सर्जनशीलतेची ‘ईगल’झेप (नाममुद्रा)

सोनाली बोराटे
सोमवार, 16 जानेवारी 2017

गुजरातेत झालेल्या ‘व्हायब्रंट गुजरात’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत २५ हजारांहून अधिक सामंजस्य करार झाले.  त्यातील काहींनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. हर्षवर्धन झाला या चौदा वर्षांच्या शालेय विद्यार्थ्याने सादर केलेला ‘ईगल ए-७’ हा ‘युद्धभूमीत पेरलेले भूसुरुंग शोधून नष्ट करणारा ड्रोन’ हे त्यातीलच एक उदाहरण. 

गुजरातेत झालेल्या ‘व्हायब्रंट गुजरात’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत २५ हजारांहून अधिक सामंजस्य करार झाले.  त्यातील काहींनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. हर्षवर्धन झाला या चौदा वर्षांच्या शालेय विद्यार्थ्याने सादर केलेला ‘ईगल ए-७’ हा ‘युद्धभूमीत पेरलेले भूसुरुंग शोधून नष्ट करणारा ड्रोन’ हे त्यातीलच एक उदाहरण. 

खरं तर तीन वर्षांपूर्वीच हर्षवर्धनमधील संशोधक जागा झाला होता. सुरवातीला मनोरंजन म्हणून तो इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि टेक्‍नॉलॉजीमध्ये वेगळे प्रयोग करून पाहत असे. नंतर मात्र या माध्यमातून देशातील समस्यांवर उत्तर शोधता येईल का, याचा विचार तो करू लागला. गेल्या वर्षी भूसुरुंग शोधून नष्ट करताना काही जवानांना प्राण गमवावे लागल्याची बातमी, हर्षवर्धनच्या पाहण्यात आली. तिथेच भूसुरुंग शोधून नष्ट करू शकणारा ड्रोन तयार करण्याची कल्पना त्याला सुचली. गेल्या वर्षभरात हर्षवर्धनने तीन प्रकारचे ड्रोन बनवले असून पेटंटसाठी नोंदणी केली आहे. तीन महिन्यांपूर्वीच त्याने स्वतःची ‘एरोबोटिक्‍स ७’ नावाची कंपनी स्थापली आहे. बापूनगर येथील सर्वोदय विद्यामंदिरात हर्षवर्धन शिकत आहे. त्याच्याबरोबरचे इतर विद्यार्थी काही दिवसांवर आलेल्या बोर्डाच्या परीक्षेच्या तणावाखाली असताना हर्षवर्धन मात्र ड्रोन आणि त्याचा व्यावसायिक आराखडा बनवण्यात गुंतला आहे. त्याचे वडील प्रद्युम्नसिंह खासगी कंपनीत लेखापाल आहेत तर आई निशाबा गृहिणी आहे. आपल्या मुलाच्या या अभिनव आवडीला त्याच्या पालकांनी प्रोत्साहन दिले, हे विशेष. त्याने बनवलेल्या तीन ड्रोनपैकी दोन ड्रोनसाठी दोन लाख रुपये खर्च आला. हा पूर्ण खर्च त्याच्या पालकांनी केला. तिसऱ्या ड्रोनसाठी सरकारची मदत झाली. हा ड्रोन भारतीय लष्कराच्या पारंपरिक पद्धतींपेक्षा अधिक अचूक आणि वेळ, खर्च व जीवितहानी वाचवणारा आहे. ‘गुगल’च्या अमेरिकेतील मुख्यालयाने आपल्या उत्पादनाची नोंद घ्यावी, हे हर्षवर्धनचे स्वप्न आहे. त्यादृष्टीने त्याने प्रोजेक्‍ट सादरही केला आहे. जगभर अधिराज्य असलेल्या ‘ॲपल’ आणि ‘गुगल’ या आघाड्यांच्या कंपन्यांपेक्षा मोठी कंपनी विकसित करण्याचा त्याचा मानस आहे. मुलांमधील सुप्त गुणांना वाव मिळाला तर काय किमया घडते त्याचा हा वस्तुपाठ. 

Web Title: harshvardhan zala