चंद्र आहे साक्षीला... (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

सुमारे पावणेदोनशे वर्षांपूर्वी, १८६५ मध्ये द्रष्टा फ्रेंच लेखक ज्यूल व्हर्न ह्यांनी ‘फ्रॉम दि अर्थ टू द मून’ या शीर्षकाची एक कादंबरिका लिहिली होती. बाल्टिमोर गन क्‍लबच्या सदस्यांनी डोके चालवून एक महाकाय तोफ तयार केली, आणि त्यातून तीन ‘अंतराळवीर’ चंद्रावर डागले, असे कथासूत्र होते. कथा गंमतीदार होती, परंतु त्यातील काही वैज्ञानिक तपशील आश्‍चर्यकारकरीत्या अचूक ठरल्याचे नंतर ध्यानात आले. या कादंबरीनंतर शंभर वर्षांनी मानवाने खरेखुरे चांद्रयान रॉकेटद्वारे सोडले. २० जुलै १९६९ रोजी अमेरिकेचा अंतराळवीर नील आर्मस्ट्राँगने आपले पाऊल चांद्रभूमीवर उमटवले, तो हा दिवस.

सुमारे पावणेदोनशे वर्षांपूर्वी, १८६५ मध्ये द्रष्टा फ्रेंच लेखक ज्यूल व्हर्न ह्यांनी ‘फ्रॉम दि अर्थ टू द मून’ या शीर्षकाची एक कादंबरिका लिहिली होती. बाल्टिमोर गन क्‍लबच्या सदस्यांनी डोके चालवून एक महाकाय तोफ तयार केली, आणि त्यातून तीन ‘अंतराळवीर’ चंद्रावर डागले, असे कथासूत्र होते. कथा गंमतीदार होती, परंतु त्यातील काही वैज्ञानिक तपशील आश्‍चर्यकारकरीत्या अचूक ठरल्याचे नंतर ध्यानात आले. या कादंबरीनंतर शंभर वर्षांनी मानवाने खरेखुरे चांद्रयान रॉकेटद्वारे सोडले. २० जुलै १९६९ रोजी अमेरिकेचा अंतराळवीर नील आर्मस्ट्राँगने आपले पाऊल चांद्रभूमीवर उमटवले, तो हा दिवस. ‘मानवाचं हे चिमुकलं पाऊल, मानवतेसाठी एक गरुडझेप ठरेल’ असे उद्‌गार तेव्हा आर्मस्ट्राँगने काढले होते. विख्यात चांद्रमोहिमेला अर्धशतक झाले. तसे पाहू गेल्यास, अफाट ब्रह्मांडातल्या कुठल्यातरी मध्यम स्वरूपाच्या सूर्यमालिकेतील, मध्यम आकाराच्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या काही नगण्य ग्रहांपैकी एक असलेल्या पृथ्वी नामक ग्रहावर फळलेली, फुललेली प्रजात म्हणजे माणसाची जात. या माणसाने प्रगतिशील मेंदूच्या जोरावर ब्रह्मांडाची लांबीरुंदी मोजण्याचा व्यापार सुरू केला. त्याचा प्रारंभबिंदू होता, नील आर्मस्ट्राँगचे ते पाऊल. मानवी उत्क्रांतीच्या टप्प्याचा तो एक स्पष्ट पाऊलठसा होता. मानवाने निर्माण केलेली अंतराळयाने त्यानंतर डझनभर वेळा चंद्रावर जाऊन आली. ‘नासा’ने आता २०२० मध्ये पुन्हा अंतराळवीरांना चंद्रावर धाडण्याची तयारी चालविली आहे. चंद्रावर पुन्हा जाण्यासाठी इतकी वर्षे का लागावीत, असा प्रश्‍न कोणालाही पडेल. पण भविष्यातला मानवाचा चंद्रावरचा वावर हा केवळ काही मिनिटांचा किंवा तासांचा नसेल, हे लक्षात घ्यायला हवे. एक झेंडा रोवून, पाऊलठसा उमटवून परत येण्यात आता काहीच हशील नाही. आता तिथे जायचे ते मुक्‍कामासाठीच, ही माणसाची महत्त्वाकांक्षा आहे...वेळ लागणारच ! मधल्या काळात माणसाचे यान चंद्राकडे काणाडोळा करून मंगळावर जाऊन पोचले. इतकेच नव्हे, तर तब्बल ७९ चंद्रांचे लटांबर घेऊन फिरणाऱ्या महाकाय गुरूला वळसा घालून त्याचा उडनखटोला सूर्यमालिकेच्या अंताकडे निघालासुद्धा. दिगंताचा ठाव घेणाऱ्या महाकाय दुर्बिणी माणसाने अंतराळात तरंगत्या ठेवल्या आहेत. पृथ्वीभोवती हजारो यांत्रिक उपग्रह अहर्निश काम करताहेत... हे सारे काही तो चंद्रमा पाहतो आहे.

एकेकाळी कथाकाव्यांमध्ये रमलेला, कविकुलाचा हा लाडका, प्रेमीयुगुलांच्या भावबंधांचा साक्षीदार होता. मूषकाधिष्ठित लंबोदराला हसल्याबद्दल शापित झालेला हा चंद्रदेव देशोदेशीच्या लोककथा आणि गीतांमध्ये रमला होता. मराठी भावगीतांचे दालन या चंद्राने तर अक्षरश: उजळून टाकले. ‘तोच चंद्रमा नभात...’, ‘चंद्र होता साक्षीला...’, ‘ चांद मातला, मातला...,’ पुनवेचा चंद्रम आला घरी...’ किती नावे घ्यायची? कुसुमाग्रजांच्या ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ या अजरामर कवितेतली वसुंधरा ‘मला मोहवाया बघे हा सुधांशु तपाचार स्वीकारुनि दारुण’ असे म्हणते. उर्दू शायरीनेही शब-ए-माहताबची महती वेळोवेळी वर्णिलीच आहे. तिकडे सातासमुद्रापारच्या शेक्‍सपीरिअन साहित्यातही चंद्र हटकून डोकावतोच. अर्थात, त्याच्या साहित्यात येते ती वेड लावणारी चंद्रिका ! पाश्‍चात्त्य जगात क्‍वचित काही विज्ञान काल्पनिकांमध्ये चंद्राचा उल्लेख झाला. पण तो तेवढाच. एकंदरित चंद्र ही मिरास कविमनाच्या लोकांचीच. तोच चंद्र आज मानवाचे पहिले पाऊल आपल्या पृष्ठभूमीवर अभिमानाने मिरवतो आहे. यालाही काव्यगत न्याय म्हणायचे का?

आजकाल माणसाला चांद्रभूमीवरचे भूखंड आणि त्या भूखंडाच्या खाली दडलेला खनिजांचा अफाट खजिना खुणावू लागला आहे. भविष्यात चंद्रावर मानवी वस्ती होऊ शकेल का, याची चाचपणी कधीच सुरू झाली आहे. चंद्र पृथ्वीपासून फक्‍त तीन लाख ८४ हजार ४०० किलोमीटर इतकाच दूर आहे. चंद्रपृष्ठावर गुरुत्वाकर्षण कमी आहे, तिथं प्राणवायू किंवा पाणी नाही, या तुलनेने किरकोळ अडचणी मानाव्या लागतील. न जाणो, आणखी पन्नास वर्षांनंतर त्याच चंद्रावरल्या एखाद्या भूखंडाच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या ऐकू येतील. प्रेम व विज्ञानाचा साक्षीदार ठरलेल्या चंद्राला तेव्हाही साक्षीदारासारखे पिंजऱ्यात उभे राहावे लागेल. आजवर प्रेम आणि विज्ञानाची पालखी वाहणारा चंद्रमा अलांछन राहावा, हीच अपेक्षा.

Web Title: landing on the moon editorial