हौस ऑफ बांबू : कौतिके वाढिले आम्लपित्त...!

नअस्कार! मराठी भाषा विषयक धोरण मंजूर झाल्यामुळे आमचे परममित्र श्रीपाद भालचंद्र खुशीत असले तरी ज्या महानुभावांनी या धोरणाचा मसुदा रचिला.
Hous of Bamboo
Hous of BambooSakal

नअस्कार! मराठी भाषा विषयक धोरण मंजूर झाल्यामुळे आमचे परममित्र श्रीपाद भालचंद्र खुशीत असले तरी ज्या महानुभावांनी या धोरणाचा मसुदा रचिला, त्यापैकी एक अशा सदानंदमहाराज मोरे यांना मात्र आम्लपित्तानं गांजलं आहे, हे चांगलं नाही. सदानंद महाराजांना आम्लपित्ताचा त्रास सुरु झाल्यानं मीदेखील काळजीत पडले. माझ्या घरी आलेलिंबू पाचक रसाची बाटली कायम असते. (कायम चूर्णही असतंच!) ती त्यांना नेऊन देण्यासाठी मी त्यांच्या घरी जाऊन आले.

‘हे काय? मला कुठं आम्लपित्त झालंय? मी ठणठणीत आहे,’ बाटली स्वीकारत ते म्हणाले. मी बरं म्हणून परत आले. सदानंदमहाराजांच्या आम्लपित्ताचं कारण संभाजीनगरात दडलंय! संभाजीनगरात गेल्या आठवड्यात एक ऐतिहासिक गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात आला. हा गौरवग्रंथ मराठी भाषेचा अभिजाततेचा पुरावा म्हणून दिल्लीला पाठवण्यात येणार असल्याचंही माझ्या कानावर आलं आहे.

कारण हा गौरवग्रंथ कुण्या औऱ्यागौऱ्याचा नाही, तर साक्षात तंतोतंत हुबेहूब कौतिकराव ठाले-पाटील यांच्याबद्दलचा आहे. असा दणकट गौरव ग्रंथ गेल्या दहा हजार वर्षात ना कधी झाला, ना कधी यापुढे होईल. मराठी दौलतीचे आणखी एक रणबहादुर शिलेदार प्रा. रणधीर शिंदे यांनी या ऐवजाचं संपादन केलं आहे.

शिंदेसर हे गेली कैक वर्षं कौतिकरावांच्या शिबंदीत धीरानं तेग गाजवत आहेत, हे अनेकांना ठाऊक असावं.

माझ्या कानावर आलेली बातमी अशी : गेल्या आठ तारखेला संभाजीनगरात तापडिया हॉलमध्ये शानदार समारंभात गौरव ग्रंथ प्रकाशित होणार, अशी दवंडी पिटली गेली. कौतिकरावांचं मराठवाड्यातील साहित्य रसिकांना विलक्षण कौतिक आहे. (त्यांना कौतिक आणि बाकीच्यांना दहशत!) खणखणीत, सडेतोड, स्पष्टवक्ता, निर्भीड, निधड्या छातीचा साहित्य-शूरवीर, मराठवाड्यातील एकमेव मराठी तलवार ऊर्फ आमचे कौतिकराव यांचा गौरवग्रंथ प्रकाशित करण्यासाठी पुण्याहून सदानंदमहाराज मोरे टाकोटाक निघाले.

गाडीत (मागल्या सीटेवर) बसून त्यांनी गौरवग्रंथ चाळायला घेतला, आणि मागे पडणाऱ्या मैलागणिक त्यांचे हातपाय थंड पडत गेले, अशी अफवा आहे. या गौरवग्रंथांच्या काही पानांत आपल्याबद्दल काहीच्या काहीच शेलके ‘गौरवोद्गार’ काढण्यात आले असून या गौरवास आपण काही पात्र नाही, या विचाराने सदानंदमहाराजांना अचानक विरक्ती आली.

‘दुखी मन मेरे सुन मेरा कहना, जहां नहीं चैना, वहां नहीं रहना’ ही जुनी फिल्मी विराणी त्यांच्या मन:पटलावर उमटली, आणि गाडीच्या खिडकीची कांच खाली करुन त्यांनी थोडा वारा खाल्ला. समोर नगरचा सुप्रसिद्ध स्माइलस्टोन धाबा बोलावत होता. पण त्यांनी निग्रहानं गाडीच्या चालकास फर्मावले : ‘यू-टर्न घ्या!!’ बस, गाडी फिरली ती फिरलीच...

‘काल गाडीतून येताना ग्रंथ वाचीत होतो. नगरपर्यंत आलो तेव्हा श्री. सासणे यांचा लेख वाचला. तुम्ही (आणि तेही) साहित्य व संस्था यांच्या व्यवहारातील जी नैतिक उंची गाठली आहे, ती समजून मी थक्क झालो. तसेच तुमच्या तुलनेत

मी किती खालच्या पातळीवर आहे, हेही समजलो.

अशा माणसाने आपल्यासारख्या शिखरस्थ माणसाचा गौरव करणे हे महापाप ठरले असते. ते आपल्या हातून घडू नये, म्हणून मी माघार घेतली. आपली काही गैरसोय झाली असेल तर दिलगीर आहे...,’ असा मेसेज सदानंदमहाराजांनी ‘संबंधितां’ना पाठवून दिला, आणि चक्क पुन्हा पुणे गाठलेन!!

...कौतिकरावांचं ठरल्याप्रमाणे कौतिक झालंच. गौरव सोहळा उत्तम जाहला. मराठीच्या मानकऱ्यांचं काही कोणावाचून अडत नाही. (हो की नाही हो, कौतिकराव?) पण मराठी साहित्यविश्वात बातमी काय फुटली? तर सदानंदमहाराज मोरे यांचं आम्लपित्त चढलं! भले, आता याला काय म्हणावं?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com