आरोग्य पर्यटनात भारताला सुवर्णसंधी! 

मानसी गोरे
बुधवार, 10 मे 2017

कुशल डॉक्‍टर, अन्य देशांच्या तुलनेत आरोग्यसेवांच्या अत्यल्प किमती, आयुर्वेद व योगविद्येचा वारसा, वैविध्यपूर्ण हवामान आदी गोष्टींमुळे भारतातील आरोग्य पर्यटन क्षेत्राला मोठी संधी आहे. तिचा पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा. 

गेल्या 11 फेब्रुवारीला इमान अहमद ही बहुधा जगातील सर्वांत अतिस्थूल 36 वर्षीय महिला इजिप्तमधून स्वत:चे 500 किलोचे वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेसाठी, शेवटचा पर्याय म्हणून मुंबईतील रुग्णालयात दाखल झाली. ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडून ती नुकतीच मायदेशी परत गेली. त्यामुळे पुन्हा एकदा भारताचे आरोग्य पर्यटन क्षेत्रातील स्थान चर्चेत आले. भारतासारख्या विकसनशील देशात अनेक क्षेत्रांत विरोधाभास आढळतात. असाच एक महत्त्वपूर्ण विरोधाभास आरोग्य क्षेत्रात आढळतो. एकीकडे सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या वैद्यकीय सेवा, डॉक्‍टरांची तुटपुंजी उपलब्धता, सरकारी वैद्यकीय सेवांचा अभाव, तर दुसरीकडे खासगी आरोग्यसेवांचा प्रचंड विस्तार व त्या आधारे परदेशी पर्यटकांचा आरोग्य पर्यटनाकडे वाढता ओघ हा तो विरोधाभास आहे. डॉक्‍टर व रुग्ण यांचे भारतातील गुणोत्तर 1:1674 असे असून, ते जागतिक आरोग्य संघटनेच्या 1:1000 या गुणोत्तराच्या तुलनेत फार कमी आहे. या परिस्थितीत मुळातच सार्वजनिक व खासगी आरोग्य क्षेत्र यांच्यातील असमतोल ही चिंतेची बाब असली तरीही आरोग्य पर्यटनातून मिळणारे परकी चलन आपण कमी असणाऱ्या वैद्यकीय सेवांसाठी पूरक म्हणून वापरू शकलो, तर उपलब्ध स्रोत पर्याप्त पद्धतीने वापरून आपण मानवी विकास निर्देशांकाच्या संदर्भात भरीव कामगिरी करू शकतो. 

दळणवळणाच्या साधनांचा मोठ्या प्रमाणात विकास झाल्यानंतर जगभर पर्यटनाच्या संधी वाढल्या; परंतु जागतिकीकरणानंतर बाजारपेठा मुक्त झाल्या आणि वस्तू व सेवांची देवाणघेवाण वाढली. इथूनच खऱ्या अर्थाने आरोग्यसेवांची गुणात्मकता व त्यांच्या देशादेशांतील किमतींमधील तफावत या दोन गोष्टींमुळे प्रगत देशांकडून भारत, सिंगापूर, मलेशिया, तैवान, थायलंड, दक्षिण कोरिया इ. आशियाई देशांत भरपूर प्रमाणात आरोग्य पर्यटक येऊ लागले. विशेषत: भारतातील कुशल डॉक्‍टर, वैद्यकीय सेवांच्या आंतरराष्ट्रीय किमतींच्या तुलनेत अत्यल्प किमती व त्याचबरोबर भारताला मिळालेला आयुर्वेद व योगविद्येचा वारसा, वैविध्यपूर्ण हवामान इ. गोष्टींमुळे भारतातील आरोग्य पर्यटन हे एकूण पर्यटनाचा एक महत्त्वपूर्ण भाग ठरते. 

प्रगत व अतिप्रगत देशांत झपाट्याने खाली येणाऱ्या मृत्यूदरामुळे वयस्कर नागरिकांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण जास्त झाल्यानेही तेथील आरोग्य पर्यटकांचे होणारे आगमन ही भारतासाठी सुवर्णसंधी ठरली असून, या क्षेत्राचे भवितव्य उज्ज्वल असल्याचा निर्वाळा पुढील सांख्यिकी माहिती देते. 2010 पासून भारतातील आरोग्य पर्यटकांमध्ये लक्षणीय वाढ झालेली असून, ती 2020 पर्यंत चारपटीने वाढून चोवीस लाख, तर 2025 मध्ये ती 50 लाखांपर्यंत पोचेल, असा अंदाज आहे. या आरोग्य पर्यटनातून 2020 मध्ये 620 अब्ज, तर 2025 मध्ये 2000 अब्ज रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. या संपूर्ण क्षेत्राच्या वाढीचा वार्षिक वेग हा 2010 पासून 30 टक्‍क्‍यांच्या जवळपास आहे. दरवर्षी साधारणपणे दीड लाख आरोग्य पर्यटक सुमारे 50 देशांमधून भारतात येतात. या पर्यटकांना भारतात येण्यासाठी उद्युक्त करणारे मुख्य घटक पुढीलप्रमाणे आहेत : 

