अग्रलेख   : मा, मस्क आणि माणूस...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

‘अलिबाबा’ या ऑनलाइन ट्रेडिंग कंपनीचे सर्वेसर्वा जॅक मा आणि चालकरहित मोटारीची निर्मिती करणारी टेस्ला कंपनी, तसेच सूर्यमालेतील दूरवरच्या ग्रहांवर मानवी वस्तीसाठी प्रयत्न करणारे ‘स्पेसएक्‍स’चे संकल्पक एलन मस्क हे ते दोन दिग्गज.

औद्योगिक क्रांतीनंतरच्या गेल्या दोनशे वर्षांमध्ये पृथ्वीतलावरचा माणूस हळूहळू यंत्रांच्या आहारी गेला. दैनंदिन आयुष्यातल्या छोट्या-मोठ्या कामांपासून ते कारखान्यांमधल्या वस्तुनिर्मितीपर्यंत माणसाचा प्रत्येक पळ व प्रत्येक घटका यंत्रांशी जोडली गेली. मानवजात आता एका स्थित्यंतराच्या टप्प्यावर उभी आहे. हा टप्पा आहे मशिनने, यंत्राने मानवी कामे करण्याचा, आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेल्या यंत्रांनीच माणसाचा ताबा घेण्याचा. शारीरिक कष्टाच्या कामांमध्ये रोबोची मदत घेणे ते त्या रोबोनेच मानवी मेंदूचे काम करणे, यंत्रच माणूस बनणे, असा हा प्रवास आपल्या सगळ्यांना एका गहन प्रश्‍नापर्यंत घेऊन आला आहे. साडेचार अब्ज वयाच्या पृथ्वीवर माकड ते माणूस अशा उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून गेलेल्या, पंचवीस लाख वर्षांपूर्वी माणूस म्हणून अवतरलेल्या या प्राण्याचे भविष्य अन्‌ भवितव्य काय? माणसानेच शोध लावलेली यंत्रे त्याचा पूर्णपणे ताबा घेतील, की माणूस आपल्या निसर्गदत्त हुशारीने पुन्हा पुन्हा अनावर होणाऱ्या यंत्रांवर अंकुश कायम ठेवील? चीनमध्ये शांघाय येथे जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदेत या प्रश्‍नाचे उत्तर ज्यांच्याकडून जगाला अपेक्षित आहे, असे दोन दिग्गज एका मंचावर आले. बाजारातील मानवी व्यवहार व वर्तणुकीवर ज्या कंपनीची बारीक नजर असते आणि त्या आधारे ग्राहक ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न होतो, अशा ‘अलिबाबा’ या ऑनलाइन ट्रेडिंग कंपनीचे सर्वेसर्वा जॅक मा आणि चालकरहित मोटारीची निर्मिती करणारी टेस्ला कंपनी, तसेच सूर्यमालेतील दूरवरच्या ग्रहांवर मानवी वस्तीसाठी प्रयत्न करणारे ‘स्पेसएक्‍स’चे संकल्पक एलन मस्क हे ते दोन दिग्गज. आपण उठता बसता ज्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा आणि त्यामुळे नष्ट होणाऱ्या नोकऱ्यांची चर्चा करतो, त्यावर अधिकारवाणीने बोलू शकतील अशा या दोघांच्या भाकितांचा प्रवाह मात्र एक नाही. 

