बदलत्या आयर्लंडचा तरुण चेहरा

संजय जाधव
सोमवार, 5 जून 2017

आयर्लंडच्या पंतप्रधानपदी मूळचे मालवणचे असलेले लिओ वराडकर विराजनमान होत असून, त्यांची निवड होण्याच्या वृत्ताची जगभरातील माध्यमांनी दखल घेतली. यामागे प्रमुख कारण होते, की आयर्लंडच्या पंतप्रधानपदी लिओ यांच्या रूपाने प्रथमच समलैंगिक व्यक्तीची निवड झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तीला खासगी आयुष्यच नसते, असे म्हणतात. लिओ हेही याला अपवाद नाहीत. मात्र, या सर्व गदारोळात त्यांचे आतापर्यंतचे परिश्रम, त्यांनी अतिशय कमी काळात इथपर्यंत घेतलेली झेप झाकोळली; पण विशेष करून उल्लेख करावा लागेल तो आयर्लंडमधील माध्यमांचा. त्यांनी लिओ यांची कार्यक्षमता आणि कर्तृत्वावरच लक्ष केंद्रित केल्याचे दिसले.

लिओ यांचे वडील मूळचे मालवणमधील वराडचे. ते आयर्लंडमध्ये स्थलांतरित झाले आणि तेथे मरियम या आयरिश महिलेशी त्यांनी विवाह केला. एखाद्या देशात स्थलांतरित झालेल्या भारतीयाचा मुलगा पुढे त्या देशाचा पंतप्रधान व्हावा, असे बहुदा प्रथमच घडले. लिओ हे आयर्लंडचे सर्वांत तरुण पंतप्रधान आहेत. केवळ 38व्या वर्षी ते देशाची धुरा सांभाळतील. त्यांनी डब्लिनमधील ट्रिनिटी कॉलेजमधून वैद्यकीय शाखेची पदवी घेतली. त्यांचा राजकीय प्रवास सुमारे एक तपापूर्वी सुरू झाला. स्थानिक निवडणुकीत प्रथम 2004 मध्ये ते निवडून आले. त्यानंतर केवळ तीन वर्षांतच संसदेत पश्‍चिम डब्लिनचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यापुढे त्यांचा राजकीय कारकिर्दीचा आलेख चढताच राहिला. केंद्रीय मंत्रिमंडळात 2014 मध्ये त्यांना आरोग्यमंत्रिपद देण्यात आले. तसेच, गेल्या वर्षी सामाजिक सुरक्षामंत्री म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. लिओ यांच्या जन्मावेळचा आणि आताचा आयर्लंड यात जमीन-अस्मानचा फरक आहे. नव्वदीच्या दशकात घटस्फोट आणि समलिंगी संबंध दोन्ही तेथे बेकायदा होते. लिओ हे बदलत्या, सुधारणावादी देशाचे प्रतीक आहेत. एकेकाळी युरोपमधील सर्वाधिक परंपरावादी देश असलेला आयर्लंड आता बदलत असल्याचे चित्र लिओ यांच्यामुळे निर्माण झाले आहे. देशातील नागरिकांनी त्यांची वांशिक पार्श्‍वभूमी आणि समलिंगी असणे याला महत्त्व देणे नाकारले. आयर्लंडला सामाजिक-आर्थिकदृष्ट्या भक्कम करण्यासाठी लिओ यांच्या रूपाने तरुण आणि खंबीर नेतृत्व मिळाले आहे. फ्रान्समध्ये इमॅन्यूएल मॅक्रॉन आणि कॅनडामध्ये जस्टिन ट्रुडू हे तरुण कर्तबगार नेते देशाची धुरा सांभाळत असताना आता लिओही त्याच पंक्तीत जाऊन बसले आहेत.

Web Title: leo varadkar ireland's new face