किती पुरातन, अपुली पृथिवी?

माधव गाडगीळ
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

विज्ञान बजावते : कोणाचीही अधिकारवाणी मानू नका. विज्ञानविश्वात सर्वोच्च स्थानी आरूढ असलेल्या केल्व्हिनलाही आव्हान देत पृथ्वी दोन कोटी नाही, तर अब्जावधी वर्षे पुरातन आहे, हे वास्तव ठामपणे मांडणाऱ्या डार्विनचा आदर्श सतत डोळ्यांपुढे ठेवा. 

विज्ञान बजावते : कोणाचीही अधिकारवाणी मानू नका. विज्ञानविश्वात सर्वोच्च स्थानी आरूढ असलेल्या केल्व्हिनलाही आव्हान देत पृथ्वी दोन कोटी नाही, तर अब्जावधी वर्षे पुरातन आहे, हे वास्तव ठामपणे मांडणाऱ्या डार्विनचा आदर्श सतत डोळ्यांपुढे ठेवा. 

अठ्ठ्याऐंशी वर्षांपूर्वी सी. व्ही. रामन यांनी किरण रेणूंवरून विखुरताना त्यांची कंपनसंख्या बदलते हे दाखवून देत नोबेल पारितोषिक जिंकले. त्याच्या प्रीत्यर्थ आपण दर वर्षी 28 फेब्रुवारीला आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो. रामन मोठ्या उत्साहाने शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान समजावून सांगायचे. त्यांच्या एका व्याख्यानाचा विषय होता : आकाश निळे का दिसते? रामनना निसर्गाबद्दल अफाट कुतूहल आणि प्रेम होते. या व्याख्यानात रामन सांगतात, मुलांनो, निळे आकाश किंवा पावसाच्या थेंबांतून सूर्यप्रकाशाचे पृथक्‍करण होऊन बनणारे इंद्रधनुष्य पाहायला प्रयोगशाळेत पाऊल ठेवायची जरुरी नाही. या विषयांबद्दल तुमचे शिक्षक तुम्हाला बरेच काही समजावतील; पण तेवढ्यावर समाधान मानू नका. तुम्हाला एक छोटेखानी स्पेक्‍ट्रॉस्कोप घरीच बनवता येईल, तो वापरून निळ्या आकाशाचा स्पेक्‍ट्रम तपासून पाहा. विज्ञानाचा गाभा आहे जिज्ञासा, कुतूहल, डोळे उघडे ठेवून भवतालाबद्दल प्रश्न विचारत राहण्याची ऊर्मी. तेव्हा विचार करत, निरीक्षणे घेत, स्वतंत्र बुद्धीने निष्कर्ष काढत राहा. 

ब्रह्मसूत्राचा आरंभच आहे : अथा तो ब्रह्मजिज्ञासा; जिज्ञासा हाच ज्ञानाचा स्रोत आहे. क्वचितच कोणी ब्रह्मज्ञानापर्यंत पोचतील; पण सर्वसमावेशक विज्ञान सांगते : अथा तो वस्तुजिज्ञासा. वस्तुस्थिती समजावून घेऊन सर्व जण अधिभौतिक ज्ञानापर्यंत पोचू शकतात; पण अचाट गुंतागुंतीचे वास्तव कसे समजावून घ्यायचे? त्याबद्दल कार्यकारणमीमांसा कशी करायची? यासाठी विषयाशी संबंधित वास्तवाचे एक सरळ; पण कळीचे मुद्दे लक्षात घेणारे चित्र, कन्सेप्च्युअल मॉडेल, उभारायला हवे, त्याच्याआधारे तर्कशुद्ध निष्कर्ष काढायला हवेत. यासाठी नेमके संख्याधारित चित्र, मॅथेमॅटिकल मॉडेल रेखाटता करता आले, तर सोन्याहून पिवळे. भौतिकशास्त्रात हे खूप अंशी साधते; पण भूविज्ञान, उत्क्रांतिशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र अशा अधिक गुंतागुंतीच्या विषयांत साधेलच असे नाही. 

आपली पृथ्वी केव्हा उपजली, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा इतिहास, हे अशा अवघड विषयांतही गणित मांडलेच पाहिजे, अशा दुराग्रहातून कसे संघर्ष उद्‌भवतात याचे एक खुमासदार उदाहरण आहे. उत्क्रांतिशास्त्राच्या प्रणेत्या डार्विनच्या दृष्टीने पृथ्वी केव्हा उपजली आणि जीवसृष्टीच्या उत्क्रांतीसाठी किती अवधी उपलब्ध होता, हा एक जिव्हाळ्याचा विषय होता. त्याने इंग्लंडच्या चुनखडीच्या खडकांची धूप व्हायला निदान तीस कोटी वर्षे लागली, तेव्हा पृथ्वीचे वय अब्जावधी वर्षे असणार, असा अंदाज 1859 मध्ये वर्तवला. लॉर्ड केल्व्हिन हा डार्विनचा समकालीन, एक प्रतिभाशाली भौतिकशास्त्रज्ञ होता; त्याने डार्विनवर जोरदार हल्ला चढवला. त्याच्या मते असले मोघम अंदाज निरर्थक होते; त्या जागी पृथ्वीच्या इतिहासाचे एक नेटके चित्र उभारले पाहिजे.