अपेक्षेप्रमाणे एलन मस्क यांना वाटते, की येणारे युग माणसाचे नव्हे, तर मशिनचे, यंत्रांमधील मेंदूचे असेल. विज्ञान इतक्‍या वेगाने पुढे निघालेय, की त्याचा वेग समजणेदेखील माणसाच्या कुवतीबाहेर आहे. थोडक्‍यात, आता माणसाच्या हातात फारसे काही राहिलेले नाही. जॅक मा यांना विज्ञान व तंत्रज्ञानाची प्रगती व महत्त्व मान्य आहे. पण, त्यांना वाटते, मशिन कधीच माणसाची जागा घेऊ शकणार नाही, माणूसच अधिक बलवान असेल. यंत्रे माणसांनीच तयार केलेली असल्याने ती कधीच माणसाच्या पुढे जाणार नाहीत. माणसावर अंतिम विजय मिळवू शकत नाही. संगणक माणसाने बनवला, संगणकाने माणूस बनविल्याचे उदाहरण नाही. खरेतर ही चर्चा तशी चिरंतन आहे. अगदी चाकापासून ते संगणकापर्यंत माणसाच्या हाती कोणताही नवा शोध आला की ही अशी चर्चा होतच होते. त्याचे कारण मानवी जाणिवांमध्ये आहे आणि अशा जाणिवा, भावभावना, राग-लोभादी षड्‌रिपू वगैरे मनाचे खेळ तांत्रिक उपकरणांना जमणार नाहीत, हेच शाश्‍वत सत्य असल्याचे अनेकांचे मत आहे. जॅक मा या पंथाचे आहेत. ते खरे असले तरी विसरायचे नाही, की क्‍लोनिंग व अन्य तंत्राच्या साह्याने गर्भाशयाबाहेर नवा सस्तन प्राणी जन्माला घालण्याचे कौशल्य दोन दशकांपूर्वीच माणसाने आत्मसात केले आहे. कृत्रिम हृदय किंवा मेंदू बनविण्याचेही प्रयोग आहेत. महत्त्वाचे म्हणजे मृत्यूवर विजय मिळविणे शक्‍य असल्याचे दावेही अधूनमधून केले जातात. 

मा व मस्क या दोघांचे ज्या दोन गोष्टीवर एकमत झाले, त्या या मृत्यूवर संभाव्य विजयाशी संबंधित आहेत. माणसाला मृत्यू हवाच. कारण, नवी पिढी नेहमी नव्या संकल्पना घेऊन जन्माला येते. या पिढी दर पिढी प्रवासानेच आजचा तंत्रस्नेही व विज्ञानप्रेमी माणूस विकसित झाल्याचे शाश्‍वत सत्य दोघांनाही मान्य आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती अशीच होत राहिली, तर माणसाचे सरासरी आयुर्मान एकशेवीस किंवा सव्वाशे वर्षे अगदी नजीकच्या वर्षांमध्ये शक्‍य आहे. दुसरा मुद्दा लोकसंख्येच्या विस्फोटामुळे माणसांना राहण्यासाठी पृथ्वी अपुरी पडणे स्वाभाविक आहे आणि त्यामुळे सूर्यमालेतल्या आणखी एखाद्या ग्रहावर राहण्याची तजवीज करून ठेवायला पाहिजे. एलन मस्क तर मंगळावर मानवी वस्तीची तयारी करीतच आहेत. भविष्यातल्या या बेगमीचे कारण पृथ्वीवर राहणाऱ्या माणसांच्याच चुकांमध्ये दडलेले आहे.

स्टीफन हॉकिंग यांनी निधनापूर्वी सांगितल्यानुसार, एका बाजूला माणसाचे जगणे विज्ञानामुळे अधिक सुखावह होत असले तरी हा प्राणी विध्वंसक आहे. जीविताचे साधन बनलेली वसुंधरा आपल्याच हाताने नष्ट करण्याची विध्वंसक शक्‍ती माणसाने अण्वस्त्रांच्या रूपाने मिळविलेलीच आहे. तिच्या वापराचा अविवेक माणसात आहेच. त्याशिवाय निसर्ग ओरबाडण्याच्या सवयीमुळे नैसर्गिक संकटे कोसळणे सुरूच आहे. त्यात एखादी महाकाय उल्का पृथ्वीवर आदळण्याचीही शक्‍यता आहेच. थोडक्‍यात, मा व मस्क यांनी ज्याचे स्वागत केले, तो मृत्यूच शाश्‍वत आहे. मानवी जीवन क्षणभंगुर आहे. त्या क्षणभंगुरतेचे भान, जाणीव कायम मनात असली की ‘मॅन व्हर्सेस मशीन’ वादाला फारसा अर्थ उरत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jack Ma and Elon Musk