भाष्य : ‘सत्तर तासां’चा मुद्दा इच्छाशक्तीचा

‘इन्फोसिस’चे संस्थापक, माहिती-तंत्रज्ञान उद्योग क्षेत्रातील अध्वर्यू नारायण मूर्ती यांच्या एका विधानाने एका नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
Youth Work Time
Youth Work TimeSakal

- जितेंद्र डहाळे

ध्येय समोर असले आणि ते मिळवण्यासाठी लागणारी उत्कटता असली की, माणूस आठवड्याला सत्तर तास काम करू शकतो. ती भावना क्षीण झाली की मात्र तो कामाचे तास मोजायला लागतो! या विषयाला असे बरेच कंगोरे आहेत. नारायण मूर्ती यांनी केलेल्या आवाहनावरून त्यामुळेच उलटसुलट चर्चेचे पेव फुटले. पण हा मुद्दा दृष्टिकोनाचा आहे. नारायण मूर्ती त्यांचा एक दृष्टिकोन मांडत आहेत आणि तो सरसकट झटकून टाकावा, असे वाटत नाही.

‘इन्फोसिस’चे संस्थापक, माहिती-तंत्रज्ञान उद्योग क्षेत्रातील अध्वर्यू नारायण मूर्ती यांच्या एका विधानाने एका नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. ‘तरुणांनी आठवड्यात ७० तास काम केलं पाहिजे’, असे मत त्यांनी व्यक्त केले आणि त्यावर उलटसुलट प्रतिक्रियांचे मोहोळ उठले. आधीच माहिती-तंत्रज्ञान (आयटी) उद्योगात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ्याविषयी काळजी व्यक्त होत आहे.

त्यांच्यात रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या विकारांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता अलीकडे वारंवार व्यक्त होत असतानाच ही सत्तर तासाच्या कामाची सूचना आल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. या उद्योगात काम करणाऱ्या तरुणांमधील घटस्फोटाचे प्रमाणही वाढत असल्याचे बोलले जाते. अशावेळी कामाचा वेळ आणि स्वतःचे आयुष्य यांच्यातील समतोल आणखी बिघडवणारा बदल कशासाठी, असा प्रश्न विचारला जात आहे.

देशाच्या प्रगतीसाठी, उत्पादकतावाढीसाठी आठवड्यातून सत्तर तास कामाची सूचना एकीकडे आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य, खासगी आयुष्य यांत निर्माण होत असलेले प्रश्न दुसरीकडे, अशा दोन बाजू या निमित्ताने पाहायला मिळत आहेत.

यातली मेख अशी की, तुम्ही कुठल्या बाजूने बघाल ती प्रत्येक बाजू तुम्हाला बरोबर वाटू शकेल. माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या दृष्टीने बघता बऱ्याच कंपन्या चांगले, कुशल, बुद्धिमान कर्मचारी मिळवण्यासाठी आणि राखण्यासाठी उत्तम पगार देतात. ह्या चढाओढीमध्ये बऱ्याच वेळा कर्मचाऱ्याला त्याच्या अनुभवापेक्षा जास्त पगार दिला जातो. कंपनी फायद्यात राहाण्यासाठी कर्मचाऱ्याच्या पगाराच्या तिप्पट नफा मिळण्यासाठी कंपनी प्रयत्नशील असते.

आता त्या कमी अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला जास्त पगार दिला असल्याने त्याने जास्त काम केल्याशिवाय तेवढ्या अपेक्षित प्रमाणात फायदा मिळवणे अवघड असते. म्हणून कंपन्या त्याने जास्त काम करावे यासाठी जास्तीत जास्त सुविधा देऊन त्याच्याकडून काम करून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

कर्मचाऱ्यांनी नोकरी बदलली तर त्यांना ३० ते ४० टक्के पगारवाढ सहज मिळू शकते. शिवाय आजकाल एक ऑफर हातामध्ये ठेवून दुसरी नोकरी बघत राहणे आणि दुसऱ्या कंपनीशी वाटाघाटी करून जास्त पगार घेणे, हा तर अगदी प्रचलीत व्यवहार झाला आहे. त्यामुळे आपला अनुभव किती आहे आणि त्याप्रमाणे आपण कंपनीला काय देऊ शकतो, याचा विचार न करता बरेच कर्मचारी जास्तीत जास्त पगार कसा मिळेल याच्यामागे असतात.

