
International Nurses Day 2021 : कौतुकाऐवजी आधी प्रश्न सोडवा !
कोरोनाविरोधातील लढ्यात परिचारिका (Nurses) आणि आशा वर्कर (Asha Workers) यांनी मोलाची आणि महत्त्वाची भूमिका बजावली आहे. खडतर आव्हाने आणि गैरसोयी यावर मात करत त्या लढा देत आहेत. त्यामुळे आजच्या (ता. 12 मे) जागतिक परिचारिका दिनानिमित्ताने (International Nurses Day) त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्याबरोबरच त्यांच्या समस्या दूर करणे आणि संरक्षणात्मक सुविधा दिल्यास त्यांच्या कार्याची योग्य दखल घेतली जाईल. (Instead of praising nurses, they need to address important issues)
संपूर्ण जगभर बारा मे हा दिवस फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या स्मरणार्थ परिचारिका दिन म्हणून साजरा होतो. करुणा आणि सेवा याचे पांढऱ्या पोशाखातील रूप म्हणून परिचारिकांकडे आजपर्यंत पाहिले गेले. परंतु कोरोना काळात जागतिक पातळीवर त्यांना "योद्धा' संबोधले जाऊ लागले. मानवी इतिहासात आरोग्य सेवा जेव्हा सार्वजनिक रूपात आली, तेव्हापासून परिचारिकांमुळे ती स्त्रीकेंद्री राहिली आहे. भारतामध्ये सुरवातीच्या काळात केवळ विधवा, परित्यक्त्या, कुमारिका, बालविधवा याच या पेशामध्ये असत. परंतु आता विवाहित स्त्रियाही मोठ्या प्रमाणावर परिचारिका आहेत, तर अनेक तरुणी जाणीवपूर्वक स्वतःची करिअर नर्सिंगमध्ये करण्याचा निर्णय घेत आहेत. कोरोना काळात खासगी आणि सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये परिचारिका जीवाला धोका पत्करून महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. याबाबत ग्रामीण आणि शहरी भागात घरोघरी संपर्क साधून कोरोना रुग्णांची माहिती घेणे आणि कोरोना विषयक माहिती देण्याचे काम आशा वर्कर करीत आहेत. परिचारिका दिनानिमित्ताने कोरोना योद्धा म्हणून त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे. तथापि, त्यांची प्रत्यक्ष स्थिती खूपच दयनीय आहे. त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेबाबत, कामाच्या ठिकाणी मिळणाऱ्या कोरोना विरोधी सोयी- सुविधांबाबत खूप दुर्लक्ष होते आहे. पुढची काही वर्षे आपल्याला कोरोनाचा सामना करावा लागणार आहे, हे वास्तव आपण मान्य करत असू; तर आरोग्यसेवेतला कोरोना विरोधी केंद्रबिंदू असलेल्या परिचारिका आणि आशा वर्कर यांच्या समस्यांचा गांभीर्याने विचार करावा लागेल. त्यांच्या पाठीशी उभे राहावे लागेल.
महासाथीने वाढले काम
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषयक आरोग्य सेवांबाबत अनेक मार्गदर्शक तत्त्वे देताना परिचारिकांचाही वेगळा विचार केला आहे. त्याची अंमलबजावणी आपल्याकडे होत नाही, ही खेदाची गोष्ट आहे. कोरोना रुग्णांशी सगळ्यात जवळून संपर्क परिचारिकांचा येतो. पण त्यांच्या सुरक्षिततेचे उपाय अपुरे आहेत, असे गेल्या दोन वर्षांत त्यांच्या युनियननी केलेल्या मागण्या तसेच विविध अहवाल यावरून लक्षात येते. अनेक नर्सेसना कोरोना बाधा झाली, पण त्यांना योग्य उपचार मिळत नाहीत. पीपीई किटमध्ये काम करणे महिला म्हणून अवघड जात आहे. नैसर्गिक विधीसाठी जाणे किंवा मासिक पाळीच्या काळामध्ये कपडे बदलणे या गोष्टी खूप अवघड होतात. त्याचा आरोग्यावरही परिणाम होतो. एरवीही पेशंटवर उपचार करताना एक माणूस म्हणून त्याच्या तब्येतीतल्या चढउताराचे नर्सेसच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर निश्चितपणे परिणाम होतात. कामाचे तास हे आठ तासांहून जास्त असतात. कोरोना काळात कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे भारही वाढले. त्यामुळे परिचारिकांवरील शारीरिक, मानसिक ताण निश्चितपणे वाढले आहेत.
