खराखुरा 'सिंघम' श्रद्धांजली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

धिप्पाड शरीरयष्टी. समोरच्याला क्षणात जायबंदी करणारी भेदक नजर. पांढऱ्या शुभ्र दाढीवर तलवारीप्रमाणे लकाकणाऱ्या टोकदार मिशा.

आणीबाणीच्या क्षणीही संयम ढळू न देता शांतपणे परिस्थितीला सामोरे जाणारे, प्रश्‍नावर विचार करण्यात वेळ न घालवता थेट उत्तर शोधणारे कॅंवरपालसिंग अर्थात 'केपीएस गिल' हे पोलिस दलातील खरेखुरे सिंघम होते.

'मेरी जरूरते है कम, इसिलिए मेरे जमीर में दम' हा डायलॉग बॉलिवूडमधील बाजीराव सिंघमच्या तोंडी यायला 2011 साल यावं लागलं; पण हेच तत्त्व ऐंशीच्या दशकामध्ये गिल यांनी प्रत्यक्षात अनुसरले होते. देशाची अखंडता, सार्वभौमत्वासमोर आव्हान निर्माण झाले तेव्हा राजकीय व्यवस्थेला गिल यांची मदत घ्यावी लागली. ते सारे आयुष्य एखाद्या वादळाप्रमाणे जगले. प्रारंभी त्यांनी आसाम, मेघालयमधील संघर्ष हाताळला. ते 1988 ते 90 आणि 1991 ते 95 या काळात ते पंजाबात पोलिस महासंचालक होते. खलिस्तानी दहशतवाद्यांचा समर्थपणे मुकाबला केल्यानेच त्यांना 'सुपरकॉप' ही उपाधी मिळाली होती. गिल यांच्या नेतृत्वाखाली 1988 मध्ये राबविण्यात आलेले ऑपरेशन 'ब्लॅक थंडर' यशस्वी ठरले. त्या वेळी त्यांनी ऑपरेशन 'ब्लू स्टार'मधील चुका टाळत मोहिमेची नव्याने आखणी केली. संकटाच्या काळात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, प्रसंगी त्यांना आर्थिक, कायदेशीर रसद पुरविणारे गिल अनेकांच्या गळ्यातील ताईत बनले होते.

निवृत्तीनंतरही त्यांच्यातील कडवा पोलिस अधिकारी शांत बसला नाही, त्यांनी भारतीय हॉकी महासंघाची सूत्रे हाती घेत क्रीडा क्षेत्रातही ठसा उमटविला. 'इन्स्टिट्यूट ऑफ कॉन्फ्लिक्‍ट मॅनेजमेंट'सारख्या संस्थांची स्थापना करून त्यांनी दहशतवादाच्या मुद्यावर सरकारला सल्ला देण्याचे काम केले. आजमितीस देशाचे नंदनवन दंगलीच्या वणव्यामध्ये होरपळत असून नक्षलवादाची समस्याही डोके वर काढत आहे. या पार्श्‍वभूमीवर गिल यांनी मांडलेले काही विचार सुरक्षा दलांना विचार करायला लावणारे आहेत. देशांतर्गत नागरी सुरक्षेच्या मुद्यावर गिल यांची निश्‍चित अशी मते होती.

प्रत्येक संघर्षाचे उत्तर बंदुकीतून मिळू शकत नाही, कधी कधी पुढे जाण्यासाठी दोन पावले मागेही यावे लागते, असे ते म्हणत असत. आतील शत्रूचा मुकाबला लष्कर अथवा निमलष्करी दले करू शकत नाही. त्यासाठी पोलिस खाते सक्षम हवे, हा वीस वर्षांपूर्वी त्यांनी केलेला दावा आज तंतोतंत खरा ठरताना दिसतो. भविष्यकाळाच्या उदरामध्ये दडलेले संकट वर्तमानात ओळखण्याची अचाट क्षमता असणारे गिल म्हणूनच 'सुपरकॉप' या उपाधीस पात्र होते.
गोपाळ कुलकर्णी

Web Title: kps gill real singham tribute