जास्त पगार दिल्यामुळे तयार झालेल्या कंपनीच्या अपेक्षा आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या अवघड गोष्टी याचा विचार मात्र बऱ्याचदा आधी केला जात नाही. कर्मचारी गलेलठ्ठ पगाराकडे आणि बँक बॅलन्सकडे बघत काम करत राहतात.

वैयक्तिकदृष्ट्या बघता आजकालच्या वेगवान लाइफस्टाइल आणि मोबाईलमुळे समाजात झालेला एक मोठा बदल म्हणजे कमी झालेली एकाग्रता आणि प्रत्येक गोष्टीचा तत्काळ हवा असलेला मोबदला. मग तो पैशाच्या रूपात असो, अथवा कौतुकाच्या. त्यामुळे जे काम अतिशय एकाग्रतेने केले पाहिजे आणि पुरेसा वेळ देऊन केले पाहिजे, त्यावरही परिणाम होतो.

वर्क-लाइफ बॅलन्स

चांगल्या पगारामुळे सुधारलेली क्रयशक्ती हाही एक महत्त्वाचा विषय झालेला असतो. आता या क्रयशक्तीचा उपयोग कर्मचारी कसे करतात, हे पाहायला हवे. ‘आजचा दिवस आजच जगा’ हा विचार प्रमाण मानून जगणारे वेगवेगळ्या प्रकारे सुटीचा दिवस घालवतात. पाश्चात्य जगाप्रमाणे ही जनता वेळ मिळाला की किंवा शनिवार-रविवार आला की ‘बॅलन्स’ आणण्यासाठी पार्टी करणे, रात्रभर जागून धमाल करणे असे प्रकार करतात.

पण यातून ‘वर्क-लाइफ बॅलन्स’ साधला जातो का? खरे तर यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणामदेखील विचारात घेतले पाहिजेत. फक्त कामामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतो का? तसा समज असेल तर तो सदोष आहे, असे म्हणावे लागेल.

आयुष्याचा खरा आनंद हा तब्येत जपणे, नेम पाळणे, ध्येय निश्चित करून ते गाठण्यासाठी लागणारे कष्ट करणे, आणि त्याचवेळेस आपलं कुटुंब, आपले आई- वडील, मित्रमंडळी, समाज, या सर्वांसाठी वेळ देणे आणि आपली कर्तव्य पार पडणे यालाही वर्क- लाइफ- बॅलन्स म्हणता येईल. आपले शेतकरी पेरणीच्या किंवा खुडणीच्या दिवसात ६०-७० तास श्रम सहज करतात. कित्येक छोटे-मोठे व्यावसायिक आठवड्याला ७० तास सहज काम करताना दिसतील.

कित्येक परिचारिका एवढा वेळ आरोग्यसेवेच्या महत्त्वाच्या कामात असतात. सीमेवरचे जवान ७० तास अहोरात्र गस्त ठेवतात. या सर्वांच्याही वेगवेगळ्या समस्या असतील; पण आपण स्वतःच वाढवलेल्या भरमसाठ अपेक्षा आणि गरज नसताना फुगवलेलं राहणीमान हे त्यांच्याबाबतीत आढळत नाही.

आता एका वेगळ्याच आणि व्यापक पैलूवर बोलायचे म्हटले तर जागतिक स्तरावर असलेली भारताची स्थिती विचारात घेतली पाहिजे. अमेरिका, युरोप, चीन, यांच्या तुलनेत आज मनुष्यबळाच्या बाबतीत भारताची स्थिती चांगली आहे. भारताला मिळत असलेल्या आघाडीचे सर्वात महत्त्वाचे कारण हे कर्मचाऱ्यांमधील चिकाटी, जिद्द, हुशारी आणि भारतीयांची असलेली क्षमता हेच आहे.

