बोकड जातो जिवानिशी...

ना घोड्याला, ना हत्तीला, ना वाघाला, ना इतर कुठल्या प्राण्याला; बळी दिले जाते ते दुर्बल असलेल्या बोकडाला. दुर्बलासाठी देवसुद्धा घातक ठरतो, असा या सुभाषिताचा अर्थ. या सुभाषिताची उजळणी करण्याचे कारण म्हणजे लातूर जिल्ह्यातील उदगीर पोलिस ठाण्यात बोकडाचा बळी दिल्याची चर्चा.
latur animal sacrifice row psi suspended 8 constables transferred for bringing goat to police station
latur animal sacrifice row psi suspended 8 constables transferred for bringing goat to police stationSakal

अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च।

अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्बल घातकः॥

ना घोड्याला, ना हत्तीला, ना वाघाला, ना इतर कुठल्या प्राण्याला; बळी दिले जाते ते दुर्बल असलेल्या बोकडाला. दुर्बलासाठी देवसुद्धा घातक ठरतो, असा या सुभाषिताचा अर्थ. या सुभाषिताची उजळणी करण्याचे कारण म्हणजे लातूर जिल्ह्यातील उदगीर पोलिस ठाण्यात बोकडाचा बळी दिल्याची चर्चा.

पोलिस ठाण्यात मांसाहार करण्यास बंदी नाही, किंबहुना शाकाहाराला बंदी असावी, इतक्या प्रमाणात तिथे मांसाहार होत असावा, अशी स्थिती आहे. ‘पांडू हवालदार’ चित्रपटात पांडू हवालदार (दादा कोंडके) आणि सखाराम हवालदार (अशोक सराफ) यांनी ठाण्यातच मांसाहारावर ताव मारल्यानंतर ताटातल्या रिकाम्या झालेल्या नळीतून सखाराम आरपार पाहतो तेव्हा साहेब येत असल्याचे त्याला त्यातून दिसते, असा प्रसंग आहे.

फुकटात बिर्याणीची सोय करायला सांगणाऱ्या पुण्यातील महिला पोलिस अधिकाऱ्याची ऑडिओक्लिप व्हायरल झाली, त्याला फार काळ लोटलेला नाही. इथे मुद्दा मांसाहाराचा किंवा पोलिसांच्या मांसाहारप्रेमाचा अजिबात नाही.

पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गुन्ह्यांचे प्रमाण‎ घटावे, यासाठी पोलिस ठाण्याच्या ‎प्रवेशद्वारावर बोकडाचा बळी दिल्यामुळे घटनेचे गांभीर्य वाढले आहे. कारण महाराष्ट्राच्या ‘जादूटोणा प्रतिबंधक कायद्या’च्या धोरणालाच ते छेद देणारे कृत्य आहे.

सुरुवातीला घटनेचा इन्कार करण्यात आला. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पोलिसांनी पार्टी केल्याचे सांगितले. पण हे सगळे घटनेचे गांभीर्य कमी करण्याचे प्रयत्न म्हणावे लागतील. बोकड बिचारा जायचा तसा गेलाच; परंतु त्याच्या जाण्यानंतर बरेच राजकारण रंगले. ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने आक्षेपदेखील घेतला.

त्यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी तक्रारी देऊन संबंधितांवर कारवाईची मागणी केली. चहुबाजूंनी गदारोळ सुरू झाल्यामुळे वरवर खुलासे करून वेळ निभावून नेणे अवघड बनले. मग वरिष्ठ पातळीवरून चौकशी आणि चौकशीअंती पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर बोकडबळी दिल्याची बातमी खरी असल्याचे स्पष्ट झाले. ठाण्याच्या पोलिसप्रमुखांपासून त्या कृत्यात सहभागी सर्वांवर निलंबनापासून बदलीपर्यंतची कारवाई करण्यात आली. गुन्हे कमी व्हावेत म्हणून दिलेला बळी अंगाशी आला.

बळी देण्याची प्रथा आपल्याकडे तशी नवी नाही आणि दुर्मीळ तर नाहीच नाही. आक्षेप पोलिसांनी पार्टी करण्याला नाही, तर पोलिस ठाण्यात बळी देण्याला आहे. बळी देण्याची प्रथा कशी उत्पन्न झाली आणि तिचे प्रारंभीचे स्वरूप काय होते, याविषयी अभ्यासकांनी अनेक उपपत्ती मांडल्या आहेत.

देवतांची कृपा प्राप्त करणे किंवा त्यांचे शत्रुत्व कमी करण्यासाठी त्यांना दिलेली देणगी, हे बळीचे आद्य स्वरूप असल्याचे ख्यातनाम मानववंशशास्त्रज्ञ ई.बी. टायलर यांनी मांडले आहे. माणसाच्या आयुष्यात विज्ञानाचा प्रकाश येण्यापूर्वीच्या समाजजीवनात असे काही घडत असेल तर ते समजू शकते.

पण एकविसाव्या शतकातही अद्याप ते घडत असेल तर काळजीची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर उदगीरच्या घटनेचा विचार करावा लागतो. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी हयात घालवलेल्या आणि मारेकऱ्यांच्या गोळीचे शिकार झालेले डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा शोध जेव्हा लागत नव्हता, तेव्हा अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्लॅंचेटसारखा प्रकार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केला होता, ही चर्चा सुज्ञ नागरिक अद्याप विसरलेले नाहीत. मांसाहाराबाबत कोणताही आक्षेप असायचे कारण नाही.

तथापि, अंधश्रद्धेला मूठमाती देण्यासाठी कायदा करणाऱ्या राज्यात तो कायदा ज्यांनी राबवायचा तेच त्याची शिकार होत असतील तर स्थिती चिंताजनकच म्हणावी लागेल. चौकशीत पोलिस ‎ठाण्यात बोकड कापल्याचे ‎स्पष्ट झाले. परंतु, ‘‘हा बोकड‎ अंधश्रद्धेतून नव्हे, तर एका पोलिस‎ कर्मचाऱ्याने नवी चारचाकी गाडी ‎खरेदी केल्यामुळे कापण्यात आला,’’ असा ‎दावा करण्यात आला.

या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या (कोणत्या गटाचा ठाऊक नाही) पदाधिकाऱ्याने अहिंसेचे महत्त्व सांगणाऱ्या महात्मा गांधीजींच्या पुस्तकाची प्रत पोलिस अधिकाऱ्यांना भेट दिली. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या या पदाधिकाऱ्याने यापुढे जाऊन महाराष्ट्रातील सरकारी विश्रामगृहांवरील आपल्या पक्षाच्या पदाधिकारी आणि नेत्यांना या पुस्तकाच्या प्रती भेट द्यायचे ठरवले तर पक्षाची मोठीच अडचण होईल!

पण या एकूण प्रकाराचा विचार करता समाजातील अंधश्रद्धांची जळमटे अद्यापही कशी कायम आहेत, याची प्रचीती आली. ती आपण कशी नष्ट करणार, याचा विचार केवळ राजकीय नेतेच नव्हे तर समाजधुरिणांनीही करायला हवा.

पोलिस ठाण्यातील ‘बोकडबळी’च्या प्रकरणाने समाजातील अंधश्रद्धांची जळमटे अद्यापही कशी कायम आहेत, याची पुन्हा एकदा जाणीव करून दिली.

‘कर्मयोग’ आणि ‘संन्यास’ ही नावे वेगळी असली तरी दोन्हींच्या गाभ्याचा अर्थ एकच आहे.

— विनोबा भावे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com