Amir Hussain Lone: पायाच्या बोटांमध्ये चेंडू धरून गोलंदाजी, गौतम अदानी यांना देखील भावुक करणारा काश्मीरचा ‘फिनिक्स’

ही कहाणी आहे काश्‍मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील आमिर हुसैन लोन या ३४ वर्षीय तरुणाची.
jammu and kashmir para cricketer amir hussain lone sachin tendulkar
jammu and kashmir para cricketer amir hussain lone sachin tendulkar esakal

- मयूर भावे

वयाच्या आठव्या वर्षी घरच्याच वखारीतील लाकूड कापण्याच्या यंत्रात अंगातील जॅकेट अडकले आणि यंत्राच्या धारदार पात्याखाली त्याने दोन्ही हात गमावले. पुढची तीन वर्षे तो रुग्णालयात होता... औषधोपचारांचा खर्च परवडत नाही म्हणून सरळ विष देऊन मारून टाका इथपर्यंतचे सल्ले लोकांनी त्याच्या आई-वडिलांना दिले...

Amir Hussain Lone

खर्चापायी जमीन विकावी लागली, सॉ मिल बंद पडली.... आयुष्याची अशी राखरांगोळी झालेली असतानाही त्याची जिजिविषा अभंग राहिली. तो धडपडत राहिला. त्या राखेतूनच त्याने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उंच झेप घेतली. तो उत्तम फलंदाजी करतो आणि आज जम्मू-काश्‍मीर पॅरा क्रिकेट संघाचा (अपंगांसाठीचे क्रिकेट) कर्णधार होतो.

ही कहाणी आहे काश्‍मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील आमिर हुसैन लोन या ३४ वर्षीय तरुणाची. बिजबेहरातील वाघमा गावचा रहिवासी असलेल्या आमिरचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आणि त्याची दखल खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने घेतली. ‘अशक्यही शक्य करून दाखवण्याचे काम आमिरने केले आहे. Amir Hussain Lone Sachin tendulkar

त्याचे खेळावरील प्रेम, समर्पण यातून दिसते. त्याची जिद्द पाहून मी खूप प्रभावित झालो आहे. एक दिवस आमिरला नक्की भेटेन आणि त्याच्या नावाची जर्सी विकत घेईन. त्याने लाखो लोकांना प्रभावित केले आहे’ हे उद्‍गार सचिनने आमिरबद्दल काढले आणि त्याचा व्हिडिओही पोस्ट केला.

त्यानंतर काही क्षणांत आमिर जगाच्या काना-कोपऱ्यांत पोहोचला होता. उद्योगपती गौतम अदानी यांनी ‘तुझा संघर्ष, हीच आमची प्रेरणा आहे’ अशा शब्दांत भावना व्यक्त करून आमिरला सर्वतोपरी मदत करण्याचे जाहीर केले.

मानेजवळ घट्ट बॅट पडकून चेंडूला फटकावणारा आणि पायाच्या बोटांमध्ये चेंडू धरून गोलंदाजी करणाऱ्या आमिरचा प्रवास खचितच सोपा नाही. हात गमावल्यानंतरची काही वर्षे आपण जिवंतपणी अक्षरशः मरण अनुभवत होतो, असे तो सांगतो.

या काळात त्याची आजी ‘फाजी’ हिने त्याला शाळेत जायला आणि विविध कौशल्ये शिकण्यास प्रेरित केले. दोन्ही पायांत चमचा धरून खाणे, कपडे घालणे, लिहिणे अशा कित्येक गोष्टी तो हळूहळू करू लागला. एक दिवस आजीने त्याच्या दिशेने चेंडू फेकला आणि त्याला तो पकडण्यासाठी ती शिकवू लागली.

याच खेळातून त्याची क्रिकेटची आवड पुन्हा जागृत झाली आणि मग मात्र त्याने मागे वळून पाहिलेच नाही. २०१३ मध्ये आमिरच्या एका शिक्षकांनी त्याला क्रिकेट खेळताना पाहिले आणि त्यांनी त्याला पॅरा क्रिकेटचे अवकाश दाखवले. स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर आणि मेहनतीने तो जम्मू-काश्‍मीर पॅरा क्रिकेट संघाचा कर्णधार झाला.

‘उद्या काय घडेल, ते कोणीही सांगू शकत नाही. तरीही एक दिवस मी आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून खेळेन, असा मला विश्‍वास वाटतो’ हाच आशावाद उराशी बाळगून पॅरा क्रिकेटच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी आमिर रोज संघर्ष करतो आहे.

विकासाच्या मोजक्या संधी, पायाभूत सुविधांची वानवा ते माथी भडकवणाऱ्या अराजक शक्तींचा सुळसुळाट अशा विविध संकटांना सामोरे जाणाऱ्या जम्मू-काश्‍मीरमधील तरुणाईने स्वतःसमोर आमिर हुसैनचा आदर्श ठेवायला हवा.

मध्यंतरी आमिरला एका कार्यक्रमात निमंत्रित करण्यात आले होते. त्या वेळी अभिनेता विकी कौशलही उपस्थित होता. आमिरची कहाणी ऐकून तो खूप प्रभावित झाला. आमिरवर चरित्रपट तयार झाल्यास आपल्याला त्याची भूमिका साकारायला आवडेल, असे विकीने त्या वेळी घोषितही केले होते.

आमिरचा प्रवास पाहताना मिर्झा गालिबचा एक शेर पुन्हा पुन्हा आठवतो. आमिरच्या जीवनाचं मर्मच जणू त्यात आहे. तो म्हणजे -

हाथों की लकीरों पर मत जा ऐ ग़ालिब,

नसीब उनके भी होते हैं जिनके हाथ नहीं होते!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com