नव्या पिढीलाही नेहरूंची आठवण

Narendra Modi Jawaharlal Nehru
Narendra Modi Jawaharlal Nehru

पेहराव, टापटीप, आत्मविश्‍वासयुक्‍त देहबोली, संवादशैली अशा अनेक बाबतींत पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना पंडित जवाहरलाल नेहरूंशी होते. त्यामुळं म्हणा, की नेहरूंसारखा देशाच्या इतिहासावर अमीट ठसा उमटवण्याची क्षमता मोदींमध्येच असल्याचं अनेकांना वाटतं म्हणून म्हणा, देशाच्या पहिल्या व चौदाव्या पंतप्रधानांचं नाव गेली तीन वर्षे अनेकदा जोडीनंच वापरलं जातं.

दोघांची सतत तुलना होते. काही नेहरूप्रेमी मंडळी आरोप करतात, की मोदींना नेहरू व इंदिरा गांधी या बापलेकीचा इतिहासावरील ठसा व वारसा पुसून टाकायचाय. 

परवा, 26 मे रोजी मोदींच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारनं तीन वर्षे पूर्ण केली. त्यांचा करिष्मा अजूनही कायम असल्याची सर्वेक्षणे माध्यमांनी प्रकाशित व प्रसारित केली. 'मोदी, मोदी', असा जयजयकार सुरू आहे. दुसऱ्याच दिवशी, पं. जवाहरलाल नेहरूंचा 53वा स्मृती दिन आला. त्या निमित्तानं नेहरूंच्या कर्तबगारीला उजाळा देण्याचा प्रयत्न 'सोशल मीडिया'वर झाला. 'नवभारताच्या महानायका'साठी नेहरूप्रेमींनी सुरू केलेला 'नेहरूअवर्स' नावाचा 'हॅशटॅग' देशपातळीवर 'ट्रेंडिंग'मध्ये होता. फेसबुकवरही जोरदार चर्चा झडल्या. 

'स्वातंत्र्यानंतर काही वर्षांत हा देश कोलमडून पडेल', या ब्रिटिशांच्या भाकितानंतरचा दंगलींनी खिळखिळा झालेला, निर्वासितांच्या समस्येनं ग्रासलेला देश पंतप्रधान नेहरूंच्या ताब्यात मिळाला होता. सुतळीच्या तोड्यापासून तोफांपर्यंत वाटप झालं होतं. पुढच्या सतरा वर्षांत देश उभा करताना नेहरूंनी नोंदवलेल्या कर्तबगारीचे विविध पैलू या निमित्तानं सोशल चावडीवर आले. त्यांच्या जागतिक दृष्टीला, अलिप्ततावादाला, अणुसंशोधन केंद्र किंवा 'इस्रो-डीआरडीओ'सारख्या विज्ञानसंस्थांच्या स्थापनेला उजाळा मिळाला.

'द इकॉनॉमिस्ट'चं नेहरूंच्या निधनानंतरचं 'वर्ल्ड विदाउट नेहरू' उल्लेखाचं मुखपृष्ठ ट्‌विटर-फेसबुकवर झळकलं. नेहरूंनी भय व द्वेष या दोन मानवी भावनांवर विजय मिळवल्याचे विन्स्टन चर्चिल यांचे उद्‌गार उद्‌धृत करण्यात आले. गांधींची विचारधारा व नेहरूंची धोरणे हेच स्वतंत्र भारताचं संचित आहे, याचा पुनरुच्चार करतानाच 'बरं झालं नेहरू असं नाही म्हणाले, की मला दीडशे वर्षांची घाण साफ करायची आहे', अशी खोचक टिप्पणी झाली. 'कुचाळक्‍या, अपप्रचार करून नेहरू पुसता येणार नाहीत', अशी ग्वाही देण्याचा प्रयत्न झाला. थकलेल्या सोनिया गांधी अन्‌ भांबावलेल्या राहुल गांधींच्या नेतृत्वातील कॉंग्रेसचं काय होईल ते होवो; एरव्ही कॉंग्रेसच्या वर्तुळापुरत्या मर्यादित असलेल्या गांधी, नेहरू वगैरे महान नेत्यांच्या जयंत्या-मयंत्यांची आठवण नव्या पिढीलाही व्हायला लागलीय, हे या 'ट्‌विटर कॅम्पेन'चं वैशिष्ट्य! 

चला, ट्‌विटरलाच धडा शिकवूया! 
काश्‍मीरमधील बहुचर्चित 'ह्युमन शिल्ड'बद्दल सैन्यदलातले मेजर गोगोई यांना केवळ 'क्‍लीन चिट' दिली गेली असं नव्हे; तर लष्कराकडून त्यांचा सन्मानही झाला. त्यादरम्यान सिनेमातले 'बाबूभय्या', खासदार परेश रावल यांनी लेखिका, अभिनेत्री अरुंधती रॉय यांच्याविरोधात केलेल्या 'ट्‌विट'मुळं वादंग माजलं.

अरुंधती रॉयच्या न दिलेल्या मुलाखतीवर प्रतिक्रिया म्हणून केलेलं ते 'ट्‌विट' असल्याचं लक्षात आल्यानंतर रावल यांनी ते काढून टाकलं. तथापि, तशाच मुक्‍ताफळांमुळं अभिजित भट्टाचार्य व सोनू निगम या गायकांचा 'ट्‌विटर'शी बेसूर संवाद घडला.

'जेएनयू'मधील विद्यार्थी नेत्या शैला रशीदला उद्देशून केलेल्या अभद्र 'ट्‌विट'मुळं अभिजितचं 'अकाउंट' बंद केलं गेलं, तर तशाच अभद्रतेला 'ट्‌विटर' संरक्षण देत असल्याचा आरोप करीत सोनू निगमनं 'गुडबाय' केला. हा भेदभाव व अन्यायाचा मुद्दा अनेकांनी उचलून धरला. दोघांचे समर्थक 'ट्‌विटर'वर तुटून पडले. सर्वाधिक राग 'ट्‌विटर इंडिया'चे प्रमुख राहील खुर्शिद यांच्यावर होता. तसं पाहता हा राग काही आताचा नाही. खुर्शिद मूळचे काश्‍मिरी आहेत अन्‌ नरेंद्र मोदी पंतप्रधान बनण्याची तयारी करीत असताना त्यांनी विरोधात मतप्रदर्शन केलं होतं. त्यामुळंच खुर्शिद यांची जानेवारी 2014 मध्ये नियुक्‍ती झाली तेव्हाच त्यांच्याविरोधात रान पेटवलं गेलं होतं. ती नियुक्‍ती रद्द करावी यासाठी एक 'ऑनलाइन' याचिकाही चालवण्यात आली होती. आताही अभिजित व सोनू निगम प्रकरणानंतर त्यांच्यावर लोक तुटून पडले. अशा निर्णयातला आपला वाटा अगदी किरकोळ असल्याचा खुर्शिद यांचा युक्‍तिवाद गदारोळात वाहून गेला. अनेकांनी, इतक्‍या मोठ्या देशाची 'ट्‌विटर'सारखी स्वत:ची 'मायक्रोब्लॉगिंग साइट' का असू नये, असा सवाल करीत थेट 'ट्‌विटर'लाच धडा शिकवायची भाषा केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com