वराहवृंद वैद्यांसी भावला

माधव गाडगीळ (निसर्गप्रेमी शास्त्रज्ञ)
शनिवार, 6 जानेवारी 2018

आजकाल औषधनिर्मितीत आणि इंद्रियदानात डुकरांची चलती आहे. डुकरांच्या जनुक वैविध्याचे आगर असलेल्या भारताला याचा चांगला लाभ उठवता येईल. तेव्हा आधुनिक युगात विशेष महत्त्वपूर्ण बनत चाललेल्या या विषयाचा अभ्यास मनापासून होण्याची गरज आहे.

आजकाल औषधनिर्मितीत आणि इंद्रियदानात डुकरांची चलती आहे. डुकरांच्या जनुक वैविध्याचे आगर असलेल्या भारताला याचा चांगला लाभ उठवता येईल. तेव्हा आधुनिक युगात विशेष महत्त्वपूर्ण बनत चाललेल्या या विषयाचा अभ्यास मनापासून होण्याची गरज आहे.

अ र्धशतकापूर्वी एका हृद्रोगरुग्णाच्या हृदयाच्या जागी चिम्पाझीचे हृदय बसविण्याचा प्रयत्न केला गेला; शुद्धीवर न येता तो दीड तासात मृत्युमुखी पडला. या नंतरच्या काळात खूप प्रगती झाली आहे, आज दरवर्षी सुमारे ३५०० व्यक्तींना दुसरे मानवी हृदय बसवले जाते; त्यातले ७० टक्के रुग्ण पाचाहून जास्त वर्षे जगतात. पण अशा शस्त्रक्रियेला मर्यादा आहेत, कारण अपघाती मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे धडधाकट हृदय हवे तेव्हा, हवे त्यांना उपलब्ध होणे कठीण आहे. पण आता वैद्यकशास्त्राची जी घोडदौड चालू आहे तिच्यावरून असे दिसते, की पुढच्या पंधरा-वीस वर्षांत या समस्येवर मात केली जाईल आणि हवे तेव्हा, हवे तेवढ्या प्रमाणात माणसाच्या निकामी बनलेल्या हृदयाच्या जागी दुसरे धडधाकट आणि माणसाच्या ‘इम्यून सिस्टिम’ला सहज स्वीकारता येईल असे हृदय बसवता येईल; एवढेच की हे हृदय दुसऱ्या मानवाचे नसेल तर एका वराहाचे असेल.

वराह वंशवेली झपाट्याने फोफावते. आठ महिन्यांच्या आत डुकरिणीची वीण सुरू होते आणि एका वर्षात तिला वीस-पंचवीस पिले होतात. सध्या जगात दरवर्षी ४४ कोटी डुकरांची मांसासाठी पैदास केली जाते. हे लक्षात घेता वैद्यकीय उपचारासाठी डुकरे उपयोगी पडू लागली, तर त्यांचा कधीच तुटवडा भासणार नाही. आज हा खूपच जिव्हाळ्याचा विषय बनला आहे, याचे कारण डुकराच्या इंद्रियांची रचना आणि आकार माणसाच्या इंद्रियांना मिळता-जुळता असतो. आतापावेतो एकच मोठी अडचण होती, ती म्हणजे डुकराच्या जनुक संचात उत्क्रांतीच्या ओघात समाविष्ट झालेले काही विषाणूंचे जनुक. माणसाच्या जनुक संचातही असेच काही विषाणूंचे जनुक समाविष्ट झालेले आहेत; पण ते वेगळे आहेत आणि डुकरांच्या जनुक संचातले विषाणूंचे जनुक माणसाचा घात करू शकतात. पण गेल्या चार वर्षांत कोणत्याही जिवाच्या जनुक संचात नेटके बदल घडवून आणण्याचे ‘क्रिस्पर’ नावाचे एक जनुकसंपादनाचे तंत्र विकसित झाले आहे. ते वापरून आता डुकराच्या जनुक संचातले अनिष्ट जनुक काढून टाकणे शक्‍य झाले आहे. शिवाय पुढे जाऊन अशा डुकराच्या जनुक संचात निवडक मानवी जनुक बसवता येऊ लागले आहेत. अशा मानवाच्या खूप जवळ आणल्या गेलेल्या डुकरांची इंद्रिये मानवदेहात बसवणे, तसेच त्यांच्याद्वारे मानवी औषधोपचारासाठी आवश्‍यक अशी इन्शुलिनसारखी रसायने अधिक क्षमतेने, अधिक स्वस्तात बनवणे आता शक्‍य होऊ लागले आहे.

