कश्‍मीर तो होगा, लेकिन...

श्रीमंत माने shrimant.mane@esakal.com
मंगळवार, 27 सप्टेंबर 2016

पाकिस्तान ये कान खोलकर सुन ले,
अबकी अगर जंग छिडी तो नामोनिशान नहीं होगा
कश्‍मीर तो होगा, लेकिन पाकिस्तान नहीं होगा

पाकिस्तानमधून आलेल्या अतिरेक्‍यांनी जम्मू-काश्‍मीरमधल्या उरीच्या लष्करी तळावर केलेला भ्याड हल्ला आणि त्यात धारातीर्थी पडलेल्या अठरा भारतीय जवानांच्या हौतात्म्यामुळे प्रत्येक भारतीयाला प्रचंड वेदना झाल्या आहेत. गेल्या रविवारच्या या घटनेनंतर देशाच्या कानाकोपऱ्यात पाकिस्तानविरुद्ध मोठा क्षोभ आहे. भारतीय मने व्याकूळली आहेत. "दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांनी हल्ल्याचा बदला घ्यावा‘, ही देशवासीयांची भावना आहे. बदलादेखील कसा तर जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचे नामोनिशाण मिटेल असा. ही भावना नेमकेपणाने व्यक्‍त करणारी एका अनामिकाची हिंदी कविता "सोशल मीडिया‘वर "व्हायरल‘ आहे. त्या कवितेचा "व्हिडिओ‘ उरीतल्या हल्ल्यानंतर प्रथम "यूट्यूब‘वर आला. "कश्‍मीर तो होगा, लेकिन पाकिस्तान नही होगा‘, या मथळ्याची ही वीररसातील कविता हिमाचल प्रदेश पोलिसांचा एक जोशिला हेड कॉन्स्टेबल पोलिस जवानांनी भरलेल्या एका बसमध्ये मोठ्या आवाजात म्हणतोय आणि बसमधले त्याचे सहकारी समूहस्वरात "पाकिस्तान नही होगा‘, अशी त्याला साथ देताहेत, असा तो "व्हिडिओ‘ आहे. त्या हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे मनोज ठाकूर. आठवडाभरात लाखो भारतीयांनी तो पाहिलाय. "फेसबुक‘, "व्हॉट्‌सऍप‘वर तो वेगाने पुढे पाठवला जातोय.

पाकिस्तान ये कान खोलकर सुन ले,
अबकी अगर जंग छिडी तो नामोनिशान नहीं होगा
कश्‍मीर तो होगा, लेकिन पाकिस्तान नहीं होगा

असा इशारा नाठाळ शेजारी देशाला या कवितेतून देण्यात आला आहे. भारताचे स्वातंत्र्य, त्या वेळी झालेली फाळणी, पाकिस्तानचा जन्म आणि टोळीवाल्यांचा हल्ला ते 1965, 1971चे युद्ध, कारगिलमधील घुसखोरी अशा आतापर्यंतच्या पाकविरुद्धच्या लढाया, वेळोवेळी झालेले शांतता करार आदींचे संदर्भ देत ही कविता पुढे सरकते.

हम डरते नहीं अणुबम्बो और विस्फोटक जलपोतों से
हम डरते है शिमला और ताश्‍कंद जैसे समझोतों से

असं परखड मत मांडतानाच या कवितेत दुश्‍मनांना समज देण्यात आलीय, की

सियार भेडियों से डर सकती, सिंहों की औलाद नहीं
भारत वंश के इस पानी की है तुमको पहचान नहीं

या कडव्याने भारतवासीयांच्या शौर्याची आठवण करून देण्यात आलीय आणि "विश्‍व के मानचित्र पर पाकिस्तान नहीं होगा‘, असा इशारा दिला गेलाय.
"सोशल मीडिया‘ व अन्य माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, हा "व्हिडिओ‘ उरी हल्ल्यापूर्वीच, गेल्या कारगिल विजय दिनाला, 26 जुलैला तयार केला होता. महत्त्वाचे म्हणजे ही कविता कुणाची आहे, याचा शोध गेली अनेक वर्षे संमेलने व कथांमध्ये ही कविता ऐकविणाऱ्या साध्वी बालिका सरस्वती किंवा बालिका साध्वी ठाकूर यांनाही माहिती नाही. साध्वी बालिका सात वर्षांच्या असल्यापासून कथा करतात व तेराव्या वर्षी त्यांनी ही कविता पहिल्यांदा गायली. केवळ भारतातच नव्हे; तर देशाबाहेरच्या अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्येही तिचा उच्चार झाला. इंग्लंडमध्ये वगैरे दहशतवादाविरोधातला भारतीय आवाज असे तिचे वर्णन केले गेले. "आयएसआय‘ व अन्य काही संघटनांकडून त्यासाठी साध्वी बालिका सरस्वती यांना धमक्‍याही मिळाल्या. असे मानले जाते, की साध्वी बालिकाने गायलेली ही कविता मनोज ठाकूर यांनी ऐकली असावी. ओतप्रोत देशप्रेम आणि भारतीयांच्या मनातला पाकविरोधी संताप नेमकेपणाने व्यक्‍त करणारी ती असल्याने त्यांनी सहकारी जवानांच्या साक्षीने गाऊन तिचा "व्हिडिओ‘ तयार केला असावा. उरी हल्ल्यानंतर ती अशी "व्हायरल‘ झाली, तेव्हा मनोज ठाकूर यांनी देशवासीयांना उद्देशून एक संदेशही "सोशल मीडिया‘वर टाकला. तमाम भारतीयांच्या प्रखर देशभक्‍तीला त्या संदेशात त्यांनी सलाम केलाय.

Web Title: Jammu-Kashmir in India