esakal | ढिंग टांग : पंतोजींचा वर्ग!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : पंतोजींचा वर्ग!

ढिंग टांग : पंतोजींचा वर्ग!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

स्थळ : मातोश्री हाइट्स, वांद्रे बुद्रुक.

वेळ : विश्रांतीची.

………

उधोजीसाहेब : (दारावरची टकटक ऐकून दचकत) क…क…कोणॅय?

चि. विक्रमादित्य : (दाराआडून) मीये!!

उधोजीसाहेब : (सावधपणाने) मी म्हंजे कोण? नाव गाव सांगा! एकटे आहात की गर्दी करोन आला आहात, तेही सांगा! गर्दी करोन आलियास आल्यापावली परत जा!!

चि. विक्रमादित्य : (दार ढकलून आत येत) हाय देअर बॅब्स…मे आय कम इन?

उधोजीसाहेब : (घाबऱ्या घुबऱ्या) नको, नको! दाराबाहेर पाटी वाचली नाही का? ‘येथे गर्दी करणेची नाही!’

विक्रमादित्य : (आश्चर्यानं) इथं कुठं गर्दी आहे? एकटाच आहे की मी!!

उधोजीसाहेब : (सुरक्षित अंतर पाळत) आधी तो मास्क लाव रे, मास्क लाव! हात धुतले का? सॅनिटायझर कुठाय?

विक्रमादित्य : (खुलासा करत) मास्क ओला झाला!

उधोजीसाहेब : (काळजीने) बाप रे! ओला मास्क डेंजरऽऽस!!

विक्रमादित्य : (पोक्तपणे हाताची घडी घालून) बॅब्स, माझं एक ऑब्जर्वेशन आहे! लोक तुमचं ऐकत नाहीत!

उधोजीसाहेब : (सावधपणाने) हे निरीक्षण आहे की टोमणा? की विरोधक करतात तशी टीका?

विक्रमादित्य : (दुर्लक्ष करत) तुम्ही लोकांना सांगताय की गर्दी करु नका, गर्दी करु नका!!- लोक ते गर्दी करुनच ऐकतात!

उधोजीसाहेब : (धुमसत) माझ्या सौजन्याचा गैरफायदा घेऊ नका, असं सांगा त्या लोकांना!

विक्रमादित्य : (इशारा दिल्यागत) किंबहुना तुम्ही गर्दी करु नका, असं सांगितलं की लोक लागलीच गोळा होतात, असं माझं ऑब्जर्वेशन आहे! यु गॉट माय पॉइण्ट?

उधोजीसाहेब : (कपाळाला आठी घालून) किंबहुना हा शब्द मुद्दाम वापरायची गरज होती का?

विक्रमादित्य : (विचारशील पोझमध्ये) मला वाटतं की तुम्ही ‘गर्दी टाळा’ हे दोन शब्द टाळावेत!!

उधोजीसाहेब : (नाटकीय पध्दतीने) …अशक्य! माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला प्रबोधन करणं हे माझं कर्तव्य आहे, आणि ते मी पार पाडणारच! गर्दी टाळा हे सांगणं माझं कर्तव्य आहे!!

विक्रमादित्य : कुठलाही राजकीय पक्ष ऐकत नाहीए! सगळे गर्दी करताहेत! प्रत्येक नेता गर्दी जमा करतो, आणि गर्दी करु नका असं सांगतो! याला काय अर्थय?

उधोजीसाहेब : (सावरुन घेत) असं कसं? त्या कमळवाल्यांचं काही सांगू नकोस! ते विघ्नसंतोषी आहेत! यात्रा काय, जत्रा काय!!...पण आपल्या नव्या मित्र पक्षांनी वचन दिलंय की आम्ही गर्दीचे कार्यक्रम करणार नाही म्हणून!

विक्रमादित्य : (कुत्सितपणाने) फू:!! त्यांना मुळात धड गर्दी कुठे जमवता येते?

उधोजीसाहेब : (करारी सुरात) आरोग्य आधी, उत्सव नंतर! हे माझं नवं घोषवाक्य आहे! सणासुदीच्या दिवसात काळजी घ्या, नंतर उत्सव साजरे करायला पुष्कळ वेळ मिळेल! लौकरच मी माझ्या महाराष्ट्राला गर्दी टाळण्याचा उपदेश टीव्हीवरुन करणार आहे! महाराष्ट्र हा माझा वर्ग आहे, आणि मी या वर्गाचा क्लासटीचर आहे!

विक्रमादित्य : बॅब्स, तुम्ही पंतोजीटाइप आहात!

उधोजीसाहेब : काय? तुला काय रे माहीत पंतोजी?

विक्रमादित्य : (शांत सुरात) क्लास कंट्रोल नसलेल्या सज्जन गुर्जींसारखं तुमचं झालंय, बॅब्स! ‘मुलांनो, गप्प बसा बघू’ असं सांगूनही वर्गातली पोरं धिंगाणा घालतच असतात! (आक्रमकपणाने) …हातात छडी घ्या, छडी!

उधोजीसाहेब : (ओठ आवळून) अस्सं?...हात कर पुढे!

loading image
go to top