साहजिकच डुकरांचा जनुकसंच मोठ्या बारकाव्याने पारखला जातो आहे आणि डुकरांच्या आणि माणसांच्या काही विवक्षित जनुकगटांत विलक्षण साम्य असल्याचे नजरेस आले आहे. तेव्हा मानव, मर्कटकुल आणि वराहकुल उत्क्रांतितरूच्या एकाच शाखेच्या तीन फांद्या असाव्यात, असेही अनुमान पुढे येऊ लागले आहे. ही कल्पना आपल्याला खास धक्कादायक वाटण्याचे काहीच कारण नाही; विष्णूचा तिसरा अवतार वराहरूपात होता. भारतात अनेक समाजांचे, विशेषतः आदिवासींचे या प्राण्याशी घनिष्ठ संबंध आहेत. यातलेच आहेत आपल्या गडचिरोली जिल्ह्यातले गोंड. मी त्यांच्या निसर्गरम्य पाड्यांत अनेकदा जाऊन राहतो. आसपास डुकरे खुशीत बागडत असतात, अन्‌ जेव्हा डुकरीण कुशीवर झोपून आपल्या दहा-बारा पट्टेदार पिलांना दूध पाजत असते, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे सफल मातृत्वाचे स्मितहास्य हे तर एक खास मनोहारी दृश्‍य असते.

तेव्हा येत्या दहा-पंधरा वर्षांत डुकरांना वैद्यकशास्त्रात अधिकाधिक महत्त्व मिळेल आणि डुकरे आणि त्यांचे जनुकसंच यांवर भरपूर वैज्ञानिक संशोधन होईल हे नक्की. या संदर्भात भारतातील वराहगण विशेष लक्षणीय ठरतील असा माझा तर्क आहे. आपल्या गोंड समाजांप्रमाणेच नागा-मिझोंसारखे ईशान्य भारतातील आदिवासी समाजही मोठ्या प्रमाणात वराहपालन करतात. पण त्यांच्या डुकरांचे रंगरूप मध्य भारतातल्या डुकरांहून बरेच वेगळे भासते. पृथ्वीतलावर एकीकडे चीन आणि दुसरीकडे तुर्कस्तान अशा दोन वेगवेगळ्या प्रदेशांत नऊ-दहा हजार वर्षांपूर्वी डुकरे माणसाळवली गेली; या दोन वराहवंशांच्या रंगरूपात बरेच फरक आहेत. बहुधा आपली ईशान्य भारतातली डुकरे चिनी वराहवंशाची, तर मध्य भारतातली डुकरे तुर्की वराहवंशाची वारसदार असावीत. आसाम-बंगालात बहुधा या चिनी-तुर्की वराहवंशांचा संकर झाला असावा. या सगळ्या वराहवंश वारसाच्या, संगमाच्या इतिहासामुळे भारतात डुकरांच्या जनुकवैविध्याचे मोठे भांडार खुलले असावे.

भारतातील वैज्ञानिक पुष्कळदा पाश्‍चात्त्य संशोधनाचे अनुकरण करत राहतात आणि या प्रवृत्तीमुळे आपण काही तरी नावीन्यपूर्ण करून दाखविण्याची संधी गमावून बसतो. उदाहरणार्थ, परकीयांना वाघ-हत्तींचे खास आकर्षण आहे, म्हणून आपल्याकडे वाघ-हत्ती-मानवी संघर्षावर चिकार संशोधन चालते आणि आपल्याकडचा मानव-रानडुकरांचा संघर्ष अनेकपटीने अधिक तीव्र असला तरी तो पूर्ण दुर्लक्षित राहतो. तशीच आजकाल वाघांच्या-हत्तींच्या जनुकसंचाच्या अभ्यासाची फॅशन निघाली आहे. हा वाघ-हत्तींचा नाद हवा तर चालू ठेवावा; पण आपल्याला केवळ पाश्‍चात्त्यांच्या मागे मागे न धावता काही तरी वेगळे करून पुढे जायचे असेल, तर आपल्याला क्षुद्र भासणाऱ्या, पण आधुनिक युगात विशेष महत्त्वपूर्ण बनत चाललेल्या वराह अभ्यास मनापासून सुरू करावा.
संत तुकाराम महाराज सांगतात ना :
 तुका म्हणे बरवे जाण । व्हावे लहानाहून लहान ।।

Web Title: madhav gadgil article in editorial