होते म्हणू स्वप्न एक...

जीवनात विजय नव्हे, संघर्ष महत्त्वाचा…जिंकण्यापेक्षा तुम्ही किती दिलेरीने लढलात, याचे मोल अधिक असते.
icc world cup 2023 ind vs aus cricket aus win 2023 cricket world cup
icc world cup 2023 ind vs aus cricket aus win 2023 cricket world cupSakal

जीवनात विजय नव्हे, संघर्ष महत्त्वाचा…जिंकण्यापेक्षा तुम्ही किती दिलेरीने लढलात, याचे मोल अधिक असते.

-पिअर द कुबेर्तां, आधुनिक ऑलिम्पिकचे जनक

विजयाचे धनी अनेक; पण अपयशाला मायबाप नसतात, अशी एक व्यावहारिक म्हण आहे. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारताची हार झाली, त्यानंतर जे चर्चाचर्वण सुरू आहे, त्यातून याच म्हणीचे प्रत्यंतर येऊ लागले आहे.

वास्तविक संपूर्ण स्पर्धेत लाजवाब खेळाचे प्रदर्शन करणारा भारतीय संघ अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियासमोर उणा ठरला, हे सत्य स्वीकारले की बाकी सगळ्या चर्चा फिजूल ठरतात. खेळात हारजीत व्हायचीच, सर्वोत्कृष्ट संघ जिंकतो, वगैरे सुविचार पावलोपावली ऐकू येत असले तरी, असली सांत्वने पराभूताच्या उपयोगाची नसतात.

पराभव हा शेवटी पराभवच असतो. तो भारताच्या जिव्हारी लागला आहे, यात शंका नाही. बारा वर्षांपूर्वी विश्वकरंडक जिंकला, तेव्हाची यादगार संध्याकाळ वारंवार आठवली जाते आहे. त्यापेक्षाही सुंदर संध्याकाळ आणि शरदाची रात्र वाट्याला येवो, म्हणून भारतीय क्रिकेटविश्व देव पाण्यात बुडवून बसले होते.

पण उफराटेच घडले! भारतीय संघाने उपांत्य फेरीपर्यंत जी तुफानी घोडदौड केली, ती पाहता करंडक उंचावणे हा रोहित शर्माच्या संघासाठी निव्वळ उपचार तेवढा उरला आहे, असे वातावरण होते. प्रत्येक खेळाडू उत्तम फॉर्मात होता आणि संघभावनाही ठळकपणे दिसत होती.

संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाला पराभवाचे तोंडदेखील बघावे लागले नाही. हा सारा प्रकार दृष्ट लागण्याजोगा होता. सलग दहाच्या दहा सामने जिंकून अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या भारतीय संघाचा उदो उदो करण्यात माध्यमांनी तर कहर केला.

याचे कारण एक तर सध्याचा जमाना बाजारपेठेच्या नियमांबरहुकूम चालणारा. टीआरपी आणि मार्केटिंगचे नवे ‘फंडे’ शोधून काढत गल्ला ओढण्याची जणू अहमहमिका लागलेली. त्यात तब्बल बारा वर्षांनी क्रिकेटविश्वातील जगज्जेतेपदाचे निर्भेळ यश अगदी हातातोंडाशी आलेले.

अशा परिस्थितीत साऱ्या समस्या, तक्रारी, भांडणे, टीका, राजकारण जणू एका कोपऱ्यात फेकले गेले आणि विश्वकरंडक जिंकणे हाच जणू एकमेव राष्ट्रीय कार्यक्रम झाला. अंतिम सामन्यासाठी अहमदाबादेतील ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’वर बॉलिवूडचे अवघे तारांगण लोटले होते.

थोरथोर नेते निवडणुकांची कामे हातावेगळी करुन सामना बघण्यासाठी येऊन बसले होते. एक लाख तीस हजार प्रेक्षकांनी संपूर्ण स्टेडियम दणाणून गेले होते. जगभरातले जवळपास चाळीस कोटी क्रिकेटवेडे टीव्हीच्या पडद्याला नाक लावून बसले होते.

या सर्व वातावरणात भारताचा संघ जिंकला असता तर काय धुमधडाका उडाला असता, याची कल्पनाच केलेली बरी! ती करावीच, कारण तेवढीच एक सुखद गोष्ट आपल्या भारतीय क्रिकेटचाहत्यांच्या हाती आता उरली आहे.

ऑस्ट्रेलियाचा बिनीचा फलंदाज ट्रॅविस हेडने विश्वकरंडक भारताच्या हातून अक्षरश: पळवून नेला. कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नाचा चक्काचूर करणारे त्याचे हे ‘विध्वंसक’ शतक भारतीय चाहते कधीही विसरणार नाहीत.

सलग दहा सामने सहजी जिंकून ऐन अंतिम लढतीत भारतीय संघाने कच का खाल्ली असेल? एरवी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना हुर्ड्यासारखा भाजून काढणारा महम्मद शमीचा मारा अचानक निष्प्रभ का झाला असेल?

भरवशाचे म्हणावेत, असे तालेवार भारतीय फलंदाज नांगी टाकत का परतले असतील? खेळपट्टीने असा ऐनवेळी अवसानघात का केला? सामन्याची इतकी ‘हाइप’ करण्यामागे काही राजकीय कारण होते का? विश्वकरंडक जिंकून नेमके कुणाला काय सिद्ध करायचे आहे?

असे अनेक प्रश्न क्रिकेट न कळणाऱ्या प्रेक्षकांनाही पडले, ते समाजमाध्यमांवर उमटले आहेत. ‘सगळ्या लढतींमध्ये फिक्सिंग असते हो!’ इथपासून सामन्याचे निकाल हल्लीच्या काळी बेटिंगवालेच ठरवतात, असली सिनिकल विधानेही होत आहेत.

पण वस्तुस्थिती अशी की भारतीय संघाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. खेळपट्टीची फारशी साथ नसतानाही कशीबशी का होईना २४० धावांपर्यंत मजल मारली. हेच लक्ष्य तीनशे-सव्वातीनशे धावांचे असते तरीही ऑस्ट्रेलियाचाच संघ जिंकला असता, हे ध्यानी घेतलेले बरे.

हवामान आणि खेळपट्टीसोबत कांगारुंना नशिबाचीही सुरेख साथ होती. त्यांनी अत्युत्कृष्ट क्षेत्ररक्षण करुन भारतीय फलंदाजांच्या किमान पन्नासेक धावा अडवल्या. तो दिवस भारतीय संघाचा नव्हता, हेच खरे. हे सत्य आपल्याला पचवावे लागेल.

दुसरे म्हणजे ‘आपला पराभव’ यापेक्षा ‘ऑस्ट्रेलियाचा विजय’ या दृष्टिकोनातून पाहिले तर या सामन्याचे आकलन जास्त चांगल्या प्रकारे होईल. क्रिकेट हा आपल्यासाठी खेळ नाही, धर्म आहे! धार्मिकतेत आपण अनेक प्रतीके वापरतो. तसेच क्रिकेटमध्येही!

उदाहरणार्थ, पाकिस्तानविरुद्धची लढत ही राष्ट्रीयत्वाचे प्रतीक झाली आहे. तिथे रणांगणासारखे लढायचे असते. विश्वकरंडकातील जगज्जेतेपद हे वर्चस्वाचे प्रतीक झाले आहे. भरपूर धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियापुढे ठेवून चुरशीची लढत झाली असती, तर कदाचित एवढे दु:ख भारतीय चाहत्यांना झाले नसते; पण कांगारुंनी भारताला संपूर्ण सामनाभर मान वर काढू दिली नाही.

जेमतेम दहा देश क्रिकेट खेळतात, तरीही आपण त्याला ‘वर्ल्ड कप’ म्हणतो. हे हळवेपण हेच आपले बलस्थान आहे, आणि एकाअर्थी मर्यादाही! क्रिकेटचा निर्भेळ आनंद लुटण्यासाठी वेगळी मानसिकता हवी. त्यासाठी शेवटी विश्वकरंडक जिंकायला हवा, हेही ओघाने आलेच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com