अग्रलेख : करा संधीचे सोने

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मे 2019

सर्व समाजघटकांचा विश्‍वास संपादन करणे आणि सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाणे, हे उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन स्वागतार्ह आहे. आता पक्ष आणि सरकारची हीच दिशा कायम राहायला हवी.

सर्व समाजघटकांचा विश्‍वास संपादन करणे आणि सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाणे, हे उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन स्वागतार्ह आहे. आता पक्ष आणि सरकारची हीच दिशा कायम राहायला हवी.

‘स ब का साथ, सब का विकास!’ अशी घोषणा देत नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये इंद्रप्रस्थाचे राज्य काबीज केले होते. त्यानंतरच्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले; मात्र त्यानंतर ही सत्ता राखताना मिळवलेल्या विक्रमी यशानंतर मोदी यांनी या घोषणेला एक जोड दिली आहे आणि ती म्हणजे ‘सब का विश्‍वास’! त्यांच्या या नव्या घोषणेमधूनच त्यांना वाढत्या जबाबदारीची जाणीव असल्याचे स्पष्ट होते. भारतीय जनतेने त्यांच्यावर भरभरून विश्‍वास व्यक्‍त केला आहे. एवढ्या स्पष्ट, निर्विवाद अशा बहुमताने लोकांनी निवडून दिल्यानंतर या जनादेशाकडे स्वतः मोदी कसे पाहतात, हे सर्वांत महत्त्वाचे ठरते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नवनिर्वाचित खासदारांपुढे बोलताना मोदी यांनी जे निवेदन केले ते स्वागतार्ह आणि दिशादर्शक असून, त्या मार्गानेच सरकारने वाटचाल करायला हवी. विशेषतः अल्पसंख्याकांचा विश्‍वास संपादन करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षांत जे काही भले-बुरे घडले, ते विसरून ‘नव्या भारता’च्या निर्मितीसाठी सज्ज झालो आहोत, असे मोदी यांनी म्हटले आहे. हे काम वाटते तितके सोपे नसले तरी संसदेत आता त्यांना फार मोठा विरोध होण्याची शक्‍यता नाही, ही बाब त्यांना देशभरातून मिळालेल्या भरघोस कौलामुळे स्पष्ट झाली. त्यामुळेच आपल्या या भाषणात त्यांनी काढलेले ‘जे आपल्याबरोबर आहेत, ते तर आहेतच; शिवाय जे आपल्याबरोबर नाहीत, त्यांनाही आपल्यासोबत घेऊन जायचे आहे!’ हे उद्‌गार महत्त्वाचे आहेत. गेल्या पाच वर्षांत घडलेल्या अनेक घटनांमुळे देशातील काही समाजघटक हे व्यक्तिश: त्यांच्यापासून आणि भाजपपासूनही दुरावले होते. त्यांना सोबत घेत पुढे जाण्याचे काम करण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले आहे, हे त्यांच्या या उद्‌गारांवरून स्पष्ट होते.

 मोदी यांना मिळालेला कौल एवढा निर्विवाद आहे, की अनेक क्‍लिष्ट आणि जटिल समस्यांच्या सोडवणुकीसाठी ते आता ‘आउट ऑफ बॉक्‍स’ विचार करण्याच्या स्थितीत आहेत. अशाप्रकारे मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले पाहिजे. उदाहरणच द्यायचे तर भारत व पाकिस्तान यांच्यातील तणाव व बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी ते नव्या शक्‍यता आजमावून पाहू शकतात. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी फोन करून निवडणुकीतील यशाबद्दल मोदींचे अभिनंदन केले आहे. त्याचवेळी मोदी यांनी त्यांना दहशतवादी कारवाया थांबवण्याबाबत सूचक शब्दांत सुनावलेही. इम्रान खान यांची ही कृती म्हटले तर अगदी औपचारिक आहे आणि मोदींनी स्पष्ट केलेली भूमिकाही नवी नाही. मुरब्बी नेता प्राप्त परिस्थितीलाही आपल्याला हवे तसे वळण देऊ शकतो. त्यामुळे सध्याची कोंडी फोडण्यासाठी मोदी काही अनोखे पाऊल उचलू शकतील आणि देशांतर्गत पातळीवर सध्या त्यांना मिळालेल्या भक्कम पाठिंबा त्यासाठी पूरक ठरू शकतो. पाकिस्तानबरोबरचे प्रश्‍न वाटाघाटींनीच सुटू शकतात, हे अटलबिहारी वाजपेयी यांनीच दाखवून दिले होते. त्याबाबतीत मोदी कोणती पावले उचलतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मोदी यांच्यापुढील मुख्य आव्हान आर्थिक परिस्थितीचे आहे. जगातील सर्वांत गतिमान अर्थव्यवस्था अशी आपली कीर्ती असल्यामुळे मोदी यांना त्याबाबत काही ठोस पावले उचलावी लागतील. निवडणूक प्रचारात बेरोजगारीचा मुद्दा प्रकर्षाने उपस्थित झाला होता. बेरोजगारी आणि त्याचबरोबर शेती व्यवसायाला आलेली कमालीची हलाखी यातून मोदी देशाला कशा रीतीने बाहेर काढतात, याकडेही सगळ्यांचे लक्ष लागणे साहजिक म्हणावे लागेल.

निवडणूक प्रचार, तसेच देशाचे गेल्या पाच वर्षांतील समाजकारण यांच्या पार्श्‍वभूमीवर विचार करताना, विविध समाजगटात निर्माण झालेली दुही समोर आल्याशिवाय राहत नाही. आपल्या देशाचा मूळ गाभा हा बहुभाषिक-बहुधर्मीय, तसेच बहुजातीय आहे. देशाचे ऐक्‍य त्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे आता मोदी यांना त्यादृष्टीनेही ठोस पावले उचलावी लागतील. मोदी यांनी आता देशातील सर्वांनाच विश्‍वास देण्याचे ठरविले आहे. ‘आयडिया ऑफ इंडिया’ या संकल्पनेला साजेशीच ही भूमिका आहे आणि त्यात ते यशस्वी होतील, अशी मतदारांना खात्री असल्यामुळेच त्यांना मतदारांचे भरघोस पाठबळ मिळाले आहे. देशाच्या सर्व स्तरांतून असा पाठिंबा मिळणे, ही दुर्मीळ बाब आहे आणि त्यामुळेच मोदी यांना आता काही कठोर निर्णयही घेता येतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: loksabha 2019 pm narendra modi government and people trust