सर्च रिसर्च : हिंगाची शास्त्रोक्त लागवड 

डॉ. अनिल लचके 
Saturday, 21 November 2020

हिंग जीवाणूरोधक आहे. तसेच तो एक प्रभावी अँटिऑक्‍सिडंट आहे. आपल्या शरीरात "फ्री रॅडिकल" वर्गीय अपायकारक रसायने सतत तयार होत असतात. त्यांना निष्प्रभ करण्याचे कार्य अँटिऑक्‍सिडंट रसायने करतात. 

प्राचीन काळापासून भारतातील खाद्यपदार्थां मध्ये हिंगाला विशेष महत्त्व आहे. हिंगाचा वास कांदा किंवा लसूणाप्रमाणे उग्र आहे. तरीही शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची लज्जत वाढवण्यासाठी त्याचा आवर्जून वापर केला जातो. त्यामुळे आमटी, सांबार, रसम्‌, लोणचे अशा खाद्यपदार्थांना रुची येते. हिंगाष्टक चूर्णा सारख्या देशी औषधामध्ये हिंग असतो. तो पाचक आहे आणि यकृताच्या आणि पोटाच्या अपचन, जळजळ आदी विकारांवर गुणकारी आहे. हिंग जीवाणूरोधक आहे. तसेच तो एक प्रभावी अँटिऑक्‍सिडंट आहे. आपल्या शरीरात "फ्री रॅडिकल" वर्गीय अपायकारक रसायने सतत तयार होत असतात. त्यांना निष्प्रभ करण्याचे कार्य अँटिऑक्‍सिडंट रसायने करतात. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हिंगाचे रासायनिक पृथक्करण पुढील आहे:- कर्बोदके68 %, प्रथिने 4%, मेदाम्ले 1%, खनिज द्रव्ये 7%, तंतुमय पदार्थ4% आणि जलांश 16%. हिंगामध्ये डाय अलील सल्फाइड, फेरुलिक आम्ल, डाय मेथिल ट्राय सल्फाइड आणि असारेझिनो टॅनोल्स ही रसायने सूक्ष्म प्रमाणात आहेत. त्यामधील सल्फर (गंधकयुक्त) घटकांमुळे त्याला वास उग्र येतो. हिंग हा वनस्पतीजन्य पदार्थ आहे. त्याचे शास्त्रोक्त लॅटिन नाव आहे- "फेरुला फेटिडा" किंवा "फेटिडा असाफेटिडा". काही लोक स्पेलिंगप्रमाणे याला "असाफॉएटिडा" म्हणतात. फेरुला म्हणजे वाहक. "असा" म्हणजे चीक आणि फेटिडा म्हणजे गंधकाचा उग्र वास. या वनस्पतीचे "हिंग काबुली सफाईद" (दुधी सफेद रंग) आणि "लाल हिंग" असे प्रकार आहेत. ही वनस्पती कोरड्या आणि थंड हवेत वाढते. पंजाब आणि जम्मू-काश्‍मीर मध्ये हिंगाची वनस्पती वाढवण्याचे प्रयोग झाले, पण अपेक्षित यश मिळाले नाही. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अफगाणिस्तान, उझबेलिस्तान, कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि इराण मध्ये ही झुडूपवर्गीय वनस्पती मोठ्या वाढते. तिची उंची एक ते दीड मीटर असते. तिला पिवळ्या रंगाचा फुलोरा येतो. या वनस्पतीचे मूळ गाजरासारखे असते. मुळाच्या सेंटीमीटर जाडसर गोल भागावर चिरा पाडल्या जातात. मग त्यातून दुधाळ रंगाचा चीक बाहेर पडतो. तो गोळा करतात आणि वाळवतात. त्यात ओलिओ रेझीन, म्हणजे राळ वर्गीय घटक असतो. तो वेगळा करतात. त्याचा वास उग्र असल्यामुळे त्यात डिंक (गम अरेबिक) गव्हाचे पीठ आणि हळद मिसळून खडा हिंग तयार करतात. त्याची पूडदेखील तयार केली जाते. परदेशातून कच्चा हिंग आयात झाल्यावर भारतात त्यावरती प्रक्रिया करून विक्री योग्य हिंग तयार होतो. उत्तर प्रदेशातील हाथरस गावी हिंगावर प्रक्रिया करणारे खूप कारखाने आहेत. त्यामुळे अनेक रोजगार निर्माण होतात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारताला हिंगाच्या कच्च्या माला साठी परदेशांवर अवलंबून राहावे लागते. वर्षाला 1540 टन कच्चा हिंग भारताला आयात करावा लागतो. यामुळे या वनस्पतीची शास्त्रशुद्ध लागवड करून आपल्या देशातच हिंगाची निर्मिती करावी असे संशोधकांनी ठरवले. त्यासाठी "सीएसआयआर"च्या " हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ बायोरिसर्च टेक्‍नॉलॉजी' या प्रयोगशाळेने पुढाकार घेतला. ही संस्था हिमाचल प्रदेशातील पालामपुर येथे असल्यामुळे त्यांना राज्याच्या कृषी विभागाचे साहाय्य मिळाले. प्रयोगासाठी इराण कडून "फेरुला"ची आठशे रोपे रीतसर आयात केली. त्यांची लागवड 15ऑक्‍टोबर रोजी लडाख मधील लाहौल आणि स्पिती येथील थंड वाळवंटी क्षेत्रात करण्यात आली. काही रोपांची लागवड उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशातील शेतांमध्ये करण्यात आली. हे प्रयोग पुढील पाच वर्षे करण्यात येतील. या प्रयोगांसाठी भारताच्या "सेंटर फॉर हाय अल्टिट्यूड बायोलॉजी" आणि "नॅशनल ब्युरो ऑफ प्लॅन्ट जेनेटिक रिसोर्सेस" येथील संशोधकांचेही साहाय्य मिळणार आहे. पाच वर्षांनी आपल्याला पूर्णतः देशी आणि दर्जेदार हिंग मिळायला लागेल, असं म्हणायला हरकत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Search research article Scientific cultivation of asafoetida

Tags
टॉपिकस
Topic Tags: