‘स्वयम्‌’ अध्ययनाच्या दिशेने

madhuri-gunjal
madhuri-gunjal

शिकण्याची इच्छा असणारा शाळेचा नियमित विद्यार्थी असू देत, की शाळाबाह्य, महाविद्यालयीन- विद्यापीठीय नियमित शिक्षण घेणारा किंवा दूरस्थ, नोकरदार व्यक्ती, गृहिणी अथवा निवृत्त व्यक्ती- प्रत्येकास ‘स्वयम्‌’ ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी अनेक संधी उपलब्ध करून देत आहे.

आपण जाणतोच, की जगभरात सर्वांना समान शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षणासाठी येणारा खर्च कमी करणे, या प्रमुख उद्दिष्टांवर आधारीत ‘मूक्‍स’ची संकल्पना मांडण्यात आणि कार्यान्वित करण्यात आली. ऑनलाइन अध्ययनासाठी ‘मूक्‍स’ आता सर्वपरिचित झाले आहेत.

‘शिक्षित भारत, उन्नत भारत’ हे ब्रीदवाक्‍य असणारी, ‘मूक्‍स’ संकल्पनेवर आधारित देशी आवृत्ती- ‘स्वयम्‌’च्या स्वरूपात भारत सरकारने समस्त भारतीयांसाठी उपलब्ध करून दिली आहे. भौगोलिक सीमांच्याही पलीकडे जाऊन ज्ञानाचे आदानप्रदान करणे, अध्ययनार्थींच्या शैक्षणिक गरजांना प्रतिसाद देणे, शाळा-महाविद्यालयांतून होणारे अध्ययन- अध्यापन म्हणजेच खडूफळा, चर्चापद्धती आणि ई-अध्यपनाचे ‘कुठेही, केव्हाही’ हे स्वरूप यांची पारंपारिक पद्धतीने सांगड घालणे, हे ‘स्वयम्‌’ विकसनाचे काही प्रमुख उद्देश आहेत. ऑनलाइन अभ्यासक्रम उत्तम अध्ययन स्रोतांसहित उपलब्ध करून देण्यासाठी, ज्ञानप्राप्ती आणि डिजिटल उत्क्रांतीपासून लांब राहिलेल्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी भारत तंत्रज्ञानावर आधारित ‘स्वयम्‌’ हे व्यासपीठ निर्माण केले आहे. शैक्षणिक धोरणांतील संधीची उपलब्धता, समानता आणि गुणवत्ता ही प्रमुख तीन तत्त्वे पूर्णत्वास नेण्यासाठी ‘स्वयम्‌’ कटिबद्ध आहे. 

शालेय शिक्षण, शाळाबाह्य शिक्षण, पदवीपूर्व, तसेच पदव्युत्तर शिक्षण अशा चार प्रमुख स्तरांवरील कुणालाही, कुठेही आणि सवडीनुसार कोणत्याही वेळी अध्ययन करता येईल, अशा अभ्यासक्रमांची उपलब्धता करून देण्याचे काम ‘स्वयम्‌’च्या माध्यमातून करण्यात आले आहे. कला, वाणिज्य, विज्ञान, भाषा, ललित कला, सामाजिक आणि मानव्यशास्त्रे, कायदा, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि इतर अनेक विद्याशाखांशी संबंधित अभ्यासक्रमांना, तसेच ‘अर्पित’च्या माध्यमातून उजळणी वर्गांचा लाभ घेतला जाऊ शकतो. 

वर उल्लेख केलेल्या चारही स्तरांवरील विषयास, अभ्यासक्रमास अनुसरून, त्यास पूरक अशी गुणवत्ताप्रधान अध्ययनसामग्री तयार करणे, दृक-श्राव्य आणि मल्टिमीडिया माध्यमांद्वारे उत्तम अध्ययन अनुभूती देणे, अध्यापनशास्त्र आणि तंत्रज्ञान यांचा समन्वय साधणे या हेतूने मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यात नऊ राष्ट्रीय समन्वयकांची नेमणूक केली आहे. याचबरोबर देशभरातील निवडक शिक्षक आणि प्राध्यापक यांच्या सहभागातून विविध विषयांसंदर्भात आंतरक्रियात्मक अभ्यासक्रमांची निर्मिती करण्यात आली आहे. ई-अनुशिक्षण, ई-विषयवस्तू, अथवा ई-आशय, ई-संसाधन आणि ई-मूल्यांकन या फोर-कॉड्रण्ट ॲप्रोचच्या सहाय्याने अध्ययनार्थी ‘स्वयम्‌’वरील अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो. स्वत-च्या अर्हतेनुसार, शैक्षणिक पात्रतेनुसार आणि आपल्या आवडीनुसार अभ्यासक्रमाची निवड केली जाऊ शकते. ‘स्वयम्‌’द्वारे पूर्ण केलेला अभ्यासक्रम आणि त्यातील प्राप्त श्रेयांक यांस देशभरातील शैक्षणिक परिषदा, विद्यापीठे आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांची मान्यता मिळालेली आहे. नियमित प्रवेश घेतलेला अध्ययनार्थी ‘स्वयम्‌’च्या माध्यमातून एखादा अभ्यासक्रम पूर्ण करत असेल तर त्याचे श्रेयांक प्रवेश घेतलेल्या शाळा, महाविद्यालय किंवा विद्यापीठाकडे शैक्षणिक नोंदीसाठी हस्तांतरित करण्याची सोय ‘स्वयम्‌’वर उपलब्ध आहे. ‘स्वयम्‌’वरील सर्व अभ्यासक्रम प्रामुख्याने सर्वांसाठी नि-शुल्क उपलब्ध असले, तरी हे अभ्यासक्रम पूर्णत्वाच्या प्रमाणपत्रासाठी सर्वांना परवडेल अशी अगदी नाममात्र फी मात्र आकारली जाते. 

आयआयटी-मुंबईचे प्रो. दीपक फाटक यांनी केंब्रिज येथील ‘ओपन एडएक्‍स’ परिषदेतील बीजभाषणात नुकतेच सूतोवाच केल्याप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक क्षेत्रात मोठा बदल घडविण्याची क्षमता ‘स्वयम्‌’मध्ये निश्‍चितच आहे. आजघडीला ‘स्वयम्‌’च्या माध्यमातून शिकणाऱ्या विद्या्र्थ्यां संख्या बघता निरंतर शिकत राहणाऱ्यांसाठी ‘स्वयम्‌’ हे प्रभावी माध्यम आहे.

प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विकसित केलेले आंतरक्रियात्मक ‘स्वयम्‌’ व्यासपीठ देशभरातील उत्तम अध्ययन-अध्यापन स्रोतांची उपलब्धता करून देते. उपलब्ध अभ्यासक्रमांसंबंधित मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन झाल्यानंतर मिळणारे श्रेयांक अध्ययनार्थी शिकत असलेल्या शैक्षणिक संस्थेकडे हस्तांतरित करण्याची सोय स्वयम्‌वर उपलब्ध आहे. रेग्युलेशन २०१६ नुसार, तसेच निर्देशही विद्यापीठ अनुदान आयोगाकडे भारतातील विद्यापीठांना दिले आहेत.

स्वगतीने किंवा सवडीनुसार शिकण्याचा फायदा या माध्यमाद्वारे मिळविता येतो. अध्ययनार्थी भौगोलिकदृष्ट्या कुठेही असू देत, शिक्षक प्राध्यापकांशी आंतरक्रिया, उत्तमोत्तम अध्ययन स्रोतांचा फायदा, अभ्यासक्रम पूर्ण करीत असतानाच होऊ शकणारे शंकानिरसन अशा आणि इतरही अनेक सुविधांची उपलब्धता स्वयम करून देते.

व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टिकोनातूनही स्वयमचा उपयोग करता येऊ शकतो. उच्चशिक्षणाशी संबंधित अध्यापकांसाठी अध्यापनातील वार्षिक उजळणी कार्यक्रम- अर्पित या पोर्टलवर विविध विषयासंबंधित व्यावसायिक ज्ञान आणि कौशल्यवृद्धीसाठी या उजळणी कार्यक्रमाचा निश्‍चितच फायदा होऊ शकतो. या उद्देशानेच भारतातील राष्ट्रीय संस्थाधन केंद्रे (एनआरसी) विविध विषय, ज्ञानशाखा, उदयोन्मुख विचारप्रवाह, शालेय तसेच विद्यापीठीय अभ्यासक्रमांशी संबंधित अध्यापनशास्त्रीय कौशल्ये या संदर्भात मूक्‍सआधारित अभ्यासक्रम तयार करून त्याची उपलब्धता करून देत आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com