कॅलेंडरवरची ‘गांधीगिरी’ (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवर नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र लावण्याचा ‘उद्योग’ करण्याची खरे म्हणजे आवश्‍यकता नव्हती; परंतु प्रतिमानिर्मितीच्या नादात औचित्याची चिंता कोण करतो?

गांधीजींचे माहात्म्य सिद्ध करण्यासाठी त्यांना‘भारतरत्न’सारख्या कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाही! तेव्हा त्यांच्यावर हा जुलूम करण्याची काही गरज नाही,’ असे जाज्ज्वल्य उद्‌गार कर्नाटक उच्च न्यायालयाने अवघ्या दोनच वर्षांपूर्वी महात्मा गांधींना ‘भारतरत्न’ देण्यात यावे, म्हणून दाखल करण्यात आलेली एक जनहित यचिका फेटाळून लावताना काढले होते. त्यानंतर आता खादी ग्रामोद्योग मंडळाची दिनदर्शिका आणि डायरी यावरील महात्माजींचे छायाचित्र हटवून त्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिष्ठापना केल्यामुळे नवा वाद उभा राहिला आहे आणि त्यात कडी केली आहे ती हरियानाचे भारतीय जनता पक्षाचे मंत्री अनिल विज यांनी! ‘मोदी हा ‘ब्रॅण्ड’ महात्माजींपेक्षा मोठा ब्रॅण्ड आहे’, या त्यांच्या उद्‌गारांमुळे खळबळ उडाली असून, आता यापूर्वी किती वेळा ते कॅलेंडर आणि ती डायरी यावर महात्माजींचे छायाचित्र नव्हते, याचे दाखले दिले जात आहेत. गांधीजींचे माहात्म्य अवघ्या विश्‍वाला दशांगुळे पुरून उरणारे असल्यामुळे, त्यांचे छायाचित्र हटवणे, हा या वादातील प्रमुख मुद्दाच नाही, हे या वादात हिरीरीने उतरणारे सारेच विसरून गेले आहेत. मुद्दा आहे, तो त्या जागी मोदी यांचे छायाचित्र लावण्याचा! सध्या रिकामी जागा दिसेल तेथे, म्हणजेच ‘पेटीएम’ची जाहिरात असो, की ‘जीओ’ची; मोदी यांचेच छायाचित्र लावण्याचा रिवाज पडून गेला आहे. त्यामुळेच खादी ग्रामोद्योग मंडळाच्या कॅलेंडरवर त्यांचे छायाचित्र लावण्याच्या निर्णयामागील हेतूंबाबत शंका घ्यायला जागा निर्माण झाली आहे.

