कुत्रे भुंकले, तरस हटले

माधव गाडगीळ
शनिवार, 3 जून 2017

मानवाशी हातमिळवणी करता करता लांडग्याचा कुत्र्यात कायापालट झाला; कुत्र्याच्या मदतीने मानव आणखीच प्रभावी शिकारी बनला, तरसांना हटवू शकला आणि त्याच्या इतिहासाला एक नवेच वळण लागले.

माकडाला नकळत त्याच्या कपाळाला गुलाल लावला आणि आरसा दाखवला तर तो स्वतःची छबी दिसताच गुलाल पुसायला बघतो. म्हणजे त्याला आपण कोणी एक व्यक्ती आहोत याची जाणीव असते. अशा परीक्षेला हत्ती आणि डॉल्फिनसुद्धा उतरतात. पण प्राण्यांचे आत्मभान इतक्‍याच प्राणीवर्गांपुरते, एवढ्याच परीक्षेपुरते सीमित आहे. ते पुढे विकसित होऊन त्याचे अस्मितेत रूपांतर झाले केवळ मानवकुळीत आणि तेसुद्धा फक्त अर्वाचीन मानवजातीत. चौतीस लाख वर्षांपूर्वी आपले मानवकुळीतले पूर्वज दगडी हत्यारे पाजळत दोन पायांवर उभे राहिले, तर 64 हजार वर्षांपूर्वी प्राचीन मानवांनी धनुष्य-बाणांचा शोध लावला. पण ही प्रगती अतिशय संथ गतीने चालली होती; तिला झपाट्याचा वेग आला 50 हजार वर्षांपूर्वी अर्वाचीन मानवाने पदार्पण केल्यावर. हा अर्वाचीन मानव आपल्यासारखीच समृद्ध भाषा बोलू लागला, शंख-शिंपल्यांच्या माळा गुंफून गळ्यात घालू लागला, शिळांवर चित्रे काढू लागला, शवांचे दफन करू लागला, कधी कधी दफनाबरोबर दागदागिने पुरू लागला.

या दफनामागची प्रेरणा तरस असावेत. मानव मर्कटकुळीत जन्मला, तरी त्याची जीवनशैली माकडांशी नाही, तर तरस आणि लांडग्यांशी मिळती-जुळती होती. तो तरस-लांडग्यांप्रमाणेच सहकारी गटागटांनी मैलोन्‌मैल पळत स्वतःहून खूप मोठ्या आकाराच्या हत्ती-रानरेड्यांसारख्या प्राण्यांची शिकार करत होता, ते मांस सर्वांमध्ये वाटून घेत होता. आपल्या डावपेचांच्या, भाले-धनुष्य- बाणांच्या बळावर त्याने वाघ-सिंह- चित्त्यांना काबूत आणले, पण त्याच्याच आकाराचे तरस, लांडगे मानवाला कॉंटे की टक्कर देत होते. त्यात तरस हे माणसाच्या वस्तीच्या आसपास घुटमळत त्यांच्या मृतदेहांवर डल्ला मारत होते आणि संधी मिळताच कच्च्या-बच्च्यांची शिकार करत होते. या तरसांना परावृत्त करण्यासाठी मानव शवांचे दफन करू लागले असा तर्क आहे.

मनुष्यप्राण्याचा तरस आणि लांडग्यांशी मुकाबला सहस्रावधी वर्षे चालू राहिला. माणसाने हत्तीसारख्या महाकाय पशूंची शिकार करून आगीत मांस भाजायला सुरवात केली, की त्या वासाने तरस, लांडगे आकर्षित व्हायचे, जमल्यास माणसांना हुसकून, निदान उकिरड्यावर फेकलेल्या मांसावर ताव मारायचे. तरसांचे जबडे, दात विलक्षण ताकदीचे आहेत, ते पुरलेले मृतदेहही सहज उकरून काढू शकत होते. शिवाय संधी मिळेल तेव्हा माणसांवर विशेषतः मुलांवर हल्ला करायचे. पन्नास हजार वर्षांपूर्वी भाषेच्या जोरावर मूळच्या आफ्रिकेतल्या माळरानांपेक्षा अगदी वेगळ्या परिसरांशी मिळते-जुळते घेत मानवजात जगभर फैलावू लागली. जिथे परिसर अनुकूल होता तिथे आफ्रिकेत, युरोपात, आशियात तरस आणि लांडग्यांना न जुमानता त्यांनी बस्तान बसवले. पण सायबेरियासारख्या कडाक्‍याच्या थंडीच्या मुलुखात माणसाला तरस आणि लांडग्यांवर मात करणे सोपे नव्हते. खास म्हणजे सायबेरियातल्या सगळ्या गुहांत एक तरसाची दांडगी जात आधीपासूनच मुक्काम करून होती. असा अंदाज आहे की मानव 40 हजार वर्षांपूर्वी सायबेरियाला पोचला, पण तरसांच्या स्पर्धेमुळे तो तब्बल 27 हजार वर्षे सायबेरियाच्या अमेरिका खंडाला लागूनच्या ईशान्य टोकाला पोचू शकला नाही.

