सुटकेचा निःश्वास (अग्रलेख)

Abhinandan Varthaman
Abhinandan Varthaman

आपली भूमिका प्रामाणिकपणाची आहे हे दाखविण्याची जबाबदारी पाकिस्तानची आहे. पाकिस्तानवर केवळ भारताकडूनच नव्हे तर जगभरातून दबाव आल्यानंतर भारतीय वैमानिकाच्या सुटकेचा निर्णय जाहीर झाला. दहशतवादविरोधी कारवाईबाबतही त्या देशाने ठोस पावले उचलायला हवीत.

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून "जैशे महंमद'च्या तळावर केलेल्या हल्ल्यानंतरचा त्या देशाचा प्रतिसाद दुटप्पीपणाचा होता. एकीकडे "चर्चेद्वारे प्रश्‍न सोडवू,' असा नरमाईचा पवित्रा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतला; तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचे विमान भारतीय हवाई हद्दीचा भंग करून घुसविण्याचा प्रयत्न झाला. ते विमान पिटाळून लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानच्या ताब्यात सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे काय होणार, याची रास्त काळजी भारतीयांना वाटली. संघर्षाची व्याप्ती वाढणार की काय, असा प्रश्‍न निर्माण झाला असतानाच इम्रान खान यांनी वर्धमान यांना भारताकडे सुपूर्त करणार असल्याची घोषणा केली. हा शब्द पाकिस्तान पाळेल आणि या सर्वच बाबतीत अधिक सुसंगत धोरण अंगीकारेल, अशी अपेक्षा आहे. अभिनंदन यांच्या शौर्याला सलाम करतानाच, आता अवघा देश पाकिस्तानने त्यांना परत भारताकडे सुपूर्त करावे, अशी मागणी करत आहे. ही मागणी पाकिस्तान अर्थातच सहजासहजी मान्य करणे शक्‍य नव्हतेच; उलट जीनिव्हा करारानुसार युद्धकैद्यांना योग्य रीतीने वागविण्याचे संकेत धाब्यावर बसवून त्यांना अमानुष पद्धतीने मारहाण करत असल्याचे व्हिडिओ "व्हायरल' झाले. ते खरे असतील तर पाकिस्तानच्या या वर्तणुकीचा करावा तितका निषेध थोडाच आहे.
वास्तविक भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रश्‍न हे संवाद आणि चर्चा यातून सुटू शकतील, या उक्तीचा उच्चार पाकिस्तान वेळोवेळी करीत आला आहे. विशेषतः आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आपला चेहरा उजळ करण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानी नेते ही भाषा करतात. इम्रान खान हेही त्याला अपवाद नाहीत. मात्र, गेल्या काही दिवसांत नेमके जे काही घडले त्यामुळे ही निव्वळ दिखाऊ भाषा असल्याचेच दिसून येत होते. आता तरी आपण जे बोलतो ते करून दाखविण्याची संधी त्यांच्यासमोर आहे. अभिनंदन यांच्या सुटकेचा शब्द पाळणे आणि मसूद अजहर आणि त्याच्या संघटनेची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी पावले उचलणे यासंदर्भात त्यांना पावले उचलावी लागतील. पाकिस्तानवर या वेळी केवळ भारताकडूनच नव्हे तर जगभरातून आलेला दबाव अभूतपूर्व होता, असेच म्हणावे लागेल. अमेरिकेने आर्थिक मदत नाकारल्यानंतर चीन वा सौदी अरेबिया पुढे येतो, अशा पूर्वानुभवामुळे भारताबरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवरही आपला दुटप्पीपणा खपून जाईल, अशा भ्रमात पाकिस्तानी राज्यकर्ते राहिले. पण दहशतवादाच्या प्रश्‍नाबाबत सर्वच प्रमुख देशांनी जी निःसंदिग्ध भूमिका घेतली, त्याने हा भ्रम दूर झाला असेल. अमेरिकेने भारताच्या स्वरक्षणाच्या हक्काविषयी स्पष्टपणे अनुकूल मत व्यक्त केले. आजवर संयुक्‍त राष्ट्रांत मौलाना मसूद अझर यास आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या ठरावास आडकाठी आणणाऱ्या चीननेही दहशतवादी कारवायांचा निषेध केला. चीनने पाकचा थेट उल्लेख केलेला नसला तरी सध्याच्या परिस्थितीत दहशतवादी कारवाया कोण करत आहे, हे स्पष्ट आहे. भारत, रशिया आणि चीन या तीन देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आलेली दहशतवादविरोधी भूमिकाही महत्त्वाची ठरली. महत्त्वाचे म्हणजे भारत आपल्या भूमिकेवर ठाम राहिला आणि अभिनंदन यांच्या सुटकेचा मुद्दा अस्त्र म्हणून वापरण्याचा प्रयत्न सहन करणार नाही, हे स्पष्ट केले. पाकिस्तानने यापूर्वी युद्धकैद्यांबाबतच्या जे काही वर्तन केले होते, ते कमालीचे घृणास्पद तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या युद्धकैद्यांना कशी वर्तणूक द्यायची याबाबतच्या जीनिव्हा करारास काळिमा फासणारेच होते. कारगिल युद्धाच्या वेळी 1999 मध्ये फ्लाइट लेफ्टनंट नचिकेत तसेच स्क्वॅड्रन लीडर अजय अहुजा यांचा अनन्वित छळ करण्यात आला होता. अखेर पाकिस्तानने अहुजा यांचे पार्थिव भारताच्या स्वाधीन केले खरे; पण तेव्हा त्यास "पॉइंट ब्लॅंक' अंतरावरून गोळ्या घालण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. या पार्श्‍वभूमीवर अभिनंदन यांची सुटका होणे ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे.

जबर मारहाणीमुळे जखमी झालेल्या अभिनंदनचे जे काही अश्‍लाघ्य व्हिडिओ प्रसारित करण्यात आले, त्याचा भारताने अत्यंत तिखट शब्दांत निषेध केला आहे आणि तो रास्तच आहे. अपघात आणि योगायोग या जीवनप्रवाहातील दोन अपरिहार्य घटना असल्या तरी एअर मार्शल एस. वर्धमान यांच्या आयुष्यात जे काही घडले, ते त्यापेक्षाही भीषण होते. अवघ्या दोनच वर्षांपूर्वी प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या एका युद्धपटाचे सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यात एक पायलट विमान कोसळल्यामुळे शत्रू राष्ट्राच्या ताब्यात जातो, अशी घटना होती. त्यांच्या पुत्राच्या बाबतीत प्रत्यक्षात अशी घटना घडली आहे. आता साऱ्या देशाला प्रतीक्षा आहे ती त्यांच्या सुटकेची.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com