दुष्टचक्राचे प्रवर्तक

इराण-इस्राईल यांच्यातील संघर्षाची ठिणगी पश्‍चिम आशियात युद्धाची व्याप्ती आणि परिणाम वाढवू शकते. हा संघर्ष चिघळू नये, यासाठी परिणामकारक प्रयत्न होताना दिसत नाहीत.
iran israel conflict west asia war need to take action
iran israel conflict west asia war need to take action Sakal

दुधावरिली साय निवडुनि दिधली । तैसी परी जाली आम्हां तुम्हां ॥

धालों मी ब्रह्में उदार सब्रह्में । अनुदिनीं प्रेमें डुल्लतसे ॥

- संत ज्ञानेश्‍वर

जगाचे पुढारपण आपल्याकडे आहे, या धारणेने वावरणाऱ्या आर्थिक-लष्करी शक्ती आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा कमालीच्या संकुचित हितसंबंधांचे राजकारण रेटू पाहतात तेव्हा शांतता, स्थैर्य कसे झाकोळून जाते, याचे प्रत्यंतर सध्या जगाला येत आहे.

अशा राजकारणातून होणारी हानी तेवढ्यापुरती राहात नाही, तिचे परिणाम दूरगामी होतात आणि त्याच्या झळा सगळ्यांना सोसाव्या लागतात. थोडक्यात एका संघर्षातून दुसरा, त्यातून तिसरा... अशा प्रकारचे दुष्टचक्र सुरू होते.

रशियाचे युक्रेनविरुद्ध सुरू असलेले युद्ध आणि सहा महिन्यांपूर्वी ‘हमास’ने इस्राईलवर चढविलेल्या हल्ल्यानंतर सुरू झालेले युद्ध थांबण्याची चिन्हे तर नाहीतच; पण त्या संघर्षांची व्याप्ती वाढत चालली आहे. हे सगळे हाताबाहेर जाऊ नये, यासाठी सर्वांत जास्त परिणामकारक प्रयत्न करण्याची ताकद कोणाकडे असेल तर ती अमेरिकेकडे आहे.

पण ती त्या दिशेने वापरली का जात नाही, हा मोठाच प्रश्न आहे. युक्रेनला सुरू असलेल्या अखंड शस्त्रपुरवठ्यामागे अमेरिकेतील शस्त्रास्त्रउत्पादकांची प्रबळ लॉबी आहे, हे लपून राहिलेले नाही. पश्चिम आशियातही इस्राईलला आवर कसा घालायचा याबाबत बायडेन यांच्याकडे काही स्पष्ट धोरण असल्याचे दिसत नाही.

अध्यक्ष बायडेन यांनी एकीकडे इस्राईलच्या पाठीशी आहोत, असे सांगतानाच तेथील बेंजामिन नेतान्याहू सरकारला सबुरीचे आवाहनही केले. पण युद्धज्वर सौम्य होण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट अमेरिकेने काठावर राहू नये, ‘हमास’ आणि पश्चिम आशियातील इतर शत्रूंच्या विरोधात अधिक सक्रियतेने उतरावे, अशीच इस्राईलची इच्छा आहे.

दमास्कसमधील इराणच्या दूतावासावर हल्ला चढवून ‘इराणी रिव्होल्युशनरी गार्ड’च्या दोन जनरलसह सात अधिकाऱ्यांना इस्राईलने ठार मारले. हे कमांडर पॅलेस्टिनी जिहादींना भेटण्यासाठी तेथे गेल्याची माहिती इस्राईली गुप्तचरांना मिळाल्यानंतर हा हल्ला चढविण्यात आल्याचे सांगण्यात येते.

हे करण्यामागे अमेरिकेला या संघर्षात जास्तीत जास्त गुंतवण्याची इस्राईलची इच्छा हे कारण असू शकते. या कृतीनंतर इराणची प्रतिक्रिया येणार हे उघडच होते. काही ड्रोन हल्ले आणि होर्मूझ सामुद्रधुनीजवळ इस्राईलशी संबंधित मालवाहू जहाजाचे इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ने केलेले अपहरण यातून इराणचे इरादे स्पष्ट झाले आहेत.