प्रतिबंधात्मक सुविधा द्याव्यात
महाराष्ट्रामध्ये परिचारिकांची संख्या अत्यंत अपुरी आहे. सात हजारांहून जास्त जागा रिक्त आहेत. परिणामी, परिचारिकांवर कामाचा ताण वाढत आहे. कोरोना व्यवस्थापनामध्ये खेदाची बाब म्हणजे याचा प्राधान्याने विचार केला जात नाही. जम्बो रुग्णालयात परिचारिकांना करारावर नेमले. परंतु तिथेही परिचारिकांना कोरोनापासून सुरक्षिततेचे योग्य उपाय, साधने, तसेच वेळेवर पगार, कामाचे तास या गोष्टींचा अभाव आहे. म्हणून प्रेम, सेवा, त्याग, करुणा याचे गुणगान गाताना परिचारिकांना कोरोना काळात कामाच्या योग्य सेवाशर्ती देणे हाच त्यांना योद्धा म्हणून गौरविण्याचा खरा अर्थ असेल.
दुर्लक्षित आशा वर्कर
परिचारिकाएवढेच आज कोरोना संबंधी काम करणाऱ्यात आशा वर्कर महत्त्वाची भूमिका ग्रामीण व शहरी भागात बजावत आहेत. घरोघरी जाऊन रुग्णाची नोंद घेऊन जागृती करणे हे काम शासनाने त्यांना दिले आहे. 2005 पासून माता-बाल आरोग्यावर काम करणाऱ्या या महिलांना ही जबाबदारी नवी आहे. पण अजूनही शासकीय आरोग्य सेवेचा महत्त्वाचा दुवा म्हणून प्रत्येक गावात काम करणाऱ्या या महिलांना मानधनावर काम करावे लागते. कोरोना ड्यूटीचा भत्ता अनेक जिल्ह्यांमध्ये आशा वर्करना मिळालेला नाही. गावपातळीवर काही ठिकाणी त्यांच्यावर हल्लेही झालेले आहेत. आशा वर्करनाही कोरोना योद्धा मानले जाते. पण परिचारिकांसारखीच त्यांची स्थिती आहे. या कोरोना योद्ध्यांनाही शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळणे आवश्यक आहे. कोरोनाविषयक आरोग्य सेवांमध्ये परिचारिका आणि आशा वर्कर महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा वेळी अनेक जणींचे कुटुंबीय बाधित झाले. त्यांना कोरोना विरोधातील संरक्षणाचं कवच मात्र पूर्णपणे मिळत नाही. म्हणूनच त्यांच्या योद्धेपणाचे शाब्दिक कौतुक नको, प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी संरक्षण, कोरोना विरोधातल्या सुविधा आणि कर्मचारी म्हणून त्यांच्या हक्काचे संरक्षण अग्रक्रमाने दिले पाहिजे. आरोग्य व्यवस्था बदलत असताना जागतिक परिचारिका दिनानिमित्ताने ही नोंद शासन आणि समाज दोघांनीही घेतली पाहिजे.
समस्या परिचारिकांच्या
प्रत्येकीला मिळते दिवसाला एकच पीपीई किट
नैसर्गिक विधी, मासिक पाळी याबाबत अडचणी
नियमित रुग्णाच्या संपर्काने शारीरिक, मानसिक ताण
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पौष्टिक आहार मिळत नाही
कर्मचारी संख्या अपुरी, रिक्त पदे लवकर भरावीत
जबाबदारी वाढल्याने कामाचे तास आठ तासांपलीकडे
- लता भिसे सोनावणे