ढिंग टांग : ‘हे’ अठ्ठेचाळीस तास..!

माननीय दादासाहेब, लाख लाख दंडवत. काहीही काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही उगीच चिंता करता. महाशक्ती ज्याच्या पाठीमागे उभी आहे, त्याला कसले भय?
lok sabha election exit poll 2024 result on 4th june politics
lok sabha election exit poll 2024 result on 4th june politicsSakal

मा ननीय कर्मवीर भाईसाहेब आणि वंदनीय नानासाहेब फडणवीस यांसी, गेले काही दिवस मी घरीच (बसून) आहे. परदेशात काय, बाहेरच्या दिवाणखान्यातही गेलेलो नाही. त्यात काल एग्झिट पोल जाहीर झाले.

रात्री डाळखिचडी खाऊन निमूटपणे झोपलो. झोपलो कसला, उगाच पडून राहिलो. झोप उडाली आहे. ही एग्झिट पोलची भानगड कायमची बंद केली पाहिजे. जे काही निकाल लागणार आहेत, ते लागतील, पण अठ्ठेचाळीस तास आधीच ते अंदाजपंचे लावण्यात काय अर्थ आहे? महाराष्ट्रात आपल्या महायुतीचा चेंदामेंदा होणार असे अंदाज आहेत.

एका पाहणीत तर माझ्या पक्षाला अवघी एक जागा दाखवण्यात आली. हे गैर नाही का? कमळ पक्षाला मात्र साडेतीनशेच्या वर जागा, आणि आम्हाला अवघी एक? असे खरोखर झाले तर पुढे काय करायचे याचा विचार करतो आहे. पुढले अठ्ठेचाळीस तास घराच्या बाहेर पडू नये, असे मी कार्यकर्त्यांना कळवले आहे. तुम्हीही तसेच करावे, असे मला वाटते. कळावे.

आपला नवा रिक्रूट. दादासाहेब (मु. पो. बारामती)

ता. क. : अठ्ठेचाळीस तासांनंतर महायुतीची बैठक तातडीने बोलावून पुढे काय करायचे, ते ठरवावे ही विनंती.

माननीय दादासाहेब, लाख लाख दंडवत. काहीही काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही उगीच चिंता करता. महाशक्ती ज्याच्या पाठीमागे उभी आहे, त्याला कसले भय? एग्झिट पोलचा विचारही करु नका. विशेषत: प्रतिकूल एग्झिट पोलकडे तर सपशेल दुर्लक्ष करावे, या मताचा मी आहे. पुढले अठ्ठेचाळीस तास मी शेतीच करणार आहे.

अठ्ठेचाळीस तासांनंतर शेती करायची की आणखी काय करायचे, याचा विचार करीन. गेल्या दोन दिवसात मी आमच्या शिवारात शंभरेक नारळाची झाडे लावली. त्यासाठी आधी खड्डे खणून रेडी ठेवले होते. एग्झिट पोलचे निकाल आले, तेव्हा मी खड्डाच खणत होतो.

गेल्या वर्षी मी शिवाराच्या हद्दीवर चिक्कार बांबू लावले. बांबूलागवड अतिशय फायद्याची आहे, हे मी अनुभवाने सांगतो. पुढले अठ्ठेचाळीस तास गेल्या अठ्ठेचाळीस तासांसारखेच जाणार आहेत, असा विचार आणखी अठ्ठेचाळीस तास करा! यात खरे महायुतीचे हित आहे. कळावे.

आपला. कर्मवीर भाईसाहेब (मु. पो. ठाणे., पण सध्या दरेगाव.)

प्रिय दादासाहेब, शतप्रतिशत प्रणाम. अठ्ठेचाळीस तासांची तुम्हाला चिंता लागली आहे, हे वाचून आश्चर्याचा धक्का मुळीच बसला नाही. पहाटेच्या शपथविधीनंतरही अठ्ठेचाळीस तासात तुम्ही ‘मी परत जातो’ असे सांगून खुर्चीतून उठला होता!!

राजकारणात पेशन्सला फार्फार महत्त्व आहे. पुढले अठ्ठेचाळीस तास क्रिटिकल आहेत, पेशंट एकतर स्वत:च्या पायावर उभा राहून नाचायला लागेल, किंवा मग काही खरे नाही, असाच एग्झिट पोलचा सांगावा आहे. तो ध्यानी घ्यावा!!

आम्ही सगळे सध्या मुंबईत आहोत. शेतात जाऊन राबायला ना आमच्याकडे शेती, ना आम्ही परदेशात सुट्टी घालवायला गेलो. कारण ‘ताबडतोब दहा हजार लाडू वळायला घ्या’ असा नवा आदेश दिल्लीहून कालच (एग्झिट पोलनंतर) प्राप्त झाला.

सबब, आम्ही सगळे मुंबईत लाडू वळण्यासाठी बसलो आहो. अठ्ठेचाळीस तासांनंतर तुम्हीही लाडू खायला नक्की या!! आपले तिसरे मित्र मा. भाईसाहेब सध्या त्यांच्या गावी बांबू आणि नारळ लावत आहेत, आम्ही लाडू वळत आहोत!! तुम्हीही असेच काहीतरी करावे, असे मला वाटते. जे होणार ते होईल! हमने क्या खोया, जो हम यहां लाये? हे गीतासार आठवा. बाकी अठ्ठेचाळीस तासांनंतर भेटूच.

आपला. नानासाहेब फ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com