जहाजावर १७ भारतीय नागरिक आहेत. आता त्यांना सोडविण्यासाठी भारत सरकारला राजनैतिक पातळीवर प्रयत्न करावे लागत आहेत. या संघर्षाची व्याप्ती आणखी वाढली तर भारतासह अनेक देशांवर त्याचे विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. पहिला फटका तेलपुरवठ्याला बसू शकतो.

खनिज तेलाचे दर वाढले तर आयातीवर प्रामुख्याने अवलंबून असलेल्या भारतासारख्या देशांना झळ बसू शकते. तिकडे रशिया-युक्रेन युद्धामुळे आधीच इंधनपुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम झाल्याने युरोपीय देश त्रासलेले आहेत.

आता आखाती देशांतून होणाऱ्या इंधनपुरवठ्यावर परिणाम झाला, तर त्यांची स्थिती आणखी खराब होईल. शिवाय, युद्धाचा भडका उडला तर आधीच अशांत लाल समुद्रामुळे विस्कळीत झालेली युरोप आणि आखाती देशातील भारताची व्यापारी मालाची वाहतूक अधिक खर्चिक होऊ शकते.

पश्चिम आशियातील राजकारणात अत्यंत महत्त्वाकांक्षी देश म्हणजे इराण. अमेरिका व इस्राईल हे आपले शत्रू असल्याचे इराणने जाहीर केलेच आहे. आयातुल्ला खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली १९७९ मध्ये झालेल्या ‘धार्मिक क्रांती’नंतर या ‘इस्लामिक क्रांती’चे रक्षण करण्यासाठी रिव्होल्युशनरी गार्ड (आयआरजीसी) स्थापन करण्यात आले.

या पथकातील सैनिकांची बांधिलकी इराणच्या मुख्य लष्कराशी नव्हे तर धर्मगुरूंशी आहे. आजही इराणचे मुख्य सैन्य आणि हे रिव्होल्युशनरी गार्ड हे दोघे समांतर रीतीने काम करतात. एक लाख नव्वद हजार प्रशिक्षित सैनिक ‘आयआरजीसी’कडे आहेत.

इराणच्या भू, सागरी आणि हवाई सीमांचे संरक्षण करण्याबरोबरच संपूर्ण पश्चिम आशियात ‘शियापंथीयांचे जाळे’ मजबूत करण्याचे काम या सैन्यावर सोपविलेले आहे. सीरियाच्या बशर अल्‌ असद या सत्ताधीशाविरुद्धच्या असंतोषातून झालेल्या यादवीत ‘आयआरजीसी’ने ‘हिज्बुल्ला’ आणि रशियाच्या मदतीने असद यांची तळी उचलून धरली.

याशिवाय ठिकठिकाणच्या दहशतवादी गटांशी संधान साधले. पॅलेस्टाईनच्या प्रदेशात ‘हमास’ आणि ‘इस्लामिक जिहाद’, येमेनमध्ये ‘हौथी’, लेबनॉनमध्ये ‘हिज्बुल्ला’ अशा गटांशी ‘आयआरजीसी’चे लागेबांधे आहेत.

प्रामुख्याने छुप्या युद्धाचे दहशतवादी तंत्र ते वापरत आले आहेत. पण आता संघर्षाला अधिक गंभीर परिमाण मिळाले आहे. पश्चिम आशियात युद्धाचा भडका होण्याची शक्यता कशी आणि किती आहे, याची यावरून कल्पना येऊ शकते. एकूणच अमेरिका असो वा रशियातील पुतीनशाही असो, किंवा इराण व त्याच्या पंखाखालील दहशतवादी गट आणि इस्राईलसारखे देश असोत; त्यांच्या कृती अशांततेचे दुष्टचक्र निर्माण करणाऱ्या ठरत आहेत.

जगाला आज कशाची गरज असेल तर चांगले साखळी परिणाम घडवणाऱ्या ‘प्रसादचक्रा’ची. संयुक्त राष्ट्रांची स्थापन त्यासाठीच तर झाली होती! पण या बाबतीत ती संस्था बव्हंशी निष्प्रभ ठरली आहे. जगापुढचे सर्वात मोठे आव्हान आहे, ते हिंसक संघर्षांचे दुष्टचक्र थोपविण्याचे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com