भारतीय जनता पक्ष अडीच वर्षांपूर्वी केंद्रात सत्तेवर आला आणि मोदी पंतप्रधान झाले. तेव्हापासून त्यांनी महात्मा गांधी तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांना जणू दत्तक घेतले आहे! यामागे जवाहरलाल नेहरू यांचे नाव आधुनिक भारताच्या इतिहासातून पुसून टाकण्याचा हेतू स्पष्ट असला तरी त्यामुळेच आता महात्माजींचे छायाचित्र कॅलेंडरवरून का उतरवण्यात आले, हा प्रश्‍न ठळकपणे समोर येतो. मोदी यांना राष्ट्रपित्याचीच नव्हे, तर विश्‍वपित्याची जागा त्यांच्या भक्‍त मंडळींनी खरे तर यापूर्वीच बहाल केली आहे! त्यामुळे खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवर त्यांची छबी लावण्याचा उद्योग करण्याची खरे म्हणजे आवश्‍यकता नव्हती. त्यातही पुन्हा ते छायचित्र आहे ते थेट महात्माजींच्या ‘पोज’मधील चरख्यावर सूत कातणारे! ‘चरखा चला चला के, लेंगे स्वराज्य लेंगे..’ या स्वातंत्र्य आंदोलनातील गीताची टवाळी करत ‘चरखा चालवून का कधी स्वातंत्र्य मिळते?’, असा सवाल विचारणाऱ्या संघटनेचा वारसा सांगणाऱ्या मोदींनाही अखेर छायाचित्रासाठी का होईना, तीच ‘पोज’ घ्यायला लागणे हा खरे तर मोदी तसेच त्यांचे भक्‍त यांचा पराभवच आहे आणि अशा क्‍लृप्त्यांनी महात्माजींची ‘ब्रॅण्ड व्हॅल्यू’ तसूभरही कमी होऊ शकत नाही, हे ना मोदीभक्‍तांच्या ध्यानात आले; ना मोदी विरोधकांच्याही! त्यामुळेच महात्माजींनी आखून दिलेली मूल्ये त्यांच्या हयातीनंतर लगेचच विसरून जाणारे समस्त काँग्रेसजन आज त्याच महात्म्याच्या पाठराखणीसाठी कंबर कसून उभे ठाकले आहेत. महात्माजींना अशा खुशमस्कऱ्यांची आणि त्यांच्या नावाचा बाजार उभारणाऱ्या अशा तथाकथित पाठीराख्यांची काहीच गरज नाही; पण काँग्रेसलाही दुर्दैवाने ते केवळ जपजाप्यासाठीच हवे आहेत. त्यामुळेच ‘काँग्रेसला महात्माजींच्या केवळ छायाचित्रात रस आहे, अशी टीका होते आणि त्यात तथ्यही आहे. मात्र, भाजपला तरी खरोखरच गांधीविचारांत रस आहे काय? सत्ता येताच मोदी यांनी प्रथम स्वच्छता अभियानासाठी गांधीजींचा ‘चष्मा’ वापरला आणि आता ते चरख्याच्या मोहात पडले आहेत. स्वच्छता अभियानासाठी महात्माजींना ‘ब्रॅण्ड ॲम्बॅसेडर’ नेमणे, ही मोठीच चाल होती. गांधीजींचे विचार आणि विशेषत: त्यांचे सर्वसमभावाचे तसेच अहिंसेचे तत्त्वज्ञान बासनात बांधून ठेवून त्यांची प्रतिमा फक्‍त ‘स्वच्छतेचे पुजारी’, एवढ्यापुरती मर्यादित करण्याची ही मुत्सद्दी खेळी होती. अर्थात, मोदी यांनाही रस आहे तो प्रतिमांच्या खेळातच! त्यामुळेच कधी सुटाबूटातल्या, तर कधी चरखा चालवणाऱ्या अशा आपल्या प्रतिमाच ते प्रस्थापित करू पाहत आहेत. महात्मा गांधींचे विचार तसेच त्यांची शिकवण ही अशा कोणत्याही प्रतिमेच्या पलीकडली आहे, हे ना मोदी वा त्यांच्या भक्‍तांच्या लक्षात आले आहे, ना त्यांच्या पाठीराख्यांच्या. हत्येनंतर सात दशकांनीही गांधीविचार आज जिवंत राहिला आहे, तो त्यातील वैश्‍विक मूल्यांमुळेच. त्यामुळे आता यापुढे चलनी नोटांवरची महात्माजींची प्रतिमा हटवून, तेथेही मोदी यांची प्रतिष्ठापना करण्याचे पाऊल उचलले गेलेच, तरीही त्यांनी दिलेला विचार हा नष्ट होऊ शकणार नाही; कारण, जगभरात कोणत्याही प्रतिमेविना गांधीविचार आचरणात आणणाऱ्या लोकांमध्ये रोज नव्याने भर पडत आहे, हे लक्षात घ्यायला हवे. मोदी तसेच भाजप यांनी ही बाब लक्षात घेतली, तर पुन्हा ही अशी ‘गांधीगिरी’ करण्याची हिंमतही त्यांना होणार नाही.

Web Title: on khadi gramodyog calendar modi