केल्व्हिनच्या मॉडेलप्रमाणे आरंभी पृथ्वी धातूंचा पूर्ण वितळलेला एक गोळा होती; ती हळूहळू थंड होत घट्ट बनली आहे, तरी अजूनही मध्यभागी वितळलेलीच आहे. केल्व्हिनने खडक काय गतीने थंड होतात, याचा अंदाज बांधत एक गणित मांडले आणि ठासून सांगितले, की पृथ्वी फार तर दोन कोटी वर्षांपूर्वी उपजली. दोन कोटी वर्षे हा उत्क्रांतीच्या दृष्टीने अगदी अपुरा कालावधी आहे. अर्थातच केल्व्हिनचा हा हिशेब बायबल प्रमाण मानणाऱ्यांना फार भावला, कारण उत्क्रांतीच्या मंदगती ओघात मानव जीवसृष्टीतूनच उपजला ही डार्विनची संकल्पना त्यांना रुचत नव्हती. पण डार्विनने घट्टपणे प्रत्युत्तर दिले की, केल्व्हिनच्या मॉडेलमध्ये अनेक वैगुण्ये असल्यामुळे त्याचा पृथ्वीच्या वयाबद्दलचा निष्कर्ष निराधार आहे. आज केल्व्हिनच्या चित्रणातल्या नानाविध त्रुटी उघडकीस आल्या आहेत. शिवाय पृथ्वीच्या पोटात युरेनियमसारख्या मूलद्रव्यांच्या किराणोत्सारातून उष्णता निर्माण होत राहते व त्याबरोबर युरेनियमचे थोरियम, शिसे अशा दुसऱ्या मूलद्रव्यांत परिवर्तन होत राहते, हे त्या काळी माहीतच नव्हते. बेकरेल या फ्रेंच शास्त्रज्ञाने हे शोधून काढले. रामनांच्या आधी सत्तावीस वर्षे, 1903 मध्ये बेकेरेलना किरणांबद्दलच्या या दुसऱ्या एका महत्त्वपूर्ण संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळाले. युरेनियमचा किराणोत्सार व शिशात परिवर्तन यांच्याआधारे नेटके गणित मांडत पृथ्वीचे वय 4.56 अब्ज वर्षे असल्याचे आज सर्वमान्य झाले आहे, म्हणजे डार्विनचा तर्क बरोबर होता हे स्पष्ट झाले आहे. 

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लॉर्ड केल्व्हिन विज्ञानविश्वातील एक खास प्रभावी व्यक्तिमत्त्व होते; पण विज्ञानविश्व कोणाचीही अधिकारवाणी मानत नाही. विज्ञानाचा तत्त्ववेत्ता व्हाइटहेड सांगतो, की विज्ञान वास्तवात पाय रोवून घट्ट उभे असते, मग ते वास्तव कोणाला आवडो की नावडो. डार्विन हा बायबलवाद्यांमध्ये अत्यंत अप्रिय होता आणि केल्व्हिन खास प्रिय. पण, विज्ञानाच्या खुल्या संस्कृतीमुळे केल्व्हिनच्या मांडणीबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले; ती पूर्णपणे चुकीची आहे, असे सिद्ध केले गेले. आता वेबवर उपलब्ध झालेल्या प्रचंड ज्ञानभांडारामुळे असे सगळे पडताळून पाहणे हे जनसामान्यांनाही सहज साध्य झाले आहे. आजमितीस अणुशक्ती हा ऊर्जासमस्या सोडवण्याचा उत्तम मार्ग आहे, "जीएम' पिकांमुळे धान्यांचे उत्पादन भरपूर वाढेल, औद्योगीकरण हाच रोजगारनिर्मितीवर परिणामकारक उपाय आहे, अशी वेगवेगळी विधाने अधिकारवाणीने आपल्यापुढे मांडली जातात. परंतु, या सर्व विषयांबद्दल भरपूर उलटसुलट पुरावा उपलब्ध आहे. जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला! तेव्हा, विज्ञान दिनाचा संदेश आहे, की अशी विधाने सारासारविचार न करता बिलकुल मान्य करू नयेत, ती वास्तवाशी सुसंगत आहेत की विसंगत आहेत, हे स्वतंत्र वृतीने सातत्याने तपासून पाहत राहावे.

Web Title: Madhav Gadgil write about earth