सर्च रिसर्च: ब्रह्मांडातील निराकाराच्या शोधात 

सम्राट कदम 
Monday, 13 April 2020

सध्या ब्रह्मांडातील सर्वांना भुरळ घालणारे आणि ज्याबद्दल सर्वांनाच कुतूहल आहे ते म्हणजे कृष्णविवर आणि निराकार असलेला "कृष्णपदार्थ' (डार्कमॅटर) होय.

गूढतेचा शोध घेणे ही माणसाची अगदी प्राचीनतम आवड आहे. दिवसभर तळपणारा भास्कर संध्याकाळी पश्‍चिमेच्या क्षितिजावर मावळला, की असंख्य तारे, ग्रह, नक्षत्रांनी उजळणारी रात्र ही माणसासाठी गूढतेचा खजिनाच घेऊन येते. सूर्यापासून पृथ्वीचे अंतर स्पष्ट करणाऱ्या आर्यभट्टांच्या प्राचीन भारतीय खगोलशास्त्रापासून आधुनिक हबल टेलिस्कोपपर्यंत ब्रह्मांडातील आपले स्थान काय आहे, याचा शोध माणूस अनादी काळापासून घेत आहे. "सूर्य पृथ्वीभोवती नाही, तर सूर्याभोवती पृथ्वीसह इतर ग्रह फिरत आहेत', या क्रांतिकारी शोधानंतर खगोलशास्त्रातील ग्रह -ताऱ्यांची रचना, त्यांची फिरण्याची गती, गुरुत्वाकर्षण आदींबद्दल स्पष्टता येत गेली. विश्वाच्या उत्पत्तीचे गूढ उलगडणारे अनेक सिद्धांतही मांडले जात आहेत. त्या सिद्धांताचे प्रत्यक्ष पुरावे मिळविण्यासाठीही माणसाने भगीरथ प्रयत्न केले आहेत. सध्या ब्रह्मांडातील सर्वांना भुरळ घालणारे आणि ज्याबद्दल सर्वांनाच कुतूहल आहे ते म्हणजे कृष्णविवर आणि निराकार असलेला "कृष्णपदार्थ' (डार्कमॅटर) होय. जडवादी असलेल्या विश्वाच्या निर्मितीमध्ये कृष्णविवराच्या गुरुत्वाकर्षणासह कृष्णपदार्थांचाही मोठा वाटा आहे. आकाशातील दृष्य ग्रह- ताऱ्यांव्यतिरिक्त न दिसणाऱ्या निराकार कृष्णपदार्थांनी ब्रह्मांडाचा तब्बल 85 टक्के भाग व्यापला आहे. हे कृष्णपदार्थ आणि आकाशगंगेचे सहसंबंध स्पष्ट करणाऱ्या एका प्रणालीचा शोध शास्त्रज्ञांना नुकताच लागला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ज्याप्रमाणे आपल्या पृथ्वीला "चंद्र' नावाचा नैसर्गिक उपग्रह आहे, त्याचप्रमाणे आपल्या आकाशगंगेभोवती फिरणाऱ्या छोट्या- छोट्या उपआकाशगंगाही आहेत. त्यांना "लार्ज मॅजेलॅनिक क्‍लाऊड' (एलएमसी) या नावाने वैज्ञानिक क्षेत्रात ओळखले जाते. पृथ्वी आणि चंद्राच्या भ्रमणातून जसा त्यांच्या गुरुत्वाकर्षणाचा सहसंबंध स्पष्ट होतो, तसाच, या उपआकाशगंगांमुळे कृष्णपदार्थ आणि आकाशगंगानिर्मितीचे सहसंबंध स्पष्ट होणार आहेत. युरोपीयन स्पेस एजन्सीने नुकतेच याबद्दल संशोधन केले आहे. विशेष म्हणजे या उपआकाशगंगांची संख्या 60 असावी, असा शास्त्रज्ञांचा अंदाज होता. परंतु ही संख्या दीडशेपेक्षा जास्त असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. डार्क मॅटर सर्व्हे आणि स्काय सर्व्हेच्या माध्यमातून संगणकीय सीम्युलेशनच्या आधारे विकसित करण्यात आलेले हे संशोधन "ऍस्ट्रोफिजिकल जर्नल'मध्ये नुकतेच प्रकाशित झाले आहे. 

कृष्णविवराच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाभोवती संपूर्ण आकाशगंगा फिरते, याची आपल्याला कल्पना आहे. त्याचप्रमाणे आपल्या आकाशगंगेभोवती फिरणाऱ्या या उपआकाशगंगाही एका छोट्या कृष्णविवराभोवती फिरत आहेत. ज्यात कृष्णपदार्थांचेही अस्तित्व आहे. या आकाशगंगांमधील कृष्णपदार्थांचे वर्तन नक्की कसे आहे, त्याची निर्मिती कशी होते, गुरुत्वाकर्षणाचा त्यावर काय परिणाम होतो, ते समूह कसा तयार करतात, आकाशगंगेपक्षा छोट्या आकारात आणि गुरुत्वाकर्षण शक्तीत कृष्णपदार्थांचे अस्तित्व कसे असते, अशा अनेक प्रश्‍नाची उत्तरे या संशोधनातील निष्कर्षांतून समोर येतील. सर्वात महत्त्वाचा प्रश्‍न म्हणजे, माणसाला उपलब्ध साधनांच्या आधारे कृष्णपदार्थाची निरीक्षणे घेता येतील काय? इतक्‍या छोट्या आकारात ते उपलब्ध आहेत काय? याची उत्तरे या उपआकाशगंगांच्या साह्याने शोधली जाणार आहेत. आकाराने छोट्या असलेल्या या उपआकाशगंगांतील ताऱ्यांच्या प्रकाशामुळे त्यांतील बहुतेक रचना आणि प्रणाली चमकत आहेत किंवा दिसणे शक्‍य होत आहे. त्यामुळे प्रकाशमान असलेल्या या छोट्या आकाशगंगा कृष्णपदार्थांच्या अस्तित्वावर, त्याच्या वर्तनावरही प्रकाश टाकतील, असा विश्‍वास शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत.आकाशगंगांसह ग्रह- ताऱ्यांच्या निर्मितीमध्येही कृष्णपदार्थांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ही भूमिका नक्की कशी आहे, याचे रहस्य या उपआकाशगंगांमुळे प्रकाशात येईल, अशी आशा सध्या तरी बाळगायला हरकत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: search research aticle Universe