कारगिल युद्धावेळी हवाई दलाचा वापर केला असता तर...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

स्वातंत्र्योत्तर काळातील भारताच्या संरक्षण इतिहासातील एक महत्त्वाचे पान ‘कारगिल’च्या युद्धाचे आहे. पाकिस्तानी आक्रमण परतवून लावताना जवानांनी केलेला अतुलनीय पराक्रम आणि केलेले बलिदान कायमच प्रेरणा देत राहील. कारगिल विजयाला आज (२६ जुलै) वीस वर्षे पूर्ण होत असताना त्या पराक्रमाच्या आठवणींना दिलेला उजाळा आणि ‘कारगिल’च्या निमित्ताने संरक्षण व्यवस्थेत जाणवलेल्या त्रुटींची विविध अंगांनी केलेली ही मीमांसा. भविष्यात अशा प्रकारचे संकट आल्यास त्याचा मुकाबला कसा करायला हवा, याची दिशा दाखविणारी. या मीमांसेबरोबरच कारगिलच्या ताज्या दौऱ्यात घेतलेल्या एका वेगळ्या अनुभवाला ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने दिलेले शब्दरूप.

लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राजेंद्र निंभोरकर
कारगिल युद्ध आणि त्यात मिळविलेला विजय, याचे स्मरण करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते; ती म्हणजे या युद्धावेळी हवाई दलाचा वापर झाला नाही. त्या वेळी हवाई दलाचा वापर केला गेला असता, तर युद्धात जास्त जवान धारातीर्थी पडले नसते. म्हणूनच, कारगिलवेळी हवाई दलाचा वापर न करणे ही चूक होती. सर्जिकल स्ट्राइक करून हवाई दलाचा वापर कशाप्रकारे करून घेता येतो, हे आपण आता दाखवून दिले आहे.

कारगिल युद्धावेळी खूप कमतरता होती. गाड्या नव्हत्या, पुरेसा दारूगोळा नव्हता. त्यामुळे ऐनवेळी महागड्या दरात साधनसामग्री खरेदी करावी लागली. पाकिस्तान पुरेशा शक्तीनिशी आपल्यावर तुटून पडला होता.

भारतापासून कारगिलला तोडण्याचा प्रयत्न करताना त्यांना राष्ट्रीय महामार्ग १ ताब्यात घ्यायचा होता. त्यासाठी ते जोरदार हल्ले करीत होते. या काळात मी नौशेरा सेक्‍टरमध्ये असताना एक बाँब फुटला आणि त्याचा एक तुकडा माझ्या छातीत गेला होता. गंभीर जखमी झालो; पण सुदैवाने बचावलो. हे युद्ध म्हणजे आव्हान होते. परंतु, युद्धसामग्रीची कमतरता असूनही भारतीय सैन्याने इच्छाशक्तीच्या जोरावर हे युद्ध जिंकले.

लष्करातील सामग्रीची स्थिती २०१६ पर्यंत खराब होती. परंतु, उरीतील घटनेनंतर स्थिती बदलली. पंधरा हजार कोटींची खरेदी केली गेली. तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी खरेदीचे स्वातंत्र्य दिले. दहा दिवस युद्ध चालले, तर त्यासाठी लागेल तेवढी सामग्री घेण्याची मुभा लष्कराला मिळाली. आता लष्कर पूर्ण तयारीनिशी सज्ज असेल. कारण नवीन रायफली, थर्मल इमेजर, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची दर्जेदार युद्धसामग्री, दारूगोळा, नवी हत्यारे सैन्य दलाकडे आहेत. आता कोणत्याही लढाईसाठी भारतीय सैन्य दल तयार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kargil War Air Force Use Rajendra Nimbhorkar