1) आरोग्य खर्चातील बचत : हृदय शस्त्रक्रिया, सांधेबदलाची 
शस्त्रक्रिया, प्लॅस्टिक व सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया या इतरत्र खर्चिक असणाऱ्या शस्त्रक्रिया या अन्य देशांच्या तुलनेत खूपच कमी म्हणजे 65 ते 90 टक्के कमी खर्चात भारतात होतात. 

2) आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुशलतेची हमी :
अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, कुशल शल्यविशारद आणि संशोधन व विकास यातील भारताची प्रगती ही आरोग्य पर्यटकांना आश्वस्त करते. 

3) सेवा-शुश्रूषेचा उच्च दर्जा :
कुशल परिचारिकांच्या सेवा भारतात मोठ्या प्रमाणात व कमी खर्चात मिळू शकतात. सेवाभाव हे येथील समाजमूल्य असल्याने पर्यटक या सेवांना अग्रक्रम देतात. 

4) कमी प्रतीक्षा कालावधी :
आंतरराष्ट्रीय आरोग्य पर्यटकांसाठी भारतात अत्यल्प प्रतीक्षा कालावधी आहे. यामुळे अनेक शस्त्रक्रिया तातडीने येथे होऊ शकतात. प्रगत देशांत बऱ्याचदा हा कालावधी जास्त असतो. 

5) इंग्रजीचा सर्वदूर वापर :
भारतात होणारा इंग्रजी भाषेचा सर्वदूर वापर हे येथील आरोग्यसेवांची परिणामकारकता वाढवतो. 

6) पूरक व पर्यायी सेवा :
मूळ आरोग्यसेवांबरोबरच स्वास्थ्य, निसर्गोपचार, युनानी, होमिओपॅथी, संगीतोपचार, योगसाधना, पंचकर्म, शिरोधारा अशा अनंत पर्यायी व पूरक आरोग्यसेवा भारतात मोठ्या प्रमाणात विकसित झाल्या आहेत. एकूणच भारताला मिळालेला शाश्वत आरोग्याचा वारसा आरोग्य पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करतो. 

7) आयुर्विमा व इतर विमा योजना : भारतातील खासगी विमा कंपन्यांचा विस्तार व त्यांचे ग्राहकाभिमुख धोरण या सर्वांचा अनुकूल परिणाम आरोग्य पर्यटकांना इथे येण्यास उद्युक्त करतो. 

8) भौगोलिक वैविध्य : येथील भौगोलिक वैविध्य हाही एक मुख्य घटक आहे. गोव्यात अनेक पर्यटक सूर्य-स्नानासाठी येतात, तर दिल्ली परिसर हा भौगोलिकदृष्ट्या सर्व आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय शहरांशी जोडलेला असल्याने, तसेच केरळ हे 'शिरोधारा' या पूरक सेवेसाठी प्रसिद्ध आहे. काही थंड हवेची ठिकाणेही आरोग्य पर्यटकांना विशेष सेवा पुरवून आकर्षित करतात. 

9) सरकारी धोरणे व पारदर्शकता : येथील लोकशाही मूल्ये व आरोग्य पर्यटन परवान्यातील (Medical Visa for Medical Tourists) पारदर्शकता हेदेखील महत्त्वाचे मुद्दे आहेत. 

अर्थातच आरोग्य पर्यटन व आगामी काळातील त्याचा विस्तार याबाबत काही आव्हाने जरूर आहेत. यात मुख्यत्वे पायाभूत सुविधा, काही कौशल्यांचा विकास, प्राथमिक स्वच्छता, योग्य सार्वजनिक स्वच्छता, योग्य कचरा व्यवस्थापन आदी आव्हाने पेलली गेल्यास भारताचे जागतिक आरोग्य पर्यटनातील आघाडीचे स्थान अबाधित राहील.

Web Title: India has a golden chance in Medical Tourism, writes Manasi Gore