ‘हॅविललॅंड डीएचसी - २’ या जातीचे विमान (ई-प्लेन) हवेत उडाले. हे नऊ सिलिंडर असलेले विमान त्यादिवशी कोणताही आवाज न करता हवेत झेपावले, हेच काय ते वेगळेपण!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘मॅग्नी एक्‍स’ या कंपनीने अनेक महिन्यांच्या प्रयत्नांनंतर या विमानासाठीचे इलेक्‍ट्रिक इंजिन विकसित केले. ढगाळ हवा आणि पावसामुळे विमान चार मिनिटांत पुन्हा उतरविण्यात आले. मात्र, पूर्णपणे इलेक्‍ट्रिक इंजिनाच्या मदतीने झालेले पहिले व्यावसायिक उड्डाण, अशी त्याची नोंद झाली. ‘इलेक्‍ट्रिक उड्डाणांच्या क्रांतीतील हे पहिले पाऊल ठरले. आम्ही ‘कार्बन न्यूट्रल’ होण्याचे प्रयत्न २००७ मध्येच सुरू केले आहेत. ‘ई-प्लेन’ हा आमचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता मार्गी लागतो आहे,’ असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोई गानाझास्की सांगतात. खरेतर ‘ई-प्लेन’ ही संकल्पना १९७० पासून अस्तित्वात आहे, मात्र ती केवळ कमी अंतरासाठीच्या हलक्‍या प्रायोगिक विमानांसाठी मर्यादित आहे. सौरऊर्जेवर उडणाऱ्या विमानांच्या पंख्यांचा आकार मोठा असतो आणि त्याद्वारे प्रवासी वाहतूक अशक्‍य असल्याने त्यांच्या वापरावरही मर्यादा येतात. त्यामुळे जगभरात सध्या ‘ई-प्लेन’ विकसित करण्याचे १७० प्रकल्प सुरू आहेत आणि त्यातील ५० टक्के प्रकल्प २०१८ नंतरच सुरू झाले आहेत. यातील बहुतांश प्रकल्प शहरांतर्गत वाहतुकीच्या ई-टॅक्‍सी, खासगी आणि मालवाहतुकीच्या विमानांसाठीचे आहेत. ‘एअरबस’ या जगविख्यात कंपनीने आपले पहिले इलेक्‍ट्रिक विमान ‘ई-फॅन एक्‍स’ २०२१ मध्ये हवेत झेपावेल, असे जाहीर केले आहे. मात्र, यामध्ये विमानाच्या चार पारंपरिक इंजिनांपैकी केवळ एक इंजिन हे दोन मेगावॉट क्षमतेचे इलेक्‍ट्रिक इंजिन असेल, असेही नमूद केले आहे. ‘मॅग्नी एक्‍स’ कंपनी कमी अंतरावरील मार्गांवर मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक करून हवेचे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे.

‘‘पारंपरिक ज्वलन होणाऱ्या इंजिनात फिरणाऱ्या भागांची संख्या अधिक असते व त्यामुळे या इंजिनांची कार्यक्षमता कमी होते. इलेक्‍ट्रिक इंजिनामध्ये फिरणारे भाग कमी असल्याने कार्यक्षमता अधिक व देखभाल खर्चही खूप कमी असतो. मात्र, सुरक्षेचा विचार करता पारंपरिक इंजिन अधिक विश्‍वासार्ह ठरतात. हवेत असताना इंजिन बंद करून पुन्हा सुरू करणे, हा पर्याय धोकादायक ठरतो,’’ असा इशारा या क्षेत्रातील तज्ज्ञ अभियंते इरिका होल्डझ देतात. ‘ई-प्लेन’च्या बॅटरीची क्षमता हाही चिंतेचा विषय आहे. एक किलो वजनाच्या पारंपरिक इंधनातून १२०० वॉट अवर, तर एक किलो लिथियम बॅटरीतून केवळ २०० वॉट अवर ऊर्जा मिळते. थोडक्‍यात, इंधनासाठी बॅटरी वापरल्यास विमानाला सहापट अधिक वजन वाहून न्यावे लागेल. या मर्यादेमुळे कमी अंतरासाठीची ‘ई-प्लेन’ सध्या वापरात आहेत. भविष्यात न्यूक्‍लिअर बॅटरीसारख्या संशोधनांतून मोठ्या अंतराची प्रवासी विमान वाहतूकही ‘ई-प्लेन’मधून होईल आणि हवेच्या प्रदूषणाच्या समस्येवर कायमचा उपाय सापडलेला असेल.