कित्येक अमेरिकी किंवा युरोपियन युनिव्हर्सिटींमध्ये आता भरपूर भारतीय तरुण विद्यार्थी शिकायला जात आहेत. कित्येक तरुण अमेरिकेत नोकरी करण्यास जात आहेत. तिकडे गेल्यावर हेच तरुण आठवड्याला ६०-७० तास काम करायला सहज तयार असतात आणि करतातही. त्याचे कारण हे त्यांचे ध्येय आणि पॅशन हेच आहे. याचा अर्थ भारतीय तरुणाईत क्षमता ही आहेच.

थोडक्यात काय तर ध्येय समोर असले आणि ते मिळवण्यासाठी लागणारी उत्कटता असली की, मनुष्य ७० तास काम करू शकतो. ती भावना क्षीण झाली की मात्र तो कामाचे तास मोजायला लागतो. ७० तास काम या विषयाला असे बरेच कंगोरे आहेतच. पण मुळात सत्तर तासाची सक्ती कोणीच करीत नाही.

नारायण मूर्ती यांच्या सांगण्याचा हेतूदेखील विशिष्ट संस्थेसाठी, मालकासाठी ७० तास राबा असा नाही. त्यांचे म्हणणे असे की, ज्या देशांनी प्रगतीची शिखरे गाठली, त्या देशातील मनुष्यबळाचा त्यात मोठा वाटा असतो. त्यामुळेच ध्येयाने भारलेल्या तरुण पिढीने जर निश्चय केला, तर ते खरोखरच आश्चर्यकारक वेगाने प्रगतीची शिखरे गाठू शकतात.

युरोप, अमेरिकेतही एवढे कामाचे तास नाहीत, असे काहीजण म्हणत आहेत. पण या देशांनी प्रगतीचा एक टप्पा गाठला आहे. आपल्याला अद्याप तो गाठायचा आहे, याचे भान विसरता कामा नये. दुसरे म्हणजे नारायण मूर्ती यांनी केलेले हे फक्त आवाहन आहे. प्रत्येकाने त्याविषयी स्वतः ठरवायचे आहे. त्यामुळे यात चूक, बरोबर असे काहीच नाही.

७० तास काम करणे हे शक्य तर आहेच; पण ते कोणाला किती जमेल ते परिस्थिती, क्षमता, व्यवस्था, आर्थिक स्थिती, मनुष्यस्वभाव, एखाद्याची समज, ध्येय, आवड अशा अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. पण एक सोपा नियम सांगायचा म्हणजे, माणसाने प्रथम आपली क्षमता आणि आपली तब्येत ह्याला प्राधान्य द्यायला पाहिजे. त्यानंतर आपले ध्येय, स्वभाव आणि जबाबदाऱ्या यानुसार आपण काय आणि किती करायचे हे ठरवले तर बरेच सोपे होऊ शकेल.

समाधान हे हवेच आणि त्यातूनच खरा आनंद मिळेल हे ज्याला कळले तो ह्या चक्रात अडकलेला दिसणार नाही. जेव्हा जमतेय तेव्हा भरपूर काम करा, कष्ट करा आणि चांगली संपत्ती जमवा. नारायण मूर्तींनाही भारतीयांची क्षमता माहीत आहेच. म्हणूनच ते ‘तरुणांनी ७० तास काम करावे’, असे म्हणाले. केवळ कंपन्यांची नव्हे तर प्रत्येकाची वैयक्तिक आणि देशाची प्रगतीही त्यांना अभिप्रेत असणार, यात शंका घेण्याचे कारण नाही.

(लेखक व्हर्च्युअल रिॲलिटी क्षेत्रातील कंपनीचे (ईथॉश डिजिटल) सीईओ असून आयटी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामाचा त्यांना दीर्घ अनुभव आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com