
गाओची शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णालयाला यापूर्वीही दंड करण्यात आला होता. अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी त्या रुग्णालयाकडे परवानाही नव्हता. या बाबी आता उघड झाल्या आहेत.
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीने मागे एका फेअरनेस क्रीमची जाहिरात नाकारली होती. दोन कोटी रुपयांच्या कामास चक्क नकार दिला. कारण अधिक उजळ होण्याची सध्याच्या तरुणांमध्ये असलेली स्पर्धा पाहता त्वचेच्या रंगावरून दुजाभाव केला जाऊ नये, अशी भूमिका तिने घेतली होती. सौंदर्य हेच ज्या क्षेत्राचा मूळ गाभा आहे अशा ठिकाणी एखाद्या अभिनेत्रीने अशी भूमिका घेणे हे विरळच. सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक कलाकार विविध पद्धतीने उपचार घेत असतात. बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी, शिल्पा शेट्टी, ऐश्वर्या राय, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा अशा अनेकींनी अधिक सुंदर दिसण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी केल्या आहेत. पण, एखादी कॉस्मेटिक शस्त्रक्रिया फसली की ते सांगण्याचे धारिष्ट्य प्रसिद्ध चिनी अभिनेत्री आणि गायिका गाओ लियू हिने दाखविले आहे.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मुळात प्रत्येकाला निसर्गदत्त सौंदर्य असतं, त्यावर शस्रक्रिया करून अधिक सुंदर दिसण्याचा आटापिटा बहुधा सारेच आपापल्या आर्थिक कुवतीप्रमाणे करत असतात. त्यात आघाडीवर असतात ते रूपेरी पडद्यावर चमकणारे सितारे. वजन कमी-जास्त करण्यापासून ते सदैव तरुण दिसण्यापर्यंत अनेक प्रयोग ते स्वत:च्या शरीरावर करत असतात. त्यातलीच एक चिनी अभिनेत्री गाओ लियू. अवघ्या २४ वर्षीय गाओने अनेक चिनी चित्रपट आणि टीव्ही मालिका केल्या आहेत. तिचे सुमारे ५० लाख फॉलोअर्स आहेत. गेल्या ऑक्टोबरमध्ये तिला एका मित्राने नाकावर कॉस्मेटिक सर्जरी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ती अधिक सुंदर दिसेल, असेही तिला सांगितले. त्यानुसार गाओ ग्वांगझू येथील एका रुग्णालयात दाखल झाली. डॉक्टरांनी सुमारे चार तास तिच्या नाकावर शस्त्रक्रिया केली. आपण अधिक सुंदर दिसणार या स्वप्नात असलेल्या गाओचे हेच चार तास भविष्याचे दुःस्वप्न दाखविणारे ठरले. शस्त्रक्रियेनंतर तिच्या नाकाला सूज आली, तो भाग काळा पडला होता. तिच्या नाकाच्या शेंड्याच्या भागातील पेशी मृत पावल्या होत्या. त्यामुळे नाकाची फारच विचित्र स्थिती झाली होती. एखाद्या सुंदर अभिनेत्रीसाठी हा अनुभव किती विदारक असू शकतो याची कल्पनाच केलेली बरी. या काळात तिच्या मनात अनेकदा आत्महत्येचे विचारही आले. या फसलेल्या शस्त्रक्रियेमुळे पुढील उपचार करण्यासाठी तिला पुढचे दोन महिने रुग्णालयात राहावे लागले. यामुळे गाओचे मोठेच आर्थिक नुकसान झाले. सुमारे चार लाख युआनच्या उत्पन्नावर तिला पाणी सोडावे लागले. आता नाकावरील दुरुस्ती उपचारासाठी आणखी एक वर्षभर लागणार आहे.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
गाओची शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णालयाला यापूर्वीही दंड करण्यात आला होता. अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी त्या रुग्णालयाकडे परवानाही नव्हता. या बाबी आता उघड झाल्या आहेत. मात्र असा काहीसा विद्रूप चेहरा दाखविण्याचे धैर्य कोणत्याही अभिनेत्रीने केले नसते. पण गाओ लियूने सर्वांनीच सावधगिरी बाळगावी म्हणून आपले विचित्र नाकाचे फोटो समाजमाध्यमांवर टाकले आहेत. कारण चीनमध्ये कॉस्मेटिक सर्जरीचे आकर्षण आहे. २०१९ मध्येच तेथे ६० हजार विनापरवाना क्लिनिकची भर पडली आहे. हे प्रमाण परवानाधारक क्लिनिकच्या सहा पट जास्त आहे. अशा रुग्णालयांत दरवर्षी सुमारे ४० हजार अपघात होत असतात. तरीही त्याचे आकर्षण कमी होत नाही. त्यामुळे गाओ लियूने जनजागृतीसाठी आपले असे फोटो टाकून इतरांना सावध केले आहे. प्रतिमेवर विपरीत परिणाम करणाऱ्या कोणत्याच बाबी सेलिब्रेटी शक्यतो जाहीर करत नाहीत. अशा मानसिकतेच्या जगात गाओसारख्या एखाद्या उदयोन्मुख अभिनेत्रीने शस्त्रक्रियेनंतर कुणाच्याही "नाकी''नऊ येऊ नयेत म्हणून केलेली जनजागृती कौतुकास्पदच आहे.