बेरोजगारांच्या फौजा

मानवी विकास संस्था आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (आयएलओ) यांनी संयुक्तपणे ‘भारत रोजगार अहवाल-२०२४’ प्रसिद्ध केला.
ilo India Employment Report-2024 development after covid 19
ilo India Employment Report-2024 development after covid 19Sakal

कोविड महासाथीनंतरच्या काळात वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेत जगात भारताचा आवर्जून उल्लेख होतो. देशाचा विद्यमान आणि आगामी वर्षातील विकासदर किमान सहा टक्क्यांवर राहील; त्या तुलनेत चीनसह अमेरिका, युरोपातील अनेक विकसित देशांचा विकासदर कमी राहील, असे अंदाज व्यक्त होत आहेत.

विविध पतमानांकन संस्था, रिझर्व्ह बँकही अशी आकडेवारी जाहीर करते. तथापि, या आशादायक विकासचित्राचे वाटेकरी होण्याचे, त्याची रसाळ फळे चाखण्याचे भाग्य किती भारतीय युवकांच्या वाट्याला येते, याचे चित्र मात्र काहीसे चिंताजनक म्हणावे लागेल.

मानवी विकास संस्था आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (आयएलओ) यांनी संयुक्तपणे ‘भारत रोजगार अहवाल-२०२४’ प्रसिद्ध केला. त्याचे देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्‍वरन यांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले.

‘सरकार सर्वच सामाजिक आणि आर्थिक प्रश्‍न सोडवू शकत नाही,’ असे सांगून ते मोकळे झाले. पण सरकारला ही जबाबदारी टाळता येणार नाही. या अहवालात भारतातील रोजगाराची उपलब्धता, युवकांचा त्यातील सहभाग, शिक्षित व उच्चशिक्षितांचा त्यातील वाटा व सहभाग, नागरी व ग्रामीण रोजगार, एकूण रोजगारांत महिलांचा सहभाग, निर्मिती, सेवासह विविध क्षेत्रातील रोजगार अशा कितीतरी बाजूंनी चित्र मांडले आहे.

शेतीकडून अन्य रोजगाराकडे होणारी वाटचाल पुन्हा शेतीकडे वळू लागली आहे. महिलांचा एकूण रोजगारातील सहभाग जगाच्या तुलनेत निचांकी पातळीवर आहे. एवढेच नव्हे तर पुरुषांच्या तुलनेत त्यांचा सहभाग कितीतरी नगण्य आहे.

माध्यमिक तसेच उच्चशिक्षितांमधील बेरोजगारीचे प्रमाण सन २०००च्या तुलनेत (३५.२टक्के) २०२२मध्ये वाढून ६५.७टक्क्यांवर गेले आहे. लोकसंख्येत निम्म्याहून अधिक युवक आहेत, त्यांच्यातील बेरोजगारी ८३टक्के एवढी मोठी आहे.

याच काळात युवकांच्या बेरोजगारीचे प्रमाण वाढून २०१९मध्ये १७.५टक्क्यांवर गेले होते, आता त्यात घट होऊन बारा टक्क्यांवर पोहोचले आहे. कंत्राटी, अनौपचारिक रोजगार वाढत असताना, संघटित किंवा शाश्‍वत रोजगार घटलेला आहे.

एवढेच नव्हे तर एकूण वेतनमानातही फारसा फरक पडलेला नाही, ते जवळजवळ ‘जैसे थे’ आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात रोजगाराचा मुद्दा निश्‍चित अग्रस्थानी राहू शकतो, असे म्हणावे लागेल. काँग्रेस नेते राहुल गांधीं यांनी हा प्रश्‍न लावून धरला.

अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनीही २०४७ पर्यंत भारत विकसित होणार हा निव्वळ भ्रम आहे, असे म्हटले होते. त्यांनी हे कटू सत्य सांगण्यामागे बेरोजगारीचे हेच चित्र त्यांच्या डोळ्यासमोर आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) त्याची दखल घ्यावी लागेल.

याच अहवालात देशात स्वयंरोजगारात, अनौपचारिक रोजगारात गुंतलेल्यांचे प्रमाण ९०टक्क्यांच्या आसपास आहे; तर नियमित रोजगाराचे प्रमाण घटत गेल्याचे म्हटले आहे. आळवावरच्या पाण्यासारख्या अनौपचारिक रोजगारात ना सामाजिक सुरक्षा, ना नोकरीची शाश्‍वती, ना नोकरीनंतर निवृत्तिवेतन किंवा इतर स्वरुपाचे दीर्घकालीन फायदे.

हे निराशाजनक वास्तव आहे. त्याबरोबरच तिशीच्या आतील महिलांचा रोजगारातील सहभाग पुरुषांच्या तुलनेत कितीतरी पटीने कमी आहे. जो काही त्यांचा सहभाग आहे तो शेती किंवा अनुत्पादक कौटुंबिक कामकाजात आहे.

चीनमध्ये रोजगारीत महिलांचे प्रमाण पुरुषांशी स्पर्धा करणारे आहे. आपल्याकडे वस्तूनिर्माण क्षेत्र हव्या त्या प्रमाणात वाढत नाही, परिणामी संघटित, शाश्‍वत नोकरीच्या संधीही घटत आहेत. उद्योगधंदे विस्तारापासून ते स्वयंरोजगारापर्यंत अशा घटकांसाठी सरकारने ‘मेक इन इंडिया’, मुद्रा योजना, विशिष्ट उद्योगांसाठी क्लस्टर किंवा पार्कची उभारणी,

त्यांच्याकरता सोयी-सवलती देऊनही त्यातून हवी तितकी रोजगारनिर्मिती झालेली नाही. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना (एमएसएमई) सावरण्यापासून फेरउभारणीपर्यंत योजना, सवलती देऊनही कोविड काळात त्यांची विस्कटलेली घडी अद्याप सावरलेली नाही, हेही दिसते.

उच्चशिक्षितांमध्ये बेरोजगारी मोठी आहे, या वास्तवाची दखल सरकारी यंत्रणा का घेत नाही? कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि त्यात जगात आघाडीसाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. सेमीकंडक्टर हबचे स्वप्न दाखवले जाते. पण रोजगारक्षम लोकसंख्येत संगणकाच्या मूलभूत कौशल्यांचा मोठा अनुशेष असल्याचे अहवाल सांगतो,

त्यावर काय उपाययोजना करणार? अशा प्रश्‍नांचे मोहोळ भेदण्यासाठी सरकारने घोषणा, त्यांची अंमलबजावणी, त्यातील त्रुटी यांचा सांगोपांग आढावा घ्यावा. त्यातील त्रुटी दुरूस्त करून तातडीने कार्यवाही करावी. विकासदराच्या गप्पांनी सुखासीनतेचे मोरपीस फिरत राहिले, तरी देशातील बहुसंख्य जनतेच्या जीवनमानात त्याने कोणतेच परिवर्तन घडवले नाही तर निर्माण होणारे सामाजिक प्रश्‍न अधिक उग्र होतील.

शाश्‍वत स्वरूपाचा रोजगार घटलेला आहे. वेतनमानातही फारसा फरक नाही, ते जवळजवळ ‘जैसे थे’ आहे. यावर उपाय आवश्यक आहेत.

धीरे-धीरे रे मना, धीरे सब कुछ होय ।

माली सींचे सौ घडा, ऋतु आए फल होय ।।.

— संत कबीर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com