नाम बडे और... 

Italy football team
Italy football team

इतर क्षेत्रांत पूर्वपुण्याईच्या छायेत काही काळ गुजराण करता येत असेल; पण खेळाच्या बाबतीत तसे होत नाही. मैदानावर सातत्याने दर्जेदार कामगिरी करूनच आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध करावे लागते. इटलीला यंदा याचा प्रत्यय नक्कीच आला असेल. चार वेळा जगज्जेता ठरलेला इटलीचा फुटबॉल संघ यंदा विश्वकरंडक स्पर्धेसाठी अपात्र ठरला. त्यामुळे इटलीचे कट्टर पाठीराखे नशिबाला बोल लावतील. पात्रता गटातच स्पेन आल्याने ही अवस्था ओढविली. नशिबाची माफक साथ लाभली असती, तर गटात स्पेनऐवजी रुमानिया किंवा वेल्स आले असते; पण जागतिक पात्रता स्पर्धेची गटवारी जागतिक क्रमवारीवर ठरते आणि इटलीची जागतिक क्रमवारीत घसरण झाली आहे, हे विसरले जात आहे. 

इटलीला जागतिक फुटबॉलमध्ये स्वतंत्र ओळख आहे. भक्कम बचाव हे आक्रमण ठरू शकते, हे त्यांनी दाखवले. फुटबॉलपटू घडवण्याचा त्यांचा एक ढाचा होता; पण त्याला त्यांनी स्वतःच त्याला हादरे देऊन ती प्रक्रिया विस्कळित केली. खरे तर एक-दीड वर्षापूर्वी इटली "युरो'च्या साखळीतच बाद होणार होते; पण त्यांनी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली आणि त्या मूळ दुखण्याचा विसर पडला. इटालियन व्यावसायिक लीगमधील वाढत्या परदेशी खेळाडूंच्या संख्येकडे आता लक्ष वेधले जात आहे. अनेक विरोधी पक्षांनी ही संधी साधत स्थानिक - बिगर स्थानिक वाद सुरू केला आहे.

भ्रष्टाचाराने काही वर्षापूर्वी इटलीचे फुटबॉल विश्‍व पोखरले गेले होते. त्यावर इलाज शोधताना खेळाडूंची जडणघडण दुर्लक्षितच राहिली. त्यातच आपली "सिरी ए स्पर्धा' इंग्लंडमधील प्रीमियर लीगच्या तोडीची स्पर्धा असावी, यासाठी जास्तीत जास्त परदेशी खेळाडू, मार्गदर्शक आले आणि इटलीच्या राष्ट्रीय संघासाठी चांगल्या खेळाडूंची वानवा होत गेली. "घुसखोरी रोखा, इटलीतील फुटबॉल खेळाडूंना खेळू द्या,' अशा आशयाची टिप्पणी आता इटलीतून सर्वत्र होत आहे. 

जागतिक फुटबॉलमध्ये केवळ नावावर, व्यावसायिक लीगमधील डॉलर, पौंडच्या ओघावर यश मिळत नाही, याच्या झळा इंग्लंडने सहन केल्या होत्या. मग त्यांनी नवोदित खेळाडू घडविण्याकडे लक्ष दिले, त्यातून त्यांनी वयोगटाच्या दोन स्पर्धा जिंकल्या. सुमारे दोन दशकांपूर्वी फुटबॉलमध्ये पीछेहाट सुरू झाल्यावर जर्मनीने आपल्याकडील खेळाडूंचा व्यावसायिक लीगमधील भर वाढवला आणि प्रगती केली. त्यातून ना इटली शिकले, ना नेदरलॅंड्‌स. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com