चला रे चक्रांनो फिरत गरारा!

चला रे चक्रांनो फिरत गरारा!

वसंत ऋतूची चाहूल लागते आहे. आंब्यांना मोहोर आला आहे, कोकीळ साद देऊ लागले आहेत. नुकताच ‘व्हॅलेंटाईन’चा सोहळा साजरा केला गेला, आता शिमगा, रंगपंचमी येऊ घातले आहेत. साहजिकच शृंगारगीते गुणगुणावीशी वाटताहेत. अशातलीच केवळ प्रल्हाद केशव अत्रेच लिहू शकतील अशी सायकलस्वारांची एक भन्नाट प्रेमकविता आहे: होतीस तू त्या दिनी बैसली, जनानी तुझ्या पायचाकीवरी; तुझे दंड कवटाळूनी मांव्सल, खडा मी तुझ्या मागुती पिन्वरी ! चतुर्शिन्गीच्या त्या उतारावरी, यदा पावले खूप त्वा मारिली, तदा नेत्र झाकून किंचाळलो, तुझ्या स्कंधि अन्‌ मान म्या टाकिली! न मज्नू न लैला अशी हिंडली! बटाऊ न वा मोहनेच्या सवे! मुशाफीर ईष्कामध्ये रंगले, असे केधवाही न मद्यासवे! मी कधी एखादीच्या असा डबलसीट फिरलो नाही; पण फर्ग्युसन कॉलेजात शिकत असताना चतुःशृंगीच्या त्या उतारावरी मित्र- मैत्रिणींबरोबर अशी सायकल भरपूर दामटली. त्या साठ वर्षांपूर्वीच्या काळी सायकलस्वारांची चलती होती. केव्हा कुठून मोटारसायकल किंवा ट्रक येऊन उडवून लावेल अशी काहीही धास्ती नव्हती. आजच्या पुण्यात सायकलस्वारीचे दिवस संपले आहेत; पण पुणे शहर असे प्रगतिपथावर सुसाट धावत असताना रोजचा प्रवास जास्त सुखाचा झाला आहे काय? लोक दिवसेंदिवस अधिकाधिक खुशीत जगताहेत काय? 

मी माझ्या बारा वर्षांच्या नातीच्या कौतुकात असतो. ताराने साईना-सिंधूपासून स्फूर्ती घेऊन बॅडमिंटनचा ध्यास घेतला आहे. रोज सकाळी व्यायाम, दुपारी- संध्याकाळी बॅडमिंटनचा सराव चालू असतो. मीपण वयाच्या नवव्या वर्षी शाळेच्या लंगडीच्या चमूपासून सुरवात करून पुढची तेरा वर्षे अनेक खेळांच्या स्पर्धांत शाळेतर्फे, कॉलेजतर्फे, विद्यापीठातर्फे भाग घेतला. मीपण सकाळी व्यायाम, दुपारी- संध्याकाळी खेळांचा सराव आणि मध्ये शाळा-कॉलेजच्या तासांना हजेरी लावायचो; पण त्यासाठी एकदाही मोटारीत, बसमध्ये बसलो नाही. रोज मी सहा ते आठ वेळा बारा-पंधरा मिनिटे मोठ्या खुशीत सायकल मारायचो, त्यातही झकास व्यायाम होत होता. आज तारा? तीही सहा वेळा, पण तीस-तीस मिनिटे, गर्दीत, धूर खात, बसमध्ये, मोटारीत बसून मैलोनमैल चकरा मारत असते. 

