From Pathardi to Telangana DGP: The Inspiring Journey of IPS Mahesh Bhagwat
Sakal
आशिष तागडे
सरकारच्या प्रशासनात करिअर करण्याचे स्वप्न अनेक जण पाहतात. परंतु तेवढ्या जिद्दीने त्या स्वप्नाचा पाठपुरावा सगळेजण करतातच असे नाही. पाथर्डी(जि. अहिल्यानगर)सारख्या कायम दुष्काळी असलेल्या गावातील एका तरुणाने मात्र हे स्वप्न पाहिले आणि ते साकार करण्यासाठी जिद्दीने प्रयत्नही केले. हा तरुण म्हणजे नुकतेच तेलंगणाचे ‘पोलिस महासंचालक’ झालेले महेश भागवत. भागवत हे १९९५ बॅचचे आयपीएस अधिकारी. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण पाथर्डी येथे, तर पुढील शिक्षण पुणे येथे झाले. आजपर्यंतच्या सेवेत त्यांनी नक्षलवाद्यांच्या विरोधातील अनेक मोहिमांत सहभाग घेतला आहे. व्हाईट कॉलर गुन्हेगारी नियंत्रणात आणणे, संघटित अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करणे, मानवी तस्करीला आळा घालणे, पीडितांना लैंगिक तस्करीच्या जाळ्यात अडकू न देणे, राज्य, देश व परदेशात तस्करांवर खटला चालवणे, अशा मोहिमा त्यांनी यशस्वीपणे राबविल्या आहेत. प्रशासनात सहभागी होऊन सरकारी यंत्रणांचा लोकविकासासाठी वापर करायचा या भूमिकेतून त्यांनी ‘यूपीएससी’ची परीक्षा दिली. समाजातील काही प्रश्न मुळापासून सोडविले पाहिजेत, ही धारणा ठेवून कामास प्रारंभ केला. संघटित मानवी तस्करीच्या जाळ्यातून त्यांनी दोन हजारांहून अधिक महिला व मुलींची सुटका केली आहे. कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी दोनशे कुंटणखाने बंद केले आहेत. वीटभट्ट्या व इतर ठिकाणी काम करणाऱ्या सात हजारांहून अधिक बालमजूर व वेठबिगारांची सुटका केली आहे. ओडिशा राज्यातील बालमजुरांसाठी त्यांनी सुरू केलेल्या विद्यालयाचा एका हजार विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे.