जरा याद करो कुर्बानी...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

भारत - पाकिस्तान या शेजारी देशांमधील आधीच अत्यंत तणावग्रस्त बनलेल्या संबंधांमध्ये सुधारणा होणे किती कठीण आहे, यावर पाकिस्तानच्या वाढत्या कुरापती आणि हेरगिरीची ताजी घटना यांमुळे प्रकाश पडला आहे. 
 

जब देश में थी दीवाली, 
वो खेल रहे थे होली 
जब हम बैठे थे घरो में 
वो झेल रहे थे गोली.... 

 

भारत - पाकिस्तान या शेजारी देशांमधील आधीच अत्यंत तणावग्रस्त बनलेल्या संबंधांमध्ये सुधारणा होणे किती कठीण आहे, यावर पाकिस्तानच्या वाढत्या कुरापती आणि हेरगिरीची ताजी घटना यांमुळे प्रकाश पडला आहे. 
 

जब देश में थी दीवाली, 
वो खेल रहे थे होली 
जब हम बैठे थे घरो में 
वो झेल रहे थे गोली.... 

 

पाकिस्तानने भारताच्या उरीतील लष्करी तळावर केलेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये घुसून 'सर्जिकल स्ट्राइक' केला, त्याला आज एक महिना होत आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण जगाला भारताच्या लष्करी सामर्थ्याचे, तसेच आता भारत कशा प्रकारे सामरिक धोरण आखत आहे, याचे प्रत्यंतर आले आणि देशभरातही एकंदरित उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. हे वातावरण अर्थातच भारतीय जनता पक्ष, तसेच दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी अत्यंत अनुकूल आहे आणि त्याचा होता होईल तेवढा फायदा तोंडावर येऊन ठेपलेल्या उत्तर प्रदेश या कळीच्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत उठवण्याचा प्रयत्नही साहजिकच सुरू आहे. चारच दिवसांपूर्वी वाराणसी या आपल्या मतदारसंघातील एका सभेत बोलताना मोदी यांनी '29 सप्टेंबर रोजी झालेल्या 'सर्जिकल स्ट्राइक'नंतर देशाने 'छोटी दिवाळी' साजरी केली होती आणि आता खऱ्या अर्थाने दिवाळी आली आहे!' असे म्हटले होते; पण आता दिवाळीचा हा महोत्सव देशभरात सुरू असताना, तिकडे सीमेवर, तसेच काश्‍मीरच्या खोऱ्यातील परिस्थिती मात्र दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. भारताने केलेल्या 'लक्ष्यभेदी हल्ल्या'नंतरच्या महिनाभरात पाकिस्तान मूग गिळून गप्प बसलेला नसून, उलट सीमा पार करून हल्ले करण्याचे धोरण पाकिस्तान सातत्याने अमलात आणत आहे. अर्थात, भारतही या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत असून गेल्या आठवडाभरात 15 पाकिस्तानी सैनिकांना भारताने कंठस्नान घातले आहे. या चकमकींमध्ये भारतीय जवानही रक्‍ताने न्हाऊन निघत असून, त्यामुळेच 'जब देश मे थी दीवाली... वो झेल रहे थे गोली...' या अजरामर पंक्‍तींची आठवण येणे स्वाभाविक आहे.

पाकिस्तानने भारताला लक्ष्य करण्याचे हे प्रयत्न केवळ सीमेवरील चकमकींपुरतेच मर्यादित ठेवलेले नसल्याचे दोनच दिवसांपूर्वी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्‍तांच्या कार्यालयातून सुरू असलेल्या हेरगिरीच्या कारवायांमुळे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानी उच्चायुक्‍तांच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्यास गोपनीय स्वरूपाची माहिती खरेदी करताना पकडण्यात आले असून, गेली तीन वर्षे हा अधिकारी 'आयएसआय' या पाक गुप्तचर यंत्रणेसाठी काम करत असल्याचे त्यामुळे उघड झाले आहे. पाकिस्तानात जाण्यासाठी व्हिसा मागायला येणाऱ्यांना हा अधिकारी हेरगिरी करण्यास भाग पाडत असल्याचे चौकशीतून बाहेर आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, त्यामुळे अशा प्रकारे हेरगिरीत गुंतलेल्या राजस्थानातील तीन हेरांची माहिती त्यामुळेच हाती लागली आहे. त्या तिघांनाही अटक करण्यात आली असली तरी, हे जाळे किती दूरवर पसरले आहे, याचाही शोध घेणे जरुरीचे आहे. त्याचे कारण म्हणजे या तिघांकडे भारतीय लष्कर राजस्थानात नेमके कोठे कोठे तैनात केलेले आहे, याचे नकाशे आढळून आले आहेत. भारताने तडकाफडकी या अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्याचे आदेश दिल्यानंतर पाकिस्ताननेही लगेच इस्लामाबादेतील भारतीय उच्चायुक्‍तांच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्यावरही तशीच कारवाई केल्यामुळे पाकिस्तान आता बिलकूलच नमते घ्यायला तयार नाही, यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. या दोन शेजारी देशांमधील आधीच अत्यंत तणावग्रस्त बनलेल्या संबंधांमध्ये सुधारणा होणे किती कठीण आहे, यावरच या साऱ्या घटनांमुळे प्रकाश पडला आहे. 

एकीकडे देशात दिवाळीचे, उत्साहाचे मंगलमय वातावरण असताना, सीमेवर पाकिस्तानने सुरू ठेवलेल्या कुरापतींना तोंड देण्याची आणि त्याचबरोबर पाकच्या अंतर्गत कारवायांवर नजर ठेवण्याची ही पहिलीच वेळ असली तरी, 1962 मध्ये चीनने मॅकमोहन रेषा ओलांडून भारतावर आक्रमण केले, तेव्हाही दिवाळीच होती. देश सणांच्या आनंदात आणि उत्साहात दंग असतानाच, सीमेवर घुसखोरी करण्याचे शेजारी देशांचे हे धोरण त्यामुळेच नवे नाही. त्यामुळे दिवाळीनंतरचे नववर्ष शुभंकर आणि मंगलमय जावो, अशा शुभेच्छा देतानाच, भारतीय जवानांच्या सीमेवरील अतुलनीय कामगिरीस 'जरा याद करो कुर्बानी...' म्हणत सलाम करायला हवा. 

Web Title: Indian Army jawan martyred in firing by Pakistani troops