गेल्या साठ वर्षांत वाहनांच्या तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती झाली आहे; पण सगळ्या तंत्रज्ञानांना अधिक-उणे अशा दोन बाजू असतात. कशासाठी कोणते तंत्रज्ञान वापरावे, हे सारासार विचार करूनच ठरवले पाहिजे. समाजसमीक्षक ईव्हान इलिच म्हणतो, की रोजच्या वापरातली चाके आज, आपुला दरारा गरजत, पुकारत, वाजवीपेक्षा जास्त वेगाने फिरायला लागली आहेत. त्याने वेगवेगळ्या प्रकारे विश्‍लेषण करत सुचवलेय, की ताशी पंधरा किलोमीटर हा दैनंदिन वापरातील वाहनांचा सर्वोत्तम श्रेयस्कर वेग आहे आणि अत्र्यांनी कवितेत जिचे गोडवे गायले आहेत, ती पायचाकी हे मानवाच्या ताब्यातले सर्वांत सुखी करणारे वाहन आहे. सायकलवर स्वार होऊन माणसाला पायपिटीच्या आठ-नऊ किलोमीटरच्या मर्यादा ओलांडता येतात, दिवसातला माफक वेळ घालवत वीस-तीस किलोमीटरचा पल्ला गाठता येतो. ही यातायात आनंददायी, आरोग्यप्रद ठरते. रोजच्या वापरातल्या वाहनांचा वेग याहून वाढला, की मानव आजच्या पुण्यात झाला आहे तसा वाहनांचा गुलाम बनतो, रहदारीला वैतागत, फुफ्फुसांच्या, पाठीच्या कण्याच्या विकारांना, अपघातांना बळी पडत जीवन कंठतो. जास्त वेगाची वाहने हवीत; पण ती केवळ अधूनमधून करायच्या लांब पल्ल्याच्या प्रवासाला वापरावीत. दैनंदिन व्यवहारासाठी सायकलच श्रेयस्कर! वैद्यकशास्त्र सांगते, की अशा सायकल रपेटीतून हृदयविकार, मधुमेह, संधिवात, पक्षाघात, काही प्रकारचे कर्करोग, लठ्ठपणा, मानसिक नैराश्‍य असे अनेक धोके टाळायला मदत होते. हे साधायचे असेल तर शहरे बेताल वाढून देता कामा नयेत. वीस किलोमीटर व्यासाची, अतोनात दाटीवाटी नसलेली अनेक सुटी सुटी शहरे विकसित करावीत. यातूनच रहदारीच्या, प्रदूषणाच्या, पाणीपुरवठ्याच्या समस्या सुटतील, विकासाचा तोल सांभाळता येईल. 

नितीशकुमारांच्या बिहारातल्या ग्रामीण क्षेत्रात सायकलचा दैनंदिन व्यवहारासाठीचा फायदा डोळ्यांत भरतो. तिथे आज सायकली पुरवल्या गेल्याने मुली शाळेत जाऊ लागल्या आहेत, समाजजीवनाचा कायापालट घडवून आणताहेत आणि हाच खराखुरा विकास असे सिद्ध करत पुन्हापुन्हा नितीशकुमारांना निवडून देताहेत; पण दैनंदिन व्यवहारासाठी सायकलचा पर्याय केवळ ग्रामीण भागातच शक्‍य आहे, योग्य आहे असे बिलकुल नाही. बंगळूर हे पुण्याहून गजबजलेले आहे; पण तिथल्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’चा परिसर हा शहरी क्षेत्रातही काय शक्‍य आहे याचे उत्तम उदाहरण आहे. शंभर हेक्‍टरच्या या आवारात तीन हेक्‍टरांवर घनदाट झाडी राखलेली आहे, इतरत्र दुर्मिळ झालेली लाजाळू माकडे तिथे खुशीत बागडताहेत. परिसरात मोटारी, मोटारसायकली फिरतात; पण अंगावर येत नाहीत. अजूनही त्या आवारात सायकलींचीच चलती आहे आणि त्यासाठी एरवी रॉकेट्‌स बनवणाऱ्या शास्त्रज्ञांनी डोके चालवून एक उत्तम घडी घालून दिली आहे. आवारात जागोजागी सायकल तळ आहेत. हव्या तेवढ्या तासांसाठी कुठल्याही तळावरून सायकल भाड्याने घेता येते, कुठल्याही तळावर परत करता येते. हे इतके सोयीचे आहे, की दुरून मोटारीने आलेलेही आवारातल्या आवारात सायकलवर मजेत फिरतात. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ नुसती देशातली अग्रगण्य शास्त्रीय संस्थाच नाही, तर तिचा परिसर एक संतुलित विकासाचे जिवंत उदाहरण आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com