अयोध्येचा राजा! (ढिंग टांग!)

King of Ayodhya Editorial Article in Dhing Tang
King of Ayodhya Editorial Article in Dhing Tang

विक्रमादित्य : (बंद दार ठोठावत) बॅब्स...दार उघडा ना! 
उधोजीसाहेब : (बंद दाराआडून) नहीं!! 
विक्रमादित्य : (कळकळीनं) उघडा ना! मी आहे!! 
उधोजीसाहेब : (आतून दबक्‍या आवाजात) कौन हय? 
विक्रमादित्य : (उतावीळपणाने) सांगितलं ना...मी आहे! 
उधोजीसाहेब : (संशयानं) नाम बोलो नाम!! जबतक नाम नही बतावोगे, दरवाजा नही उघडेंगे!! 

विक्रमादित्य : (कंटाळून) बॅब्स...गेले किती दिवस दार बंद करून बसला आहात? काय करताय येवढं आत? 
उधोजीसाहेब : (दबक्‍या आवाजात दर्डावून) हम अयोध्या दौरे की तयारी कर रहे है! तुम नाम बतावो!! 
विक्रमादित्य : (घाईघाईनं) माझ्याशिवाय कुठलीही तयारी करू नका! मी अत्यंत खळबळजनक खबर आणली आहे! दार उघडा आधी!! 

उधोजीसाहेब : (दार उघडत) कौनसी खबर? 
विक्रमादित्य : (खोलीत शिरत वैतागून) तुम्ही हिंदीत बोलणं बंद करा पाहू? सकाळी उठून जिलेबी खाल्ल्यासारखं वाटतंय!! 
उधोजीसाहेब : (किंचित ओशाळून) अरे, अयोध्येत जाहीर भाषण करायचं म्हटलं तर प्रॅक्‍टिस करायला नको का? इथे बटाटावडा मागताना भय्याला "भय्या बटाटावडा गरम मंगताय हं!' असं सांगणारी आपण माणसं!! जरा नीट बोलायला शिकलं पाहिजे ना!! बाय द वे, बटाट्याला उत्तरेत आलू म्हणतात, हे तुला माहीत होतं का? 

विक्रमादित्य : (हातातली कागदाची भेंडोळी नाचवत) ते जाऊ दे हो!! हे बघा, मी काय आणलंय!! 
उधोजीसाहेब : (हातातले कागद बघून) रद्दीवाल्याच्या दुकानात जाऊन आलास? 
विक्रमादित्य : (सपशेल दुर्लक्ष करत)...हे वाचलंत तर तुम्हाला काहीच काळजी करण्याचं कारण नाही, हे लक्षात येईल!! तुमचे विरोधक च्याटंच्याट पडतील! अयोध्येचं आणि आपलं नातं किती जुनं आहे, हे सिद्ध होईल!! 
उधोजीसाहेब : (कुतुहलानं) काय आहे हे? 
विक्रमादित्य : (विजयी मुद्रेनं) अयोध्येच्या तुमच्या भेटीचं वर्णन...साक्षात संत तुलसीदासाच्या शब्दांत...इस कागज में इतिहास लिखा हय, बॅऽऽब्स!! 
उधोजीसाहेब : (अविश्‍वासानं) काहीत्तरीच काय? 
विक्रमादित्य : (ंभक्‍तिभावाने गुणगुणत) संग सचिव सुचि भूरि भट भूसुर गुर ग्याति। चले मिलन मुनिनायकहि मुदित राऊ एहि भॉंति।... 
उधोजीसाहेब : (बुचकळ्यात पडत) काहीही टोटल लागली नाही रे!! 

विक्रमादित्य : (पांडित्यपूर्ण स्टायलीत) अर्थात...तुलसीदासजी कह रहे हैं की...तब उन्होने पवित्र हृदय के स्वामिभक्‍त मंत्री, सचिव एवं बहुतसे योध्दा, श्रेष्ठ द्विजों के अत: गुरुजनों को साथ लिया और बडी प्रसन्न मुद्रा को लेकर मुनियों के स्वामीजीसे मिलने चले... 

उधोजीसाहेब : (तलवार उपसत) ओ की ठो कळत नाहीए! खबरदार अशा न कळणाऱ्या भाषेत बोललास तर..! 
विक्रमादित्य : (महद आश्‍चर्यानं) चिडता काय असे? तुमच्या अयोध्या ट्रिपचं थेट वर्णन आहे हे! आता हे पहा...स्याम गौर मृदु बयस किसोरा। लोचन सुखद बिस्व चित्त चोरा...हे वर्णन तर थेट माझं आहे! किशोर अवस्थावाले श्‍याम-गौर वर्णवाले मृदुभाषी, ज्याने विश्‍वाचे चित्त चोरले आहे असा नेत्रसुखद युवक...अयोध्येशी आपलं नातं हे इतकं जुनं आहे बॅऽऽब्स!! 

उधोजीसाहेब : (हुरळून) केवढा चमत्कार आहे हा!! पहा, मी म्हटलं नव्हतं, श्रीरामांनीच बोलावणं पाठवलं म्हणून आपली ही ट्रिप होतेय! आता ती कमळी गेली उडत!! (भक्‍तिभावाने) आता फक्‍त जय श्रीराम! जय श्रीराम!! 

-ब्रिटिश नंदी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com