तरसांनी माणसाशी काहीही तडजोड केली नाही, पण लांडग्यांच्या एका गटाने सलोख्याचा मार्ग स्वीकारला आणि या गटातून आजचे कुत्रे उपजले. हे कुत्र्यांचे पूर्वज मोठ्या प्रमाणात माणसांच्या वस्तीलगतच्या उकिरड्यांवरच्या मांसावर उदरनिर्वाह करू लागले. यातले काही उपजतच मवाळ स्वभावाचे होते; माणसांवर हल्ला करत नव्हते, एवढेच नाही तर माणसांना बुजतही नव्हते. आपोआप निसर्गाच्या निवडीत हे उतरले आणि त्यांचा कायापालट होऊन सुमारे 15 हजार वर्षांपूर्वी ते माणसाला काहीही खटपट करायला न लागता हे मावळ लांडगे माणसाचे साथीदार कुत्रे बनले. गाय, म्हैस, बकरी, मेंढी असे इतर पशू माणसाळवायला मानवाला काळजीपूर्वक त्यांची वीण करायला लागली, ते बरेच नंतर 12 हजार वर्षांपूर्वी माणसाळवले गेले. प्रौढ कुत्र्यांमध्ये पिलांचे अनेक गुणधर्म टिकून राहतात. लांडग्यांची पिले भुंकतात, प्रौढ लांडगे भुंकायचे थांबवतात. प्रौढ कुत्रे पिलांसारखे भुंकत राहिले, भुंकण्यातून माणसांना तरसांसारख्या धोक्‍यापासून सावध ठेवू लागले. हळूहळू ते माणसाला शिकारीत साथ देऊ लागले. या लांडग्यांच्या वंशजांच्या मदतीने माणसाने तरसांवर मात केली, तो सायबेरियाच्या ईशान्य टोकाला पोचला आणि तिथून अलास्कात शिरला. पुढच्या तीन हजार वर्षांत तो उत्तर-दक्षिण अमेरिका खंडात सर्वत्र फैलावला. तेव्हा ट्रम्पसाहेबांनी लक्षात घ्यावे की अमेरिकेत झाडून सारे गोरे लोकच देशांतरित परकीय आहेत.

दफनस्थानांचे मूळ उद्दिष्ट तरसांना निरुत्तेज करणे असेल, पण मानवाच्या मिरवण्याच्या आवडीतून ही सत्तेचे, श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याची स्थळे बनली आहेत. हजारो लोक अनेक दशके खपून इजिप्तच्या फारोहांनी पिरॅमिड बांधले, त्यात मूल्यवान वस्तूंचा प्रचंड भरणा केला, आतल्या दालनात फारोहांची शवे ठेवली. इथून चोरी केल्यास काय दैवी कोप होईल याच्या धोक्‍याच्या सूचना जिकडेतिकडे लिहून ठेवल्या. पण त्याची फिकीर न करता हजारो वर्षांपासून या व अशा अगणित दफनस्थानातून चोऱ्या होत आल्या आहेत. अशातली एक गाजलेली चोरी म्हणजे 1876मध्ये अमेरिकी अध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे शव चोरण्याचा प्रयत्न आणि दुसरी 2009ची पेशवाईत वावटळ उठवणाऱ्या मस्तानीच्या पाबळमधल्या कबरीची. दहा कोटी वर्षांपूर्वी माकडा-मानवाच्या आणि लांडगे-तरसांच्या कुळांची फारकत झाली. प्रश्न पडतो: या दीर्घकालीन उत्क्रांतीची निष्पत्ती थडगी अन्नासाठी उकरण्याऐवजी धनदौलतीसाठी उकरणे एवढीच आहे काय?

Web Title: madhav gadgil throws light on wildlife