गणित विषय व्हावा आवडीचा...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

गणित आणि इंग्रजीसारखे विषय मुलांना खूप अवघड वाटत असतील, तर त्याची कारणे मुळापासून शोधून त्यांचे निराकरण करावे लागेल. गणितासारख्या आयुष्यात पदोपदी उपयोगाला येणाऱ्या विषयाकडेच पाठ फिरविणे हे कोणाच्याच हिताचे नाही.

एकीकडे शालान्त परीक्षांमधील गुणांच्या शतकी भराऱ्यांबद्दल भुवया उंचावल्या जात असतानाच या परीक्षेतून गणिताचा "अडथळा' दूर केला तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे आयुष्य सुसह्य होईल, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

गणित हा विषय शालान्त परीक्षेत ऐच्छिक करण्याच्या प्रस्तावावर खुद्द न्यायालयानेच अनुकूल अभिप्राय दिल्याने त्याची दखल घ्यायला हवी. खरे म्हणजे आपल्याकडच्या एकूण शैक्षणिक धोरणाची दोलायमानता हाच काळजीचा विषय आहे. बदलत्या जगातील नवी आव्हाने लक्षात आली म्हणून त्याला साजेसे बदल केले जाणे आणि विशिष्ट दिशाच सापडली नसल्याने कधी हे, तर कधी ते, असे प्रयोग करीत राहणे यात फरक आहे. लवचिकता वेगळी आणि संभ्रम वेगळा. मुळात याचीच जाणीव धोरणकर्त्यांना करून देण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यामुळेच गणित हा विषय ऐच्छिक करता येणार नाही का, या उच्च न्यायालयाच्या पीठाने उपस्थित केलेल्या प्रश्‍नाचा विचार भावनेच्या आहारी जाऊन केला जाता कामा नये. आठवीपासूनच हा विषय ऐच्छिक करावा, अशी मागणी अधूनमधून होत असते, त्यामुळे ती नवीन नाही. पण मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांच्या याचिकेच्या निमित्ताने ती पुन्हा ऐरणीवर आली आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एका जिव्हाळ्याच्या; किंबहुना जीवन-मरणाच्या विषयाला वाचा फोडण्याचा हा प्रयत्न नक्कीच म्हणता येईल. त्यासाठी याचिकाकर्त्यांना आणि न्यायालयाही धन्यवाद द्यायला हवेत; परंतु ज्या प्रकारचा तोडगा सुचविला जात आहे, त्यावर मात्र सर्व बाजूंनी आणि चिकित्सकपणे विचार व्हायला हवा. विषय ऐच्छिक करणे हे समस्येचे अतिसुलभ उत्तर झाले. त्यातून आपण ग्रस्त विद्यार्थ्यांची खरोखर सुटका करीत आहोत, की त्यांना केवळ एक शॉर्टकट उपलब्ध करून देणार आहोत? मुळात गणित या विषयाची घोर उपेक्षा ही एकूण समाजाचीच हानी असते, हे लक्षात घ्यायला हवे. माणसाचे जगणेच मुळापासून ज्यामुळे बदलले आणि तो आधुनिकतेच्या प्रवाहात आला तो सगळा ज्ञानविज्ञान व्यवहार हा गणिताच्या पायावर उभा आहे. तार्किक विचारांची क्षमता ही आजच्या जगण्याचीच एक गरज बनली आहे. असे असताना अवघड वाटतो म्हणून त्यालाच वळसा घालून पुढे जा, असे म्हणणे हे तात्पुरते समाधान ठरेल; पण त्यामुळे संधींचे अनेक दरवाजे बंद होतील. डिजिटल तंत्रज्ञान हे जगण्याचा अपरिहार्य भाग बनत चाललेले असताना तर हा मुद्दा आणखी प्रकर्षाने जाणवतो. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हा खरोखर गंभीर आणि चिंतेचा विषय आहे, यात शंका नाही; परंतु त्याचे उत्तर गणिताच्या अध्यापन पद्धतीत सुधारणा हेच आहे. अनेक शिक्षणतज्ज्ञांनीदेखील याची आवश्‍यकता वारंवार व्यक्त केली आहे.

गणित विषयाच्या भीतीमुळे त्याची नावड उत्पन्न होते. आपली बालगीतेदेखील "गणित विषय माझ्या नावडीचा..' असे म्हणून मुळातले अपसमज आणखी घट्ट करतात. अशा वातावरणात अवघडपणा आणखी बोचू लागतो. याउलट हा विषय रोजच्या जगण्याशी कसा संबंधित आहे, हे खुबीने मुलांच्या मनावर ठसवीत हा विषय शिकवला तर नक्कीच त्यांची भीती दूर होईल. एखाद्या विषयावर प्रभुत्व असणे आणि तो विषय सोप्या पद्धतीने शिकविण्याची कला अवगत असणे या दोन्ही गोष्टी शिक्षणात महत्त्वाच्या असतात. त्या दृष्टीने शिक्षकांचा व्यापक प्रशिक्षण कार्यक्रम आखावा लागेल. सरसकट "ऐच्छिक' या सदरात हा विषय ढकलण्यापेक्षा सामान्य गणित आणि उच्च गणित असे दोन पर्याय उपलब्ध करून देऊन मार्ग काढता येऊ शकेल. तसा विचार यापूर्वी झालाही होता; परंतु त्याला विरोध झाल्याने तो बासनात गुंडाळला गेला. आपल्या या क्षेत्रातील एकूण दोलायमान परंपरेला ते साजेसेच झाले. तो पर्याय पुन्हा उपलब्ध करून द्यावा, या मागणीत काही गैर नाही. नापासाचा मारला जाणारा शिक्का आणि त्यातून मुलांना कोवळ्या वयात सहन करावी लागणारी अवहेलना ही समस्या आहेच. पण त्याची उत्तरे एकूण सामाजिक स्तरावरच शोधावी लागतील. त्यांची सोपी उत्तरे काढण्याच्या नादात अनेक पिढ्यांचे नुकसान होऊ शकते. शिक्षण हा विषयच असा आहे, की त्याचे चांगले वा वाईट परिणाम हे दूरगामी असतात. शिक्षणरचना निश्‍चित करताना सर्व पैलूंचा साधकबाधक विचार करावा लागतो, तो त्यामुळेच. गणित आणि इंग्रजीसारखे विषय मुलांना खूप अवघड वाटत असतील तर त्याची कारणे मुळापासून शोधून त्यांचे निराकरण करावे लागेल. गणितासारख्या आयुष्यात पदोपदी उपयोगाला येणाऱ्या विषयाकडेच पाठ फिरविणे हे कोणाच्याच हिताचे नाही. प्रयत्न व्हायला हवेत ते मुलांना या विषयाची गोडी लावण्याचे. एखाद्या आव्हानात्मक समस्येला सामोरे जाताना त्याला भिडण्याऐवजी तो ऑप्शनला टाकण्याचा विचार करणे हे वैयक्तिक जीवनासाठी जसे घातक आहे, तसेच समाजजीवनासाठीही.

Web Title: loving mathematics