JusticeForPayal : रॅगिंगच्या घटना कशा टाळता येतील?

प्रवीण दीक्षित
मंगळवार, 28 मे 2019

रॅगिंगमुळे मुंबईतील एका डॉक्‍टर विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक आणि चिंताजनक आहे. अशा घटना होऊ नयेत यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याबरोबरच, पीडित विद्यार्थ्यांच्या तक्रारींची वेळीच आणि गांभीर्याने दखल घेतली पाहिजे.

रॅगिंगमुळे मुंबईतील एका डॉक्‍टर विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक आणि चिंताजनक आहे. अशा घटना होऊ नयेत यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याबरोबरच, पीडित विद्यार्थ्यांच्या तक्रारींची वेळीच आणि गांभीर्याने दखल घेतली पाहिजे.

मुंबईतील नायर मेडिकल कॉलेजमधील डॉ. पायल तडवी या जळगावच्या आदिवासी डॉक्‍टर विद्यार्थिनीने तिच्याबरोबर असणाऱ्या अन्य डॉक्‍टर विद्यार्थिनी व तिला शिकवणाऱ्या एका डॉक्‍टर शिक्षिकेने दिलेल्या त्रासाला कंटाळून नुकतीच आत्महत्या केली, अशी तक्रार तिच्या आईने केली आहे. या विद्यार्थिनीची आई मुलीला होणाऱ्या त्रासाबाबत तक्रार करण्यासाठी नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना भेटण्यास गेली असता, तिला स्त्रीरोग विभागप्रमुखांकडे पाठविण्यात आले. त्या ठिकाणच्या विभागप्रमुखांनी इंग्रजीत काय सांगितले ते आपल्याला कळले नाही, असे पायलच्या आईचे म्हणणे आहे. या घटनेनंतर आत्महत्येला प्रवृत्त करणे, रॅगिंगविरुद्धचा कायदा, भारतीय दंडविधान, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून या घटनेचा तपास करण्यात येत आहे.

रॅगिंगच्या घटनांविरुद्ध महाराष्ट्र सरकारने वीस वर्षांपूर्वी कायदा करूनही व रॅगिंगविरुद्ध समिती आणि अन्य उपाययोजना केलेल्या असतानाही रॅगिंगच्या घटना विविध व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांमधून घडत असल्याचे दिसते. जेवढ्या घटना घडतात, त्यातील अतिशय थोड्या घटनांबाबत वाच्यता होते व त्यातील फारच थोड्या घटनांमध्ये प्रत्यक्ष कारवाई होते. सर्वोच्च न्यायालयाने अशा घटनांविरुद्ध वारंवार निर्णय देऊनही आणि कडक कायदे असूनही या दुर्दैवी घटना थांबत नाहीत. या व्यवसायातील अनेक जण या ना त्या प्रकारे रॅगिंग होऊ नये, असे म्हणत असले, तरी त्याविरुद्ध मनापासून उपाय योजण्यास तयार नसतात. किंबहुना रॅगिंगचे बळी असलेल्यापैकी काही जण पुढे जाऊन नवीन विद्यार्थ्यांना रॅगिंग करताना आढळतात. आपल्या कुटुंबाची बेअब्रू होईल या भीतीपोटी आणि व्यवसायातील अन्य लोकांनी आपल्याला बहिष्कृत करू नये, या भावनेने नवीन विद्यार्थी/विद्यार्थिनीही रॅगिंगविरुद्ध तक्रार करत नाहीत.

हे प्रकार टाळण्यासाठी नवीन शैक्षणिक सत्राच्या प्रारंभीच नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून योग्य व अयोग्य गोष्टींची सर्वांना सुस्पष्ट कल्पना देणे आवश्‍यक आहे. त्यात रॅगिंग किंवा लैंगिक त्रास किंवा अनुसूचित जाती-जमातींच्या नावाखाली अत्याचार, जात व धर्माच्या नावाखाली त्रास देणे, हिणवणे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि ते खपवून घेतले जाणार नाही, हे स्पष्ट करणे आवश्‍यक आहे. वसतिगृहामध्ये केवळ सीसीटीव्ही यंत्रणा लावून रॅगिंगच्या घटना थांबतील, अशी अपेक्षा करणे बरोबर नाही. त्यासाठी वसतिगृह प्रमुख, सल्लागार यांनी नवीन विद्यार्थ्यांशी वारंवार संपर्क साधून त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल सहानुभूतीने चौकशी करणे व वागणे आवश्‍यक आहे. रॅगिंगविरुद्धच्या समितीने काही तक्रार आल्यास चौकशी करणे, अशा प्रकारे मर्यादितरीत्या काम न करता संस्थेतील प्राध्यापक, वरिष्ठ विद्यार्थी आणि अन्य सर्व यांच्यासाठी वारंवार सभा, चर्चा, स्पर्धा आयोजित करून रॅगिंगच्या घटना होणार नाहीत, असे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. रॅगिंगचे बळी असणाऱ्यांना साह्य करण्यासाठी सल्लागार नेमणे आवश्‍यक आहे. विविध प्रकारच्या पार्श्वभूमीमधून आलेल्या नवीन विद्यार्थ्यांना भाषा, राहणीमान याबद्दल त्यांची विविधता राखून इतरांबरोबर कसे काम करावे यासंबंधीचे मार्गदर्शन करणे आवश्‍यक आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सरकारने रॅगिंगविरुद्ध ‘ॲप’ बनविणे व त्यातून रॅगिंगविरुद्ध माहिती सर्व संबंधितांना देणे ही तातडीची आवश्‍यकता आहे. आजमितीस सर्व प्रथम डॉक्‍टर पायलच्या कुटुंबीयांना भरीव आर्थिक मदत देऊन, अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी सर्व संबंधितांनी जबाबदारीने पावले उचलण्याची आवश्‍यकता आहे.
(लेखक निवृत्त पोलिस महासंचालक आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: JusticeForPayal pravin dixit